- डॉ. कामाक्षी भाटे/ डॉ. अश्विनी यादवजागतिक आरोग्य दिवस नुकताच पार पडला. यानिमित्ताने मधुमेहाशी कसा लढा द्यावा याचा आढावा घेणारा हा लेख.मधुमेह हा आजार आणि त्यामुळे होणाऱ्या गुंतागुंतींची व्यापकता लक्षात घेता जागतिक आरोग्य संघटनेने या वर्षी जागतिक आरोग्य दिनाची मध्यवर्ती कल्पना/बोधवाक्य हे त्याच्याशी निगडित ठेवली आहे. ती म्हणजे- 'उत्कृष्ट राहा; मधुमेहावर मात करा !' उत्कृष्ट राहा यामध्ये- मधुमेहाचा वाढता प्रभाव थांबवणे, सक्रिय राहणे, आरोग्यदायी खाणे, वैद्यकीय सल्ला पाळणे आणि जर शंका आली तर स्वत:ची तपासणी करून घेणे या सर्व बाबी समाविष्ट आहेत.सायंकाळची वेळ... गर्दीने गजबजलेले हॉस्पिटल... दिवसभराचे काम जवळजवळ संपवून डॉक्टर्स, हॉस्पिटलचे कर्मचारी, वैद्यकीय विद्यार्थी थोडे सुस्तावले, अचानकच काही तरी पडण्याचा आवाज आला... धपकन असा... आणि आम्ही सर्व जण आवाजाच्या दिशेने धावलो. पाहिले तर एक आजी चक्कर येऊन पडलेल्या. तत्काळ आजींना सरळ झोपवून आम्ही त्यांना जागे करण्याचा प्रयत्न करू लागलो. त्यांच्या नातेवाइकांना विचारले असता आजींना मागील काही वर्षांपासून मधुमेह आणि मूत्रपिंड विकार आहे असे आम्हाला कळले. त्यांच्या मुलाला ताप आलाय म्हणून रुग्णालयात आणलेले, त्या माउलीने सकाळपासून काहीही खाल्लेले नव्हते. लगेच आकस्मिक विभागामध्ये आजींना त्यांच्या तपासणीसाठी आणि उपचारांसाठी आम्ही हलवले. आजींची मधुमेहासाठीची औषधे चालूच होती; पण खाण्यापिण्याच्या वेळा अनियमित होत्या. रक्तातील साखर खूप कमी झाल्यामुळे त्यांना चक्कर आली, असे निदान झाले आणि त्यांचे योग्य ते उपचार सुरू झाले.'असे काय झाले, रक्तात साखर कमी कशी झाली, मधुमेहात ती खरे तर वाढायला पाहिजे !' तर ते तसे नाही कारण मधुमेह म्हणजे रक्तातले साखरेचे प्रमाण नियंत्रित न राहणे, स्वादुपिंडात निर्माण होणारे इन्सुलिन कमी प्रमाणात किंवा कमी प्रभावी असल्याने जसे रक्तात साखरेचे प्रमाण वाढते त्याचप्रमाणे बराच वेळ काही न खाल्ल्याने, जेवण न केल्याने ते एकदम कमी होते याला हायपोग्लायसिमिया असे म्हणतात. याबद्दलही माहिती मधुमेही रुग्णाला असावी लागते, म्हणजे अशी चक्कर येणे आणि त्यानंतरची जीवघेणी धावपळ टाळता येणे शक्य आहे. मधुमेह होण्याचे मुख्य कारण म्हणजे मानवी शरीराच्या 'स्वादुपिंड' या ग्रंथीमध्ये तयार होणाऱ्या 'इन्सुलिन' या संप्रेरकाचा पूर्णपणे किंवा अल्प प्रमाणात अभाव किंवा इन्सुलिनच्या कार्यपद्धतीमध्ये झालेला बिघाड. स्वादुपिंडामध्ये असणाऱ्या 'बीटा' नावाच्या पेशी या संप्रेरकाचा स्राव करतात. इन्सुलिन हे संप्रेरक रक्तातील साखर इतर पेशींमध्ये पोहोचवण्याचे महत्त्वाचे काम करते. त्यामुळे मानवी शरीराला विविध कामांसाठी ऊर्जा मिळते आणि रक्तातील साखरेचे प्रमाणदेखील नियंत्रित राहते. परंतु विषारी पदार्थ, विषाणूसंसर्ग, अनुवांशिकता किंवा लठ्ठपणा अशा काही कारणांमुळे बीटा पेशी नष्ट झाल्या किंवा इन्सुलिन कमी प्रमाणात स्त्रवू लागल्या किंवा इन्सुलिनच्या कार्यपद्धतीमध्ये काही बिघाड झाल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करणे अवघड होते. रक्तातील साखर वरचेवर वाढत जाते आणि शरीराच्या इतर पेशींनादेखील योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात ऊर्जेचा पुरवठा होत नाही. अपुऱ्या ऊर्जेमुळे चक्कर येणे, सतत मरगळ किंवा खूप थकवा येणे, प्रमाणापेक्षा जास्त तहान व भूक लागणे अशी लक्षणे दिसू लागतात. तर रक्तातील प्रमाणापेक्षा जास्त वाढलेल्या साखरेचा परिणाम हृदय, मेंदू, मूत्रपिंड, दृष्टिपटल यांसारख्या महत्त्वाच्या अवयवांवर होऊन रोगपरिस्थिती अजूनच गुंतागुंतीची होते. मधुमेह हा त्याच्या रोग होण्याच्या कारणांमुळे मुख्यत: तीन प्रकारांमध्ये विभागला जातो. पहिल्या प्रकारामध्ये बीटा पेशी नष्ट झाल्यामुळे इन्सुलिन तयारच होत नाही. अशा रुग्णांना कृत्रिम इन्सुलिन उपचार म्हणून घ्यावे लागते. दुसऱ्या प्रकारामध्ये अनुवांशिकता, लठ्ठपणा, निष्क्रिय जीवनशैली, गोड पदार्थांचे अतिरिक्त सेवन अशा कारणांमुळे इन्सुलिनची कार्यपद्धती बिघडते. काही स्त्रियांना गरोदरपणामुळे होणारा मधुमेह हा तिसऱ्या प्रकारात मोडतो.पहिल्या प्रकारची नेमकी कारणे निश्चित नसल्यामुळे त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आव्हानात्मक आहे. पण दुसऱ्या प्रकारचा मधुमेह हा प्रतिबंधात्मक उपायांनी नियंत्रित करता होऊ शकतो. वाढत्या वजनावर नियंत्रण, नियमित योग्य व्यायाम, योग्य वेळी योग्य पोषक आहार, आरोग्यदायी दिनचर्या व निर्व्यसनी जीवनशैली यांमुळे मधुमेहापासून स्वत:चा बचाव करता येतो. मधुमेहासाठी लागणाऱ्या उपचारांचा खर्च बराच आहे. २०११ मध्ये भारताचा ३८ अब्ज डॉलर्स एवढा खर्च केवळ मधुमेहामुळे झाला. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार भारतासारख्या विकसनशील देशामध्ये साधारण कुटुंबाचे जवळपास २५ टक्के उत्पन्न फक्त मधुमेहाच्या उपचारांसाठी खर्च होते. देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी हे एक मोठे आव्हान आहे. शारीरिक हालचालींचा अभाव, स्निग्ध आणि अतिगोड पदार्थांचे अतिरिक्त सेवन, वरचेवर वाढत चाललेला ताणतणाव, शारीरिक स्थूलता आणि वाढलेली आयुर्मर्यादा यांमुळे मधुमेहाच्या प्रमाणामध्ये अधिकच भर पडत आहे.जगभरामध्ये ३५० दशलक्ष लोकांना मधुमेह आहे, जी संख्या येण्याऱ्या वीस वर्षांमध्ये दुपटीपेक्षाही जास्त होऊ शकते. २०१२ मध्ये १.५ दशलक्ष लोकांचा मृत्यू मधुमेहामुळे झाला. २०१४ मध्ये जगभरात ९% अठरा वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांना मधुमेह होता. जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार २०३० पर्यंत मधुमेह हे मृत्यूच्या कारणांपैकी सातवे महत्त्वाचे कारण असेल. २०१५ मध्ये भारतामध्ये ६९.२ दशलक्ष (एकूण लोकसंखेच्या ८.७ टक्के) लोकांना मधुमेह झाल्याचे आढळून आले. ७७.२ दशलक्ष लोकांना मधुमेह होण्याची शक्यता आहे. २०१२ मध्ये एक दशलक्ष भारतीय लोकांचा मृत्यू या व्याधीमुळे झाला, देशभरात या रोगाचा प्रभाव आढळून येतो. ग्रामीण भागाच्या तुलनेने शहरी भागात याचे प्रमाण जास्त आहे. भारत हे विकसनशील राष्ट्र असूनही मधुमेहाची राजधानी म्हणून ओळखले जाते. अगदी अलीकडच्या काळापर्यंत हा आजार वयाने मोठ्या माणसांमध्येच आढळून येत होता. पण सगळ्यात महत्त्वाची लक्ष वेधून घेणारी बाब म्हणजे मधुमेह हा कमी वयातच होऊ लागला आहे. परिणामत: त्याचा मेंदू, हृदय आणि मूत्रपिंड या अवयवांवर वाईट परिणाम होऊन लवकरच मृत्यू येऊ शकतो.
एक लढा मधुमेहाशी..!
By admin | Updated: April 10, 2016 02:26 IST