शहरं
Join us  
Trending Stories
1
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
4
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
5
Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट
6
भयंकर! ३२ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; दोन आठवड्यानंतर घरात आढळला मृतदेह, चाहत्यांना धक्का
7
Trump Tariff: धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
8
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट
9
मेट्रो प्रकल्पाला गती देण्यासाठी २५० परप्रांतीय मजूर मुंबईत दाखल; काहींना विमानाने मुंबईत आणले
10
ही तर सोनमपेक्षा एक पाऊल पुढे! बॉयफ्रेंडसाठी पतीला विष दिलं अन् कुणालाही कळण्याआधी केला खेळ खल्लास!
11
Stock Market Today: ७६ अंकांनी घसरून उघडला सेन्सेक्स; ३ सेक्टर्समध्ये तेजी, का अस्थिर आहे मार्केट?
12
भारत बंद होण्याआधीच इंडिया आघाडीचा चक्का जाम; बिहारमध्ये निवडणूक आयोगाविरोधात रस्ते बंद, रेल्वे रोखल्या
13
Pension Scheme: वृद्धापकाळात दरमहा ₹२०,५०० चं पेन्शन देईल ही स्कीम; पाहा याचे जबरदस्त ५ फायदे
14
Alia Bhatt : अभिनेत्री आलिया भटच्या माजी पर्सनल असिस्टंटला अटक; ७६ लाखांच्या फसवणुकीचा गंभीर आरोप
15
"मृणालची इमेज खराब होणार नाही अशी आशा", अजय देवगणसोबतचा डान्स पाहून केलं ट्रोल
16
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
17
लग्नाच्या पहिल्या रात्रीच पती नपुंसक असल्याचे समजले, तिने मोठ्या जावेला सांगितले, मग दीर आला...
18
Sanjay Gaikwad : आमदार संजय गायकवाडांचा राडा, आमदार निवास कँटिनमधील कर्मचाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण
19
स्मृती ईराणींचा राजकारणातून अभिनयाकडे युटर्न, १७ वर्षांनंतरच्या कमबॅकवर म्हणाल्या- 'पार्ट टाइम अ‍ॅक्ट्रेस'
20
लग्नाच्या ३ वर्षांतच पायल रोहतगीचा होणार घटस्फोट? ७ वर्ष लहान कुस्तीपटूशी थाटलेला संसार

सर्वसमावेशक विचारसरणीच शाश्वत राहू शकते

By admin | Updated: March 5, 2017 23:26 IST

गेल्या काही दिवसांत देशात विचारसरणीवरून जोरदार वादंग सुरू आहे.

गेल्या काही दिवसांत देशात विचारसरणीवरून जोरदार वादंग सुरू आहे. जी अन्य सर्व विचारसरणींचे समूळ उच्चाटन करण्याची भाषा करते, अशी एक विचारसरणी जोराने फोफावताना दिसत आहे. मी लहानपणापासून या परिपक्व वयापर्यंत अनेक गोष्टी अनुभवल्या. १८ वर्षे मी राज्यसभेत होतो. तेथे मी विचारसरणी पाहिल्या-ऐकल्या. तेथे भिन्न विचारसरणीचे लोक एकमेकांना खोटे ठरविण्यासाठी धडपडत असल्याचे मी पाहिले. परंतु सध्या अनुभवास येत असलेल्या विचारसरणींमधील टक्कर मला जरा चिंताजनक वाटते. कारण यावेळी प्रतिस्पर्धेची जागा भयंकर अशा सूडाने घेतल्याचे दिसत आहे. याआधीही विचारसरणींची खूप भांडणे झाली. पण आपली सोडून इतर विचारसरणी नष्ट करण्याची भाषा कधी केली गेली नव्हती. ही जी नवी विचारसरणी फोफावत आहे तिच्यात कमालीची उत्तेजना आहे. तिच्यात इतरांचे म्हणणे ऐकून घेण्याची ना इच्छा आहे, ना कुवत. याचा परिणाम असा झाला आहे की, या विचारसरणीचे लोक सभ्यतेची मर्यादा सोडायला तत्परतेने तयार असतात. एखाद्या महाविद्यालयात किंवा विद्यापीठात विरोधाचा एखादा शब्द जरी उच्चारला गेला तरी ते लगेच मारहाण करण्यास सरसावतात. या विचारसरणीच्या उतावीळ लोकांना सत्ताधाऱ्यांचे पाठबळ असावे, अशी शंकाही निर्माण होते. ही खरोखरच धोकादायक परिस्थिती आहे. लोकशाहीत विचारांना फार महत्त्व असते. पण शब्दच अर्थ गमावून बसणार असतील तर लोकशाहीचे रक्षण कोण करणार? हरतऱ्हेच्या विचारसरणीस वाव असणे हेच लोकशाहीचे खरे गमक आहे. लोकशाहीचा स्वभाव सहिष्णू असायला हवा. लोकशाहीतही कट्टरता वरचढ होत असेल तर आपण रस्ता चुकतो आहोत, असे समजायला हवे. मग योग्य मार्ग कोणता? या नव्या उत्तेजनापूर्ण नव्या विचारसरणीच्या पुरस्कर्त्यांना हे जाणून घ्यायला हवे की, कोणत्याही विचारसरणीसाठी उत्तेजना आत्मघातकी आहे. इतिहासात अशा हजारोंच्या संख्येने विचारसरणी निर्माण झाल्या. काही धर्माच्या नावाने, काही वंशाच्या नावाने तर काही निव्वळ स्वार्थासाठी. परंतु अशा विचारसरणी अकाली लयाला गेल्याचे दिसते. याचे कारण असे की, या विचारसरणींमध्ये दुसऱ्यांना सामावून घेण्याची जागाच नव्हती. असंख्य बाबांनी आपापल्या नावाने विचारसरणी निर्माण केली. पण त्यांच्यापैकी कोणी अजरामर होऊ शकला नाही; मात्र ज्या विचारसरणींनी इतरांच्या विचारांना सामावून घेण्यासाठी जागा ठेवली त्यांची इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद झाली. भगवान गौतम बुद्ध, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणी ही अशी उदाहरणे आहेत. या विचारसरणी आजही प्रवाही आहेत व त्या आपल्याला मार्गदर्शन करीत असतात. भगवान महावीरांनी कधीच कोणाला चुकीचे म्हटले नाही. उलट त्यांची विचारसरणी चुकलेल्यांना योग्य मार्गावर आणण्याची शिकवण देते. त्यांची विचारसरणी अखिल मानवतेसाठी होती. त्यांच्या विचारांमध्ये व्यापकता होती म्हणूनच ते जगात आजही वंदनीय आहेत.आता जरा आधुनिक काळातील सर्वात प्रभावी अशा विचारसरणीचा विचार करू. ही विचारसरणी होती महात्मा गांधींची. गांधीजींच्या विचारसरणीत अनेक विचारसरणींचा संगम होता, हे आपल्याला माहीत आहे का? इंग्लंडमध्ये शिकत असताना गांधीजींनी सर एडविन अर्नाल्ड यांनी भाषांतरित केलेली गीता वाचली. या गीतेमधील दृष्टिकोनानेच गांधीजींना कर्मयोगी बनविले. गांधीजींनी रामायण व महाभारताखेरीज जैन आणि बौद्ध धर्माच्या अनेक ग्रंथांचे अध्ययन केले होते. या अध्ययनानेच त्यांच्यात सत्य, अहिंसा व अपरिग्रहाविषयी आस्था दृढ झाली. न्यू टेस्टॅमेंट आणि सर्मन आॅन दि माऊंट या ख्रिश्चन धर्मग्रंथांनीही गांधीजींचे विचार प्रभावित केले. येशू ख्रिस्ताला जेव्हा सुळावर चढविले गेले तेव्हा त्याने अनन्वित छळ करणाऱ्यांना शिव्याशाप दिले नाहीत. उलट त्याने ‘परमेश्वरा, यांना माफ कर. कारण आपण काय करीत आहोत हे त्यांना कळत नाही’, असे म्हणून त्यांच्याविषयी करुणा दाखविली. महात्मा गांधींना अहिंसक प्रतिरोध-सत्याग्रहाची प्रेरणा येशूच्या याच शब्दांतून मिळाली. जॉन रस्किन, हेन्री डेव्हिड थोरो आणि लिओ टॉलस्टॉय या तीन तत्त्वचिंतकांचा गांधीजींवर मोठा प्रभाव होता. त्यांनी सविनय कायदेभंगाची प्रेरणा थोरोंकडून घेतली. जॉन रस्किन यांच्या ‘अनटू धिस लास्ट’ या पुस्तकाने त्यांना शारीरिक श्रमाचा आदर करण्याची शिकवण दिली. ईश्वराचे साम्राज्य आपल्या सर्वांमध्ये विराजमान आहे, या टॉलस्टॉयच्या विचाराने त्यांची आस्तिकता अधिक दृढ केली. गांधीजींच्या विचारसरणीत किती व कोणती तत्त्वे सामील होती हे स्पष्ट करण्यासाठी मी गांधीजींविषयी ही चर्चा केली. सांगण्याचे तात्पर्य एवढेच की, कोणतीही विचारसरणी ही अनेक विचारांच्या संगमातून बनलेली असते. विचारधारा या शब्दाची फोड केली तर हे सहज लक्षात येते. यात ‘विचार’ आणि ‘धारा’ असे दोन शब्द आहेत. नद्यांकडे पाहिले तर हे अधिक स्पष्ट होईल. गंगा हिमालयात उगम पावते तेथे तिचा प्रवाह अगदी लहान असतो. पुढे याच गंगेचे पात्र उत्तर प्रदेश, बिहार व पश्चिम बंगालमध्ये विस्तीर्ण होते. हे कसे होते? वाटेत गंगा अनेक उपनद्यांना सामावून घेऊन पुढे पुढे जाते. सागराला जाऊन मिळेपर्यंत तिचे हे सर्वांना सामावून घेणे सुरू असते. आपण अमरकंटकला जाऊन पाहिलेत तर तेथे तुम्हाला नर्मदा नदीचे स्वरूप एका कुंडातून बाहेर पडणाऱ्या छोट्याशा जलधारेसारखे दिसेल. पण तीच नर्मदा गुजरातला पोहोचेपर्यंत अत्यंत व्यापक होते. इतर नद्यांना सामावून घेण्यामुळे हे होते, हे उघड आहे. असे झाले नसते तर या नद्या अखंडपणे प्रवाहित राहूच शकल्या नसत्या. विचारांचेही नेमके असेच असते. इतरांच्या विचारांचा सन्मान केला तरच विचारांची विचारधारा होऊ शकेल व ती कायम प्रवाही राहू शकेल.हे लिखाण संपविण्यापूर्वी...अमेरिकी राजकीय अर्थतज्ज्ञ निकोलस एबरस्टाट यांचे एक नवे पुस्तक आले आहे,‘ दि डेमोग्राफिक फ्युचर’. या पुस्तकात निकोलस लिहितात की, सन २०३० पर्यंत चीनमध्ये वयाची तिशी ओलांडलेल्या तरुणांपैकी एक चतुर्थांशाहूनही अधिक तरुण अविवाहित असतील. सन २०२० पर्यंत चीनमध्ये अविवाहितांची संख्या तीन कोटींहून अधिक असेल, अशीही आणखी एक बातमी आहे. चीन सरकारने सन २०१५ पर्यंत ‘एक अपत्य’ धोरण कठोरतेने राबविले. याने परिणाम असा झाला की, आता तेथे मुली व मुलांचे गुणोत्तर शंभरामागे १२६ असे विषम आहे. ग्रामीण भागात तर मुलांना लग्नासाठी मुलीच मिळत नाहीत. अनेक गावांमध्ये ४० टक्के तरुण अविवाहित आहेत. ही स्थिती चीनची असली तरी आपणही त्यावरून सावध व्हायला हवे. आपणही मुलगाच हवा हा हव्यास सोडला नाही व मुलींविषयीचा दृष्टिकोन बदलला नाही तर भारतातही अशी अवस्था यायला फार काळ जावा लागणार नाही.-विजय दर्डा(लोकमत पत्र समूहाचे चेअरमन)