पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी जलमय झालेल्या चेन्नई शहराची गेल्या सप्ताहात जी हवाई पाहाणी केली त्या पाहाणीची छायाचित्रे माध्यमांकडे पाठविताना केन्द्र सरकारच्या पत्र सूचना कार्यालयाने (पीआयबी) जी करामत केली, ती संबंधितांच्या चांगलीच अंगलट आली आहे. पंतप्रधान कार्यालयाने त्याबाबत माहिती मंत्रालयातील संबंधितांचा लेखी जबाबच मागितला आहे. प्रस्तुत छायाचित्रात विमानाच्या खिडकीमधून चेन्नईची पाहाणी करतानाचे पंतप्रधान मोदी आणि खिडकीबाहेर अगदी स्वच्छ प्रकाशात जलमय झालेले चेन्नई (किंवा आणखी भलतेच कोणते तरी) शहरही दिसत होते. त्या चित्राकडे पाहाताक्षणी त्यात काहीतरी करामत आहे आणि दोन वेगळी चित्रे परस्परात गुंफून नवे चित्र तयार केले गेले आहे, हे कोणालाही जाणवत होते. ट्विटरवर टाकलेल्या या चित्रावर लगेचच चर्चा सुरु झाली आणि पीआयबीने तत्काळ ते चित्र मागे घेऊन क्षमायाचनाही केली. काहीच वेळात दुसरे आणि खरे छायाचित्र जारी केले गेले व त्यात खिडकीबाहेरचे काहीही दिसत नव्हते. परंतु देशात आणि परदेशातही आधीचे चित्र तोपर्यंत पोहोचलेले असल्याने आणि त्यावर टीकाटिपणीदेखील सुरु झाली असल्याने पीआबीची ही करामत कुठेतरी पंतप्रधानांनाच कमीपणा आणणारी ठरली. साहजिकच माहिती मंत्रालयातील सर्व विभाग प्रमुखांची लगेचच बैठक घेतली गेली. यापुढे माध्यमांकडे कोणतीही छायाचित्रे पाठविताना छायाचित्रकाराने जे कॅमेरात बंद केले असेल ते तसेच पाठवावे, त्यात करामती करु नयेत असे आदेश पंतप्रधान कार्यालयाने जारी केले असून ते सर्व संबंधितांपर्यंत पोचते झाले आहेत. परंतु यातील खरी मौज पुढेच आहे. सरकारी छायाचित्रकाराने त्याचे काम केले की मग पीआयबीचे अधिकारी त्यांच्यावर काम करतात आणि दोन किंवा अधिक वेगळ्या चित्रांचा मिलाफ घडवून आणून नवे चित्र तयार केले जाते व गेल्या कित्येक वर्षांचा हाच प्रघात असल्याचे पीआयबीच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. विशेषत: पूर किंवा तत्सम नैसर्गिक आपत्तीच्या परिणामांची हवाई पाहाणी करण्याचा जसा प्रघात आहे तसाच अशा पाहाणीनंतर दोन वेगळ्या चित्रांच्या संयोगाने नवे चित्र तयार करुन तेच माध्यमांंकडे पाठविण्याचाही प्रघात आहे व डॉ.मनमोहनसिंग यांच्या काळातही तसेच केले जात होते असेही पीआयबीचे म्हणणे आहे.
अखेर कान उपटले
By admin | Updated: December 8, 2015 01:40 IST