सावंतवाडीचे प्रख्यात चित्रकार सावळाराम लक्ष्मण हळदणकर यांच्या एका जगप्रसिद्ध चित्राची कथाही दंतकथा बनली आहे. त्यांनी १९३२ मध्ये आपल्या पंधरा वर्षांच्या गीता या कन्येला समोर उभे करून जगप्रसिद्ध चित्र रेखाटले. ती गीता गेल्या दि. २ फेबु्रवारी रोजी वयाची शंभरी पार करताना या सर्व दंतकथेला उजाळा मिळाला.एखाद्या व्यक्तीची कला इतकी सुप्रसिद्ध होते की, तिची एक दंतकथाच बनते. त्या दंतकथेतील पात्रेही त्याचाच भाग बनतात. तीसुद्धा प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचतात. अजिंठा असो की वेरूळ, ताजमहाल असो की गोलघुमट, त्यातील कलेचा इतिहास तयार होतो. सावंतवाडीचे प्रख्यात चित्रकार सावळाराम लक्ष्मण हळदणकर यांच्या एका जगप्रसिद्ध चित्राची कथाही दंतकथा बनली आहे. विशेष म्हणजे, त्या चित्रातील पंधरा वर्षांच्या मुलगीच्या चेहऱ्यावरील भावही जगप्रसिद्ध झाले आहेत. सावळाराम हळदणकर मूळचे सावंतवाडीचे. त्यांनी १९३२ मध्ये आपल्या पंधरा वर्षांच्या गीता या कन्येला समोर उभे करून जगप्रसिद्ध चित्र रेखाटले. ती गीता गेल्या दि. २ फेबु्रवारी रोजी वयाची शंभरी पार करताना या सर्व दंतकथेला उजाळा मिळाला. गीता हळदणकर यांचा विवाह कोल्हापुरातील उपळेकर घरात झाला. त्या गीता उपळेकर म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या आणि गेली ऐंशी वर्षे त्या कोल्हापुरात वास्तव्यास आहेत. सावळाराम हळदणकर हे प्रख्यात चित्रकार होते. त्यांनी अनेक प्रसिद्ध चित्रे काढली. त्यामध्ये सर्वाधिक लोकप्रिय झालेले चित्र ‘ग्लो आॅफ होप’ म्हणून नावाजले गेले. हे चित्र आजही म्हैसूरचे राजे वडियार यांच्या जगनमोहन पॅलेसमध्ये आहे. ते चित्र जेवढे प्रसिद्ध आहे, तेवढीच त्याच्या प्रवासाची कहानीदेखील प्रसिद्ध आहे. गीता हिला समोर ठेवून चित्र रेखाटले. ते सर्वांना खूपचे आवडले. सावळाराम यांना ते विकायचे होते; मात्र त्याला मोठी किंमत मिळत नव्हती. अखेर म्हैसूरचे राजे आणि जगनमोहन पॅलेसचे कर्ते राजा जयचमाराजेंद्रा वडियार यांनी रु. ३०० देऊन खरेदी केले. तेव्हापासून हे चित्र जगनमोहन पॅलेसच्या आर्ट गॅलरीत लावण्यात आले. हा सर्व इतिहास असताना हे चित्र मात्र राजा रविवर्मा यांचे आहे, असे अनेक वर्षे प्रसिद्धीस पावले होते. कारण या आर्ट गॅलरीमध्ये राजा रविवर्मा यांची सोळा चित्रे ठेवण्यात आली आहेत. त्यापैकीच हे जगप्रसिद्ध ‘ग्लो आॅफ होप’ चित्रही राजा रविवर्मा यांचेच आहे, असे सांगितले जात होते. अलीकडेच या आर्ट गॅलरीतील नोंदीनुसार हे चित्र राजा रविवर्मा यांचे नसून, सावंतवाडीचे प्रख्यात चित्रकार सावळाराम हळदणकर यांचे आहे, हे स्पष्ट झाले आहे. जलरंगातील जगातील तीन सर्वोत्कृष्ट चित्रे मानली जातात, त्यापैकी एक अशी ओळख असलेले ‘ग्लो आॅफ होप’ चित्र आहे. त्यातील प्रेरणादायी चेहरा गीताताई यांचा आहे. सावळाराम यांच्या या कन्येचा विवाह कोल्हापूरचे प्रसिद्ध सराफ कृष्णकांत उपळेकर यांच्याशी झाला. त्या गीताताई उपळेकर म्हणजे म्हैसूरच्या आर्ट गॅलरीतील जगप्रसिद्ध चित्रातील कन्या आहेत. त्यांना दीर्घायुष्य लाभले. त्यांनी नुकताच शंभरावा वाढदिवस घरगुती समारंभात साजरा केला. काही वर्षांपूर्वी कोल्हापुरात आयोजित करण्यात आलेल्या कला महोत्सवात गीताताई यांचा विशेष सत्कार करण्यात आला होता. त्यावेळी त्या या चित्राची दंतकथा स्वत:च सांगत होत्या, तेव्हा एका शतकाची वाटचाल समोर चित्रांसारखी तरंगत होती. आजही आपणास म्हैसूरच्या आर्ट गॅलरीत या जलरंगातील चित्राची जादूमयी कला पाहावयास मिळते. १९३२ मध्ये काढलेल्या या चित्रातील कन्या गीताताई यांनी वयाची शंभरी पार केली. आणखीन सतरा वर्षांनी त्या चित्रासही शंभर वर्षे होतील. सावळाराम हळदणकर यांच्या कलेस आणि गीतातार्इंच्या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वास अभिवादन!- वसंत भोसले
‘ग्लो आॅफ होप’च्या गीतातार्इंची शंभरी
By admin | Updated: February 10, 2017 02:31 IST