विजय दर्डा, (लोकमत पत्र समूहाचे चेअरमन)आपल्या बोलीभाषेत जेव्हा एखाद्या व्यक्तीला चांगले दिवस येतात तेव्हा तो दिवाळी साजरी करतो, असे म्हटले जाते. समाजातील काही घटकांसाठी हे खरे असले तरी, सर्वसामान्य जनतेसाठी प्रकाशाचा उत्सव असलेला दिवाळीचा सण हाच खरा उत्सव असतो. धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन आणि भाऊबीज (भाईदुज) अशा विविध दिवसांनी प्रकाशाचे हे पर्व साजरे केले जाते. यापाठोपाठ बिहारमध्ये छटपूजा होत असते. चौदा वर्षांच्या वनवासानंतर प्रभू रामाचे अयोध्येला परतणे, तसेच रावणावर मिळविलेला विजय साजरा करण्यासाठी हा सण असल्याचे रामायण या महाकाव्यात स्पष्ट केलेले आहे. सध्याच्या काळात दिवाळीचा सण सर्व जगभर साजरा केला जातो. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे व्हाईटहाऊस या त्यांच्या निवासस्थानीही दिवाळी साजरी करतात. यावरून या सणाचे वैश्विक महत्त्व स्पष्ट होते. या आनंदोत्सवात सहभागी होताना काही आणि, परंतु नसावेत. या काळात प्रत्येकाला आनंदामध्ये मनसोक्त न्हाता येणे गरजेचे आहे. मात्र आपल्या समाजातील काही घटकांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे त्यांच्या आनंदावर विरजण पडते. मात्र काहीजण हे मान्य करीत नाहीत.आपल्या समाजातील प्रत्येकजण हा सण सारख्याच उत्साहाने साजरा करू शकत नाही, हे सत्य मान्यच करायला हवे. गरीब आणि श्रीमंत या वर्गामधील फरक उत्साहामध्ये दिसून येतोच. हे मान्य केले तरी समाजातील गरीब वर्गाला हा सण उत्साहाने साजरा करण्यासाठी त्याच्याकडे किमान आवश्यक साधनसंपत्ती असणे गरजेचे आहे. समाजात समता प्रस्थापित करण्याचे उद्दिष्ट आपल्या राष्ट्रीय अजेंड्यातून गायब झाले असताना ही स्थिती असणे हे खरोखर गंभीर आहे. समाजातील समतेचे तत्त्व हे विकास प्रक्रियेने गाठले जाईल, असे धरून चालले असले तरी याबाबत निश्चित असा कृती कार्यक्रम आखून त्याची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. दिवाळीचा सण साजरा करीत असताना केवळ आर्थिक बाबीच महत्त्वाच्या असतात, असे नाही. आपल्या नागरिकांमध्ये त्यांच्या धर्म, जात अथवा वंश याशिवाय वैश्विक भाईचारा असणे गरजेचे आहे. हा वैश्विक भाईचाराच या सणासाठी महत्त्वपूर्ण ठरणारा आहे. मात्र मध्येच काही काळ हा वैश्विक भाईचारा आपल्या समाजामधून कमी होणे निश्चितच दु:खद आहे.जेव्हा काही व्यक्ती आपल्यातील हिरोंच्या देशभक्तीवर त्यांच्या धर्मामुळे शंका घेतात तेव्हा याबाबत गंभीरपणे काही प्रश्न उपस्थित होतात. केवळ मुस्लिम धर्माचा असल्याने शाहरूख खान हा देशभक्त ठरत नसेल तर मग देशभक्त कोण असा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. समाजाच्या काठावरील काही घटक हा प्रश्न उपस्थित करीत आहेत हा सवाल नाही. काठावर नसलेले काही घटक शाहरूख खानला दिलीपकुमारकडे बघण्याचा सल्ला देतात. दिलीपकुमार यांना चित्रपट उद्योगामध्ये स्थान मिळविण्यासाठी आपले नाव युसूफ खान ऐवजी दिलीपकुमार असे बदलावे लागल्याचे ते सांगतात. युसूफ साहेबांनी मात्र आपल्या आत्मचरित्रात हे नाव बदलण्यामागे असलेले कारण स्पष्ट केले आहे. त्यांच्या वडीलांना युसूफ साहेबांचे चित्रपटात येणे आवडत नव्हते. त्यांचा राग टाळण्यासाठी आपण नाव बदलल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. देशाच्या स्वातंत्र्यपूर्व काळात हिंदू-मुस्लिम हा वाद फारसा नव्हता. हरिभाई यांनी संजीवकुमार तर बलराज दत्त यांनी सुनिल दत्त अशी नावे धारण केली आहेत. याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जाते. ज्येष्ठ अभिनेते अशोककुमार यांनीही कुमुद कुमार गांगुली या नावाऐवजी अशोककुमार या नावानेच चित्रपटांमध्ये काम केलेले आहे. असे असतानाही शाहरूख खानने आपले नाव बदलले नाही. मात्र असे करणारा काही तो पहिलाच कलाकार नव्हे. या आधी वहिदा रहेमान यांनाही रूपेरी पडद्यासाठी दुसरे नाव घेण्याचे सुचविण्यात आले होते. मात्र त्यांनी ते नाकारले आणि गेली सहा दशके त्या प्रथितयश अभिनेत्री आहेत. मात्र त्यांच्या देशभक्तीबाबत कोणी कधी शंका उपस्थित केलेली नाही. शाहरूख खानने या मुद्यावर व्यक्त केलेले मत हे योग्यच आहे. आपापल्या धर्मांचा आदर करणे हे योग्य असून, त्याचा वापर सर्वांनी केला पाहिजे, असे शाहरूख खानने स्पष्ट केले आहे. आपण आपली पत्नी गौरीबरोबर दिवाळी साजरी करतो तर ती आपल्याबरोबर ईद साजरी करते असे शाहरूख खानने सांगितले आहे. देशातील लाखो नागरिक होळी, दिवाळी, ईद आणि ख्रिसमस हे सण आपापल्या धर्मश्रद्धांप्रमाणे आणि पूर्ण उत्साहाने साजरे करीत असतात. पाच हजार वर्षांपेक्षा जुनी अशी आपली संस्कृती असल्यामुळे आपला देश हा महान देश आहे, असे नव्हे. मात्र आपल्याकडे अनेक जाती-धर्म आणि बहुसांस्कृतिक अशा नागरिकांची एकता आहे यामुळे आपला देश महान ठरला आहे. आपला समाज या तत्त्वांवर चालत असला तरी काही अत्यंत कमी संख्येने असलेल्या व्यक्ती काही मुद्दे काढून राष्ट्राला अडचणीत आणत असतात. त्यांच्या विरोधात आपल्याला लढा द्यायलाच हवा. या प्रवृत्तींना वेळीच ठेचले नाही तर आपल्याला त्याची किंमत आपल्या स्वातंत्र्याने चुकवावी लागेल. आधुनिक जगातील विकसित देशांनी वेगवेगळी आव्हाने पेलताना सध्याची स्थिती प्राप्त केली आहे. आपल्या देशाची लोकसंख्या तसेच क्षेत्रफळ बरेच मोठे आहे आणि येथे लोकशाहीही रूजली आहे. त्यामुळे येथील समस्यांही वेगळ्या प्रकारच्या आहेत.स्वातंत्र्यानंतरच्या सहा दशकांमध्ये आपण अन्नसुरक्षा आणि सैनिकी बळ याबाबत अनेक आव्हाने पार केली आहेत. मात्र विकासाची फळे देशातील गरीब घटकाला मिळण्यासाठी आपल्याला अद्यापही बराच टप्पा गाठावयाचा आहे. मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाला स्वत:च्या बळावर बहुमत मिळाल्यानंतर आपली वाटचाल काही प्रमाणात द्विपक्षीय लोकशाहीकडे सुरू झाली आहे. आपल्या लोकशाहीच्या इतिहासातील ही एक लक्षवेधी घडामोड आहे. काँग्रेस पक्षाच्या विकासाच्या मॉडेलपेक्षा दुसरे काही अपेक्षित असणाऱ्या नागरिकांनी हा बदला घडविला. देशाला द्विपक्षीय लोकशाही योग्य असली तरी आपल्याला खऱ्या अर्थाने मुक्त धोरण असले पाहिजे. डावे-उजवे अथवा मध्यम असे कोणतेही धोरण असले तरी मुक्त धोरण हेच खऱ्या अर्थाने दिवाळी वैश्विक साजरी करणारे ठरणार आहे.हे लिखाण संपविण्यापूर्वीदिवाळीचा आनंदोत्सव साजरा करण्यात विविध वस्तूंच्या किंमती हा महत्त्वाचा घटक ठरतो. जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती या आपल्यासाठी फार महत्त्वाच्या असतात. या वस्तूंच्या किंमती बऱ्याच जास्त असल्यास सणाचा आनंद फारसा मिळत नाही. बदलत्या ऋतुप्रमाणे किंमती खाली-वर होणे हे योग्य आहे. मात्र किंमती स्थिर राखण्यासाठी एक दीर्घकालीन धोरण असण्याची गरज आहे. सर्वसामान्य माणसाच्या आवाक्यात राहणाऱ्या किंंमती असणे ही सर्वांची आजची गरज आहे आणि त्यासाठी प्रयत्न होणे सर्वांत महत्त्वाचे वाटते.
दिवाळी : सर्व विश्वात साजरा होणारा सण
By admin | Updated: November 8, 2015 23:34 IST