माझी आई म्हणायची, एखादी व्यक्ती बेछूट वागू लागली की, ह्याला धरबंध नाही ! आपल्या सगळ्यांनाच बरेच काही सांगायचं असतं. पण सांगता येत नाही. मग माणूस मूक प्रतिक्रिया देतो वा जे सांगायचं, त्याच्या नेमकी विरुद्ध कृती करतो. आम्ही शतकानुशतके फार अन्याय सहन केला असं प्रत्येक जण, प्रत्येक जात, धर्म, पक्ष सांगत असतोे. पण अन्याय कुणी केला ह्याची जबाबदारी कुणी घेत नाही.माणूसच उद्धट बेछूट होतो आणि माणसाला तर मारतोच पण त्यानेच निर्माण केलेल्या मानवनिर्मित साधनांची नासधूस, तोडफोड करतो. हे करताना माणूस बेताल होत जातो. त्यातून त्यात घोषणा तेल टाकीत राहतात. हे व्हायलाच पाहिजे, केलंच पाहिजे. ह्या ‘च’ ने आपल्या राष्ट्राचं, देशाचं फारच नुकसान केले. खरं तर अमुक एक सुधारणा, नियम, घटना, कृती ‘व्हायला पायजेल’ ह्याचा अर्थ आपण सर्वांनी सहमतीने, सहिष्णुतेने ही कृती करायला पाहिजे असा होतो. पण अलीकडे सहमतीने, समन्वयाने होतो भ्रष्टाचार अपहार! जो कुणी तो करीत नाही वा त्याला विरोध करतो तो माणूस नालायक ठरतो. नकोसा ठरतो. आपण इतके बधिर, हलकट होत चाललो आहोत. चार-दोन बस, इतरांनी हप्ते देऊन घेतलेल्या गाड्या, घरे सहज जाळताना काहीच वाटत नाही. राष्ट्रीय संपत्ती हा शब्दही आपल्या कोशात नाही. कारण जर मी सत्ताधीश नाही तर जो आहे तो माझा मित्र असूच शकत नाही. तेव्हा शासन, अनुशासन, प्रशासन सर्वांना अडचणीत आणून ते किती अपयशी आहेत हे दाखवून देण्यात आम्हाला शौर्य आहे.आपल्याला बंद सहज पुकारता येतो पण बंद बंद करता येत नाही. बंद काय व्हायला हवे? आपापसातील मतभेद, भांडणं, द्वेष, मत्सर, कुरघोडी हे बंद व्हायला हवेत. जातीचे भडकवणे बंद व्हायला हवे. शहर अत्याचारांनी पुरते घायाळ झाल्यानंतर शांतीचे संदेश काढत शहराच्या जखमांवर कोरडी शब्दफुले वाहण्यापेक्षा ह्या बंदची कारणे शोधायला हवीत. उच्छाद मांडणाऱ्या शक्ती शोधायला हव्यात. ज्ञानेश्वरांनी पसायदानात हेच सांगितलं. त्यांनी दुष्टाला मारून टाका, जाळून टाका, त्याचा खून करा असं नाही सांगितलं. ज्ञानेश्वर म्हणाले,जे खळांची व्यंकटी सांडो।तया सत्कर्मी रती वाढो । भूता परस्परे पडो । मैत्र जिवांचे ।।हे जिवांचे मैत्र माउलीला हवे. दुरितांना मारू नका तर त्यांचे तिमिर दूर करा तेव्हाच विश्व स्वधर्म सूर्य पाहील.हो! स्वधर्म म्हणजे हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन, बौद्ध नाही, स्वधर्म म्हणजे अखिल मानवधर्म! तो जपायला हवा. माणूस माणसाशी बोलता चालता हसता खेळता राहावा. मग शांततेसाठी बंद करण्याची गरज पडणार नाही. जो स्वर बंद केला जातो तो उफाळून येत असतो. म्हणून मनभेद बंद केले तर मोबाइल बंद करण्याची वेळ येणार नाही. चला, खुल्या मनाने हस्तांदोलन करू या!-किशोर पाठक
बंद
By admin | Updated: October 17, 2016 05:02 IST