शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
2
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
3
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
4
जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोघे जखमी
5
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
6
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
7
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
8
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
9
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
10
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
11
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
12
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
13
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
14
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
15
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
16
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
17
आदिवासी भागातून UPSC परीक्षेत यश मिळवणारे पहिलेच युवक; इंटरनेटवरील व्हिडीओद्वारे केला अभ्यास
18
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
19
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
20
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे

एक पणती तेवू लागते, तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2024 09:12 IST

एवढ्या घनघोर अंधारात धिटुकल्या पणत्या तेवू लागतात आणि अंतरंगात दिवे पेटू लागतात.

सूर्य चालला होता अस्ताला. अस्ताला चाललेल्या सूर्याला वाटले, आपल्या पश्चात प्रकाशदानाचे आपले हे कार्य करणार तरी कोण? त्याने विचारले तसे. कोणीच नाही आले पुढे. चंद्र म्हणाला, ‘मीच बापडा परप्रकाशित. मी कोणाला काय प्रकाश देणार?’ कोणीच पुढे येत नव्हते, तेव्हा इवलीशी पणती आली पुढे. ती धिटुकली पणती पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. तेव्हा ती पणती म्हणाली, ‘मी छोटी. माझी व्याप्ती छोटी. सूर्याचा आकार महाकाय. आवाका प्रचंड. मी तुलना करत नाही. एवढा प्रकाश देणे मला शक्यही नाही. पण आज एवढे आश्वासन देते, जिथे मी असेन, त्याच्या आसपास अंधार कधीच नाही फिरकणार!’ ही कविता खरंतर रवींद्रनाथ टागोरांची. दिवाळी आली की हमखास ती आठवते.

एवढ्या घनघोर अंधारात धिटुकल्या पणत्या तेवू लागतात आणि अंतरंगात दिवे पेटू लागतात. सभोवताली फार बरे चालले आहे, असे नाही. रोजचे वर्तमानपत्र वाचणे हीच जोखीम वाटावी आणि बातम्या बघण्याचीच भीती वाटावी, असे हे वर्तमान. एवढे काही काही घडत असते. विखार ही मातृभाषा झालीय, असे वाटण्यासारखे बरेच काही कानावर पडत असते. कसे होणार आपले, आणि कसे होणार उद्याच्या मानवी समुदायाचे, अशी चिंतेची काजळी वाढत असते. मनाच्या तळाशी निराशा वस्तीला येते. काही बदलू शकणार नाही, असे वाटू लागते. त्याच वेळी नेमकी दिवाळी येते. एकेक दिवा तेवू लागतो. प्रकाशाचा उत्सव सजू लागतो. खोल कुठेतरी उमेदीचा किरण रुजू लागतो. खात्री पटू लागते की अंधाराचे जाळे फिटणार आहे.

संशयाचे धुके हटणार आहे. आकाश मोकळे होणार आहे. सर्वदूर प्रकाश वाहू लागणार आहे. हृदयामध्ये मग आशेची वात लागते. हीच ती आशा आहे, जिने मानवी समुदायाला इथवर आणले. गौतम बुद्ध ‘अत्त दीप भव’ म्हणाले आणि त्यांनी स्वतःच पणती व्हायला सांगितले. बुद्धांनी दिलेल्या करुणेने मानवी जगणेच बदलून गेले. जगात दुःख आहे आणि त्याला कारण आहे, हे बुद्धांनी सांगितलेच, पण त्यांनी जगण्यालाच प्रयोजन दिले.  ‘हे विश्वचि माझे घर’ म्हणत संत ज्ञानेश्वरांनी विश्वात्मक पसायदान दिले, तर संत तुकारामांनी खरा देव सांगत नाठाळांना काठीने बदडले. याच रस्त्याने चालत महात्मा गांधींना आतला आवाज गवसला आणि पंडित नेहरूंनी भल्या पहाटे नियतीशी करार केला. अब्राहम लिंकनची अमेरिका आणि महात्मा फुल्यांच्या मराठी मुलुखात अंतर कैक मैल; पण लिंकनच्या चळवळीने महात्मा फुल्यांना असा प्रकाश दाखवला की, त्यांनी आपले पुस्तकच या चळवळीला अर्पण केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षाने तिकडे बराक ओबामांना प्रेरणा मिळाली, तर जर्मन कवी गटे महाभारतामुळे प्रभावित होऊन कालिदासाला डोक्यावर घेऊन नाचू लागला. कुठली ज्योत कुठे तेवेल आणि तिचा प्रकाश कुठवर पोहोचेल, याचे काही गणित नाही. भौतिकशास्त्रालाही ‘या’ प्रकाशाचा वेग सांगता यायचा नाही, असे खुद्द आइनस्टाइनच म्हणाले होते! प्रकाशाला जात नाही, धर्म नाही, भाषा नाही अथवा सीमा नाहीत. बाहेर अंधार वाढू लागतो, तेव्हा कवी एकच सांगतो- ‘अंधार फार झाला, पणती जपून ठेवा.’ अंधाराशी रोज ‘डील’ करताना हाच ‘वैधानिक इशारा’ आयुष्यभर लक्षात ठेवायचा!  प्राप्त वातावरणात  ‘लक्ष्मी’पूजनाचे संदर्भच बदलून गेले आहेत. फटाक्यांच्या लडीत आपलाच आतला आवाज सापडू नये, असे होऊ लागले आहे.

कोलाहल वाढत चालला आहे. गोंगाट वाढतोय, पण कोणीच बोलत नाही. संवादाची माध्यमे वाढली, पण संवादच होत नाही. असहमती व्यक्त करण्याचा अवकाश नाही. जग जवळ आलेय, पण घरातली नाती हरवत चालली आहेत. आभासी जगात हजारो मित्र, पण तरी सोबतीला एकाकीपण फक्त. आशेने कोणाकडे पाहावे, तर हमखास अपेक्षाभंग. या सगळ्यात रोजच्या रणांगणातील प्रश्न मागच्या बाकांवर. माणूसपणावर कधी जात मात करते, तर कधी धर्म. कधी लिंग तर कधी भाषा. माणूस मात्र हरू लागतो. माणूसपण मरू लागते. या गदारोळात एकटेपण येते. अंधाराची गर्ता आणखी खोल होऊ लागते. काळरात्र गडद होऊ लागते. अशा वेळी दिवाळी येते. नवे संकल्प घेऊन नवी पणती येते. नवे विकल्प दाखवत ही धिटुकली पणती डोळे मिचकावू लागते. अंधाराची सेना मग क्षणार्धात गायब होते. घराच्या अंगणात तेवणारी पणती मग मनाच्या अंगणातही प्रज्वलित होते. आणि अंगण गाऊ लागते - दिवे लागले रे, दिवे लागले, तमाच्या तळाशी दिवे लागले!..

टॅग्स :Diwaliदिवाळी 2024