रस्ते खड्ड्यात अन् रेल्वे मार्ग अधांतरी़़़ हवाई वाहतूक हवेत हे मराठवाड्याच्या दळणवळणाचे दळण घोषणांपलीकडे जात नाही़ एकही निमआराम एसटी धावत नाही अन् सरकार सांगते महाराष्ट्र घडतोय़़़मराठवाड्यातील हवाई वाहतूक हवेत, रस्ते खड्ड्यात अन् रेल्वेमार्ग अधांतरी, असे दळणवळणाचे दळण संपता संपत नाही़ आश्वासने अन् घोषणांपलीकडे काही मिळत नाही़ त्यातच जाहीर केलेली रेल्वे वर्षभरानंतर सुरू होते़ ट्रॅव्हल्स चालकांच्या हितसंबंधामुळे चक्क रेल्वेचे वेळापत्रक बिघडविले जाते़ घोषणेच्या वर्षभरानंतर सुरू झालेल्या नांदेड-पुणे-पनवेल रेल्वेने पडद्यामागच्या अशाच काही भानगडी चर्चेत आणल्या आहेत़मागील अनेक वर्षांपासून पुण्यासाठी सोयीची ठरेल अशी रेल्वेसेवा सुरू करण्याची मागणी व्यापारी, उद्योजक व विद्यार्थी करीत होते़ ज्याचा लाभ नांदेड, गंगाखेड, परळी, लातूरला होईल़ त्यासाठी माजी मुख्यमंत्री खा़अशोकराव चव्हाण यांनी सातत्याने पाठपुरावाही केला़ अखेर वर्षभराच्या विलंबाने का होईना, मंजूर झालेली रेल्वे अखेर या आठवड्यात धावली़ त्याबद्दल रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना धन्यवादच दिले पाहिजेत़ मात्र त्याच वेळी रेल्वेचे वेळापत्रक बिघडवित काही ट्रॅव्हल्स चालकांचे भले करणाऱ्या यंत्रणेची चौकशी कधी होणार हा प्रश्न अनुत्तरीत आहे़ मराठवाड्यातील खासदारांनी हा प्रश्न वारंवार उचलून धरला़ खा़ चव्हाण यांनी तर थेट रेल्वे अधिकारी अन् काही खाजगी बस मालकांचे आर्थिक हितसंबंध गुंतल्याचा आरोप केला़ त्याची सीबीआयमार्फत चौकशी करा, अशी मागणी केली़ एकूणच मराठवाड्यातील रेल्वे मार्गांचे त्रांगडे कायम आहे़ नगर-बीड-परळी रेल्वे मार्ग २०१६ पर्यंत पूर्ण होणार होता़ नंतर २०१७ ची घोषणा झाली़ आता तो २०१९ ला पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे़ त्यासाठी अहमदनगर व बीड या दोन्ही बाजूंनी काम सुरू झाले पाहिजे़ सध्या केवळ नगरच्या दिशेने काम सुरू आहे़ तसेच दोन धार्मिक स्थळे जोडणाऱ्या नांदेड-देगलूर-बिदर या रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण झाले़ मात्र हा मार्ग फायद्याचा नसल्याचे कारण पुढे करीत सर्वेक्षण रद्द केले आहे़ धार्मिक स्थळे जोडणारी विशेष बाबही रेल्वे मंत्रालयाने लक्षात घेतली नाही़ नांदेड-लातूर रोड या नव्या रेल्वे मार्गाचे सर्वेक्षणही थंडबस्त्यात आहे़ मराठवाडा जनता विकास परिषद सातत्याने मराठवाड्यातील रेल्वे प्रश्नावर पाठपुरावा करते़ नांदेड-देगलूर-बिदर रेल्वे मार्गाचे नव्याने सर्वेक्षण करावे, ही भूमिका परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ़व्यंकटेश काब्दे यांनी मांडली आहे़ सदर मार्ग लाभाचा नाही, हे दाखविताना चुकीच्या पद्धतीने सर्वेक्षण केले गेले, असा आरोप रेल्वे प्रवासी संघटनांचा आहे़ लोहमार्ग रखडलेले अन् रस्ते उखडलेले अशी स्थिती आहे़ मराठवाड्यात बहुतेक ठिकाणी अतिवृष्टी झाली, त्याच्या आधीपासून रस्त्यांवर दिसणारे खड्डयांचे डबके आता तलावांच्या स्वरुपात पहायला मिळत आहेत़ त्याचे उत्तम उदाहरण नांदेड-नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर नांदेड ते यवतमाळ दरम्यान दिसते़ त्याचा सर्वाधिक फटका नवरात्रोत्सवात माहूरच्या देवीला जाणाऱ्या राज्यातील भाविकांना बसला आहे़ एकीकडे राज्यशासन रोज अमुक किलोमीटर रस्ते उभारले जात आहेत, असा दावा करीत आहे़, तर दुसरीकडे रस्त्यांचे खड्डेही बुजत नाहीत़ हीच स्थिती मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांना जोडणाऱ्या रस्त्यांची आहे़ जिथे रेल्वे मार्ग अन् रस्त्यांची दुरवस्था तिथे नांदेड-लातूरची विमानतळे शोभेची होणार, यात नवल कसले़ सर्वसामान्य प्रवाशांच्या हक्काची एसटीसुद्धा खिळखिळी झाली आहे़ मराठवाड्यातील प्रमुख जिल्ह्यांमधून निमआराम बसेस धावत नाहीत़ एकीकडे नांदेड-परभणी-हिंगोली-लातूरमधून ३०० पेक्षाही अधिक खाजगी बसेस एकट्या पुण्याकडे जातात़ त्याचवेळी प्रवासी संख्येचे कारण देवून एसटी मात्र निमआराम बसेसचा आराम मराठवाड्याच्या वाट्याला मिळू देत नाही़ दहा वर्षे वापरलेल्या खिळखिळ्या एसटी बसेसमधून प्रवास करणारी सामान्य जनता निमुटपणे सहन करते़ सरकार मात्र महाराष्ट्र घडतोय सांगत फिरते़ - धर्मराज हल्लाळे
दळणवळणाचे दळण
By admin | Updated: October 19, 2016 06:39 IST