महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज त्यांचा ४६ वा वाढदिवस साजरा करीत आहेत. शरद पवारांच्या पश्चात राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर आरूढ झालेले ते सर्वाधिक तरुण नेते आहेत. शिवाय दादासाहेब कन्नमवार, वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक यांच्यानंतर या पदावर आलेले ते चौथे वैदर्भीय मुख्यमंत्री आहेत. त्या आधी नागपूरचे दोन वेळा महापौर, विधानसभेतील अभ्यासू लोकप्रतिनिधी, सरकारला सदैव धारेवर धरणारे विरोधी पक्षनेते आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी कीर्ती संपादन केली आहे. २०१४ मध्ये भाजपाला सेनेच्या सोबतीने राज्यात दुसऱ्यांदा सत्ता मिळाली तेव्हा त्याचे मुख्यमंत्रिपद आपल्याला मिळेल अशी आशा असलेले किमान पाच पुढारी भाजपात होते. मात्र मोदी, शाह आणि भागवत या नेत्यांनी मनोमन फडणवीसांची निवड केली व ती करताना काही ज्येष्ठांना त्यांची नाराजी मुकाटपणे गिळायलाही त्यांनी भाग पाडले. फडणवीसांनी आपल्या कार्यकाळाची सुरुवातच अनेक योजनांची आखणी करून धडाक्याने केली. त्यांच्या कामाचा वेग आणि उत्साह एवढ्या दिवसानंतरही तसाच कायम आहे. राज्यातील दुष्काळावर मात करण्यासाठी त्यांनी आखलेली जलयुक्त शिवार ही योजना कमालीची यशस्वी झाली असून येत्या काही दिवसात तिची अतिशय चांगली फळे ग्रामीण भागाच्या वाट्याला आलेली दिसू लागतील. मुख्यमंत्र्यांनी गृहखाते स्वत:कडे ठेवले आहे. मुंबईपासून नागपूरपर्यंतच्या गुन्हेगारांच्या अनेक टोळ्या जेरबंद करून तेथील गुन्हेगारीला आळा बसविण्यात त्यांना यश आले आहे. शेतकऱ्यांना खतांचा आणि बी-बियाणांचा पुरवठा योग्य वेळी प्राप्त होईल याची काळजीही त्यांच्या सरकारला घेता आली आहे. राज्यभरात सततचे दौरे, दिल्लीशी नित्याचा संपर्क आणि पंतप्रधानांसोबत जगातील अनेक देशांना भेटी देऊन त्यांना आपला दृष्टिकोन एकाच वेळी प्रादेशिक, राष्ट्रीय व जागतिक बनविण्यात मिळालेले यश त्यांच्या अनेक स्पर्धकांना सतर्क व काळजी करायला लावणारेही ठरले आहे. बहुमताचा पाठिंबा, मोदींचा वरदहस्त आणि संघाचे पाठबळ या सामर्थ्यस्रोतांच्या बळावर त्यांना राज्याची व विशेषत: त्याच्या अविकसित भागाची आणखी न्याय्य व मोठी सेवा करता येणार आहे. विदर्भ, मराठवाडा आणि कोकण हे प्रदेश ५५ वर्षे महाराष्ट्रात राहूनही अविकसित व वंचित राहिले आहेत. पवारांसारखा ज्येष्ठ नेताही आता या प्रदेशांकडे जास्तीचे लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगत आहे. फडणवीस विदर्भाचे पुत्र आहेत आणि आता ते उघडपणे सांगत नसले तरी विदर्भवादी आहेत. विदर्भासारख्याच अन्य वंचित प्रदेशांच्या मागण्या व गरजा गेली अनेक दशके रखडल्या आहेत. त्यात हजारो कोटींचा अनुशेष आहे, कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या आहेत, कुपोषणाने मरणाऱ्या मुलांची संख्या मोठी आहे, दळणवळणातील रेल्वे व रस्त्यांचे अपुरेपण आणि नादुरुस्त असणे आहे. बेरोजगारी आहे आणि शिक्षणाच्या संधीचे अपुरेपण आहे. या समस्यांची दुसऱ्या कुणी फडणवीसांना ओळख करून देण्याची गरजही नाही. त्यांच्या आकडेवारीनिशी त्या त्यांना मुखोद्गत आहेत. प्रश्न, प. महाराष्ट्र, मुंबई व पुण्याच्या टीकाकारांकडे दुर्लक्ष करून आपले सामर्थ्य व सत्ता या अविकसित प्रदेशांच्या विकासाकडे वळविण्याचाच तेवढा आहे. विदर्भाला वा मराठवाड्याला जरासेही झुकते माप सरकारकडून मिळाले की तिकडचे पुढारी आणि माध्यमे त्यावर पक्षपाताचा आरोप एखाद्या कांगाव्यासारखा करतात. मात्र एवढी वर्षे त्यांच्या बाजूला जे आले त्याच्या तुलनेत या अविकसित क्षेत्रांना काय मिळाले याचा हिशेब ते कधी करीत नाहीत. काही काळापूर्वी एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत राज्याचे एक माजी मुख्यमंत्री म्हणाले, ‘मुंबईतील माणसांचे दरडोई वार्षिक उत्पन्न ९४ हजारांचे, पुण्यात ८४ हजारांचे, नाशकात ७४ हजारांचे असे पूर्वेकडे क्रमाने कमी होत जाऊन ते गडचिरोलीत १७ हजारांच्या खाली जाते’. यातले वास्तव कमालीचे कटू आणि राज्याच्या समतोल विकासाची भाषा बोलणाऱ्यांना जागे करणारे आहे. गोसेखुर्द २३ वर्षापासून अपूर्ण आहे. वर्धा योजना तशीच राहिली आहे. मिहानचे उड्डाण अजून जमिनीवर आहे. वैद्यकीय व शैक्षणिक क्षेत्राचे अपुरेपण आहे. औद्योगिक वसाहती ओसाड आहेत आणि रोजगारात वाढ होताना येथे दिसत नाही. फडणवीसांना गडकरींची मजबूत साथ आहे. मंत्रिमंडळातील सारे मंत्री (एखाद्या मुंडे व खडसेंचा किंवा शिवसेनेचा अपवाद वगळता) त्यांच्यामागे भक्कमपणे उभे आहेत. एकजुटीच्या या बळाचा परिणाम राज्याच्या अविकसित भागाला आता जाणवून देण्याची गरज आहे. वय बाजूने आहे, केंद्र मागे आहे, लोकप्रियता शाबूत आहे आणि दीर्घकालीन राजकीय प्रवासाचे ते मानकरीही आहेत. एवढ्या साऱ्या बाबी सोबत असताना टीकाकारांची वा आधीच भरपूर पुढे गेलेल्यांच्या रुसव्या फुगव्याची भीती न बाळगता अविकसित व उपेक्षित क्षेत्रांच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी त्यांचे नेतृत्व, सामर्थ्य, तारुण्य आणि विकासाभिमुख दृष्टिकोन हिकमतीने व कौशल्याने राबविण्याची गरज आहे. गोरगरिबांचा आशीर्वाद, राजकारणातही फळत असतो. तो त्यांना लाभावा ही त्यांना साभिनंदन सदिच्छा.
देवेंद्र फडणवीस : अभिनंदन आणि अपेक्षा
By admin | Updated: July 22, 2016 04:36 IST