रघुनाथ पांडे -
नाग, अंबा, अरुणावती, पैनगंगा, मांजरा, सावित्री, शास्त्री, उल्हास, कृष्णा, वैनगंगा, अशा त्या दहा जणी एकत्र येताच त्यांची कुजबुज सुरू झाली. महाराष्ट्रातील १० नद्यांमधून वाहतूक करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिल्याचे परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केल्याची बातमी सावित्रीने वाचून दाखवली. ती ऐकतानाच एकीचे लक्ष तिच्या दोन्ही किनाऱ्यावर गेले. तिच्या मनातील खळबळ लगोलग इतरांना जाणवली आणि मग साऱ्यांनीच त्यांच्या अंगाखांद्यावर काय काय येऊन पडत आहे याची कैफीयत मांडली. काही दशकांपूर्वी गदिमांनी जिचं वर्णन ‘संथ वाहते कृष्णामाई’ असं केलं होतं ती कृष्णामाई खडबडून जागी होत म्हणाली, ‘कधी होईल या जाचातून सुटका?’ पण त्याला उत्तर नव्हतंच!इतकी वर्षे पाण्यातील आपले रडणे कुणाला दिसलेच नाही, मग आता काय करायचे, असा प्रश्न नाग नदीने केला. वैनगंगेने एक कोरा कागद तिच्याच पुढे धरला, आणि म्हटले लिही गडकरींना पत्र. आपली व्यथा त्यांना ठाऊक असल्याने कॉर्पोरेट स्टाइलने थेट मुद्द्याचेच लिही, अशी सूचक टिपणी करताच नागपूरच्या नागनदीने पत्र लिहायला घेतले.प्रिय नितीनभाऊ,नद्यांमधून वाहतूक करून पर्यटनासह उद्योग व्यवसाय व रोजगारास गती देण्याची आपली योजना वाचली. त्याबद्दल आपले अभिनंदन. या योजनेमुळे तीन गोष्टी होतील. पहिली, आमच्या सुख-दु:खाची जाणीव लोकांना होईल. दुसरी, सरकारला आमच्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळेल. तिसरी, आमच्या अंगाखांद्यावर खेळणाऱ्यांना रोजगाराच्या संधी आमच्याच माध्यमातून मिळणार असल्याने आमची उपयोगिताही त्यांच्या ध्यानात येईल. नितीनभाऊ, ‘इको फ्रेंडली ट्रान्स्पोर्ट’ हा तुमचा ड्रीम प्रॉजेक्ट असल्याने तसेच रस्ते, रेल्वे, विमान यापेक्षा अत्यंत माफक दराने जलवाहतूक शक्य असल्याने पैशाचीच मस्ती असलेल्या व्यवहारचतुर माणसांना (मग भलेही संस्कृतीच्या जगात आम्ही आईच्या जागी असलो तरी) आम्ही प्रिय वाटायला लागू. खरं तर माणसांच्या लक्ष्मीप्रेमामुळे पुढच्या काळात लोप पाऊ शकणाऱ्या आम्ही आता ‘आयसीयू’मध्ये असलो तरी तुमच्यामुळे जगण्याची उमेद बाळगून आहोत. नितीनभाऊ, आमच्या काही समस्या आहेत, त्या तुम्ही दूर करा. ‘गोदा, कृष्णा, भीमा तुझिया ललाटीच्या रेषा’ असं आम्हा भगिनींचे गोविंदाग्रजांनी केलेले वर्णन आता इतिहास जमा होण्याची वेळ आली आहे. इंद्रायणी, चंद्रभागा, गोदावरी या आमच्या भगिनींना वैकुंठात स्थान मिळाले असले तरी प्रत्यक्षात त्यांची अवस्था फार दयनीय आहे. पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकरांनी नदीचं पालकत्व एखाद्या विभागाकडे देण्याबाबत विचार करू, वाळू उपशाची उपग्रहामार्फत देखरेख करण्याचा प्रयत्न करू, अशा घोषणा केल्या. पण पुढे काय झाले? दुष्काळ पडणाऱ्या आपल्या महाराष्ट्रात २० हजार कि.मी. लांबीच्या एक-दोन नव्हे, तब्बल ४०० नद्या आहेत. पण त्यांची पर्वा कुणाला? गाळाने उथळ झालेल्या लहान-मोठ्या नद्या पावसाळ्यात शेतीत व गावात शिरतात. नासधूस होते. केंद्राने देशातील २७ राज्यांतील १५० नद्यांचे प्रदूषण कमी करण्यासाठी दोन वर्षांपूर्वी ४०४५ कोटींच्या केलेल्या तरतुदींपैकी राज्यातील २८ प्रदूषित नद्यांच्या वाट्याला १०६.९४ कोटी मिळाले होते. त्यातील ५२ कोटी रुपये म्हणे प्रशासकीय फायलींवरच खर्च झाले. राज्यातील नद्या साफ करण्यासाठी नऊ हजार कोटी लागतील. एवढा खर्च सरकार नक्कीच करणार नाही. देशात प्रथमच महाराष्ट्रात जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाची स्थापना झाल्याने आम्ही जगू असा आम्हाला विश्वास आहे. पण हेही माहिती आहे की, आमचे रूपडे लंडनच्या थेम्ससारखे होणे नाही. पण पंजाबमधील काली बैन किंवा राजस्थानची अरवरी तरी होऊ द्या. तुम्ही बोलता ते करता म्हणून आता तुम्हीच इलाज सुचवा.नितीनभाऊ एक सांगतो, नागपूरचे भोसले राजे विजयादशमीच्या सकाळी घोडे, हत्तींना बर्डीच्या संगमावर आंघोळीसाठी आणत. हत्ती बुडू शकेल इतके खोल पाणी संगमावर होते. आज काय स्थिती आहे तुम्ही जाणताच. साऱ्याच नद्यांचे दु:ख थोडेबहुत असेच आहे. तुमची योजना उत्तम आहे, तिला बळ मिळावे. म्हणून हा प्रपंच. वाचवा आम्हाला, तुमच्याचमायभगिनी...