- तारा भवाळकर
वयाच्या १९ व्या वर्षी पहिली नोकरी लागली, ती माध्यमिक शिक्षक म्हणून आणि ६0 वर्षांनंतर निवृत्ती घेतली ती प्राध्यापक-म्हणजे शिक्षक म्हणून! एकूण ४२ वर्षांचा अधिकृत मास्तरकीचा अनुभव! तरी पहिल्या नोकरीतल्या एका ज्येष्ठ सहकारी शिक्षकांचे एक वाक्य नेहमी आठवते. ‘‘लहानपणी आईला सांगत होतो, शाळेत जातो ग, तरुणपणी बायकोला सांगत होतो, शाळेत जातो ग, आणि आता सुनेला सांगतो, शाळेत जातो ग.’’ एकूण एकदा शिक्षकी पेशात शिरलेला माणूस सहसा बाहेर पडत नाही. पदाच्या श्रेणी फार तर बदलतात. माझ्यापुरतं सांगायचं तर एकूण ४२ वर्षांत एकुणात शिक्षण क्षेत्रातली अनेक स्थित्यंतरं अनुभवली; पण त्याही आधी विद्यार्थी दशेतल्या शिक्षकांची आठवण येते. तेव्हा आणि आता विद्यार्थी स्तरातला बदल प्रकर्षाने जाणवतो.
आमच्या पिढीतल्या बहुतेकांचे प्राथमिक शिक्षण नगरपालिकेच्या शाळांतूनच झाले. पहिली ते सातवी. सातवीची परीक्षा आमच्या दृष्टीने हल्लीच्या १0वी-१२वीसारखी. कारण ती व्ह.फा.ची (व्हर्नाक्युलर फायनल) परीक्षा झाली की सर्टिफिकेट मिळे. अनेकांना तेवढय़ा गुणवत्तेवर प्राथमिक शिक्षक होता येई.
तर आमच्या तेव्हाच्या ५ नं. च्या शाळेतल्या एक शिक्षिका कराचीहून आलेल्या होत्या. स्वातंत्र्योत्तर फाळणीच्या दंगलीतून जगून वाचून आलेल्यांपैकी एक! त्यांचे अनुभव आम्ही सहावीच्या वर्गात ‘आऽ’ वासून ऐकत असू, आणि घरी सांगत असू. त्या मराठी कविता छान शिकवत. वर्गात सामूहिकपणे चालीवर कविता म्हणणे सर्रास चाले. आपोआप पाठ होऊन जात. त्याच बाईंनी शिवणाच्या तासाला ‘पोलके बेतायला’ आणि शिवायला एवढे छान शिकवले होते की, त्या भांडवलावर आजतागायत शिंप्याला माझ्याकडून एक छदामही मिळाला नाही. दुसरे एक मास्तर फार कडक. पाढे पाठ करून घेताना आणि गणित शिकवताना छडी खाल्ली नाही, असा एकही मुलगा किंवा मुलगी वर्गात नव्हती. घरी तक्रार केली, तर उलट ‘चांगलं बडवून काढा आणि गणित पक्कं करून घ्या,’ असं सांगायला आई-वडील शाळेत येण्याची शक्यता जास्त.
पण हेच ‘मास्तर’ दिवाळी आली की, आकाश-कंदिलाचे सगळे सामान स्वत: आणून आमच्याकडून सुंदर आकाशदिवे करवून घेत. आज वर्गात शिक्षक रागावले म्हणून भांडायला जाणारे पालक किंवा ‘अपमान’ झाला म्हणून आत्महत्या करणार्या विद्यार्थ्यांच्या हकीकती ऐकल्या की शिक्षक, विद्यार्थी, पालक या नात्यात केवढा अंतराय निर्माण झाला आहे, ते जाणवते. शिक्षक रागावले, त्यांनी मारले तरी त्यांच्याविषयीचा आदर कधी कमी झाल्याचं आठवत नाही.
प्रारंभी शाळेत शिक्षक म्हणून काम करतानाचा काळ तर माझ्या दृष्टीने शिक्षकी (पुढे प्राध्यापक, रीडर इ.इ.) पेशातला तो सर्वांत आनंदाचा काळ होता. शिक्षक म्हणून समृद्धीचा अनुभव देणारा काळ होता. नंतरच्या काळात निरनिराळ्या गावांत काम करताना अनेक स्तरावरचे विद्यार्थी भेटत आले. कित्येकांच्या मनात अजून सादर आत्मभाव जाणवतो. एरव्ही माझ्या ऐन उमेदीत ६-७ वीतला एक विद्यार्थी जवळ-जवळ पन्नास वर्षांनी अमेरिकेतून थेट फोन करून मी त्याला ‘ब्लॉग’वर सापडल्याचा आनंद व्यक्त करतो, याचा अर्थ कसा लावायचा? अशा वेळी खरे तर विद्यार्थ्यांपेक्षा मला आनंद होतो. शिक्षकी पेशात आमच्यावेळी वेतन कमी होते, पण या आनंदाने शिक्षक झाल्याचा पश्चात्ताप कधीच वाटत नाही. उलट सतत ‘तरुण’ वाटते.
सुदैवाने प्राथमिक शाळेत जसे कडक शिस्तीचे, प्रेमळ शिक्षक भेटले, तसेच माध्यमिक शाळेतही भेटले. एरव्ही पाठय़पुस्तकही विकत घेऊ न शकणार्या माझ्यासारख्या मुलीला शालान्त परीक्षाही देणे शक्य नव्हते. अनेक नावे सांगता येतील; पण प्रकर्षाने आठवणारे एक नाव- कल्याणच्या शाळेतले वि. रा. परांजपे (ठाण्याचे पुढे शिवसेनेचे नेते झालेले प्रकाश परांजपेंचे वडील.) त्यांच्यामुळे माझ्या मालकीचे पहिले पुस्तक मी विकत घेऊ शकले. ८ वीनंतर थांबणारे शिक्षण पूर्ण करू शकले. मुख्य म्हणजे त्यांनी प्रथम रंगमंचाची नशा अनुभवण्याची संधी दिली, ती अजून आहे.
नंतरही महाविद्यालयात नियमित विद्यार्थी म्हणून जाता आले नाही. नोकरी करीत बहि:स्थ पद्धतीने परीक्षा दिल्या, पण तेव्हाही नाशिकच्या हं. प्रा. ठाकरसी महाविद्यालयातील नामवंत प्राध्यापक प्रा. वि. बा. आंबेकर, डॉ. सोहोनी, प्रा. मामा पाटणकर (वि. भा. पाटणकरांचे वडील), डॉ. बाळासो दातार (पुढे पीएच.डी.चे मार्गदर्शकही) नंतर पुणे विद्यापीठात प्रा. भालचंद्र फडके असे अनेक जण माझे शैक्षणिक पालकत्व स्वीकारीत गेले.
या सगळ्या वाटचालीत ग्रंथ, पुस्तके आणि विविध वाचनालये यांचा फार मोठा वाटा आहे. उपजत वाचनप्रेमाला दिशा देणारेही निरनिराळ्या टप्प्यांवर भेटत गेले. प्रा. नरहर कुरुंदकर, डॉ. रा. चिं. ढेरे, य. दि. फडके, कमल देसाई, छाया दातार अशी कितीतरी नावे.. शिक्षक- मार्गदर्शक म्हणून हे सगळे आदर्श मिळत गेल्याने एक शिक्षक म्हणून विविध स्तरांवर विद्यार्थ्यांशी कसे वागावे, याचा एक वस्तुपाठ मिळत गेला. प्रत्येक टप्प्यावर आपले विद्यार्थीपणही सतत साथीला असल्याखेरीज शिक्षकही होता येत नाही, हे उमगत गेले.
या सगळ्या पार्श्वभूमीवर परवाच सध्याच्या शिक्षण व्यवस्थेतील काही ‘पीडित’ शिक्षक (प्राध्यापकही), विद्यार्थी, पालक यांचे अनुभव ऐकून आपण ४२ वर्षे ज्या क्षेत्रात व्यतीत केली, तेच का ‘पवित्र वगैरे’ शिक्षण क्षेत्र! हा प्रश्न कुरतडतो आहे.