लोकसभेच्या निवडणुकीत देशाला लागलेला व तिच्या निकालानंतर चढलेला मोदींचा भगवा ज्वर आता उतरू लागला आहे. उत्तराखंडात झालेल्या विधानसभेच्या तीन पोटनिवडणुका त्यांच्या पक्षाने गमावल्यानंतर नुकत्याच झालेल्या बिहार, पंजाब व कर्नाटकातील पोटनिवडणुकीतही त्याला लागलेली ओहोटी कायम राहिल्याचे दिसले आहे. बिहारमधील दहा निवडणुकांपैकी सहा जागांवर नितीशकुमार आणि लालूप्रसाद यांच्या आघाडीने प्रचंड बहुमताने विजय मिळवून भाजपाच्या वाट्याला फक्त चार जागा शिल्लक ठेवल्या. या विजयाचे वैशिष्ट्य हे, की आघाडीचे उमेदवार १७ ते ४७ हजार मतांची आघाडी घेऊन विजयी झाले आहेत. या बहुसंख्य जागांवर लोकसभेत भाजपाला आघाडी मिळाली होती, हे विशेष. या विजयावर भाष्य करताना नितीशकुमार म्हणाले, की आमच्या एकाच उमेदवाराची आघाडी भाजपाच्या चारही विजयी उमेदवारांच्या आघाड्यांहून मोठी व त्यांना मागे टाकणारी आहे. देशात एकारलेले राजकारण करू पाहणाऱ्यांवर सर्वसमावेशक राजकारण करणाऱ्यांनी मिळविलेला हा विजय आहे आणि देशाला सर्वसहमतीचे राजकारणच मान्य होणारे व तारु शकणारे आहे, असा त्याचा संदेश आहे. कर्नाटकात झालेल्या विधानसभेच्या तीन निवडणुकांपैकी काँग्रेसने दोन जागांवर विजय मिळविला आहे. यातली एक जागा बेल्लारीची असून, लोकसभेच्या निवडणुकीत त्या जागेवर भाजपाला २५ हजारांहून अधिक मोठ्या मतांची आघाडी मिळाली आहे. बेल्लारीचा पराभव भाजपाच्या वर्मी लागणारा आहे. ज्या एका जागेवर भाजपाला विजय मिळविता आला, ती जागा माजी मुख्यमंत्री येदियुरप्पा यांच्या मुलाला मिळाली आहे. या निकालावर भाष्य करताना येदियुरप्पा म्हणाले, या निकालाने आम्हाला निराश केले आहे. मोदींच्या दिल्ली विजयानंतर आपल्याला साऱ्या देशात दिग्विजय मिळविता येईल, या भ्रमात राहिलेल्या भाजपाच्या पुढाऱ्यांची झोप यामुळे नक्कीच उडाली असणार. त्यांना आणखी अस्वस्थ करणारा निकाल पंजाबने दिला आहे. त्या राज्यात झालेल्या दोन पोटनिवडणुकांपैकी पतियाळाची जागा काँग्रेसने प्रचंड बहुमताने जिंकली व ती भाजपाकडून त्या पक्षाने हिसकावून घेतली आहे. दुसरी जागा शिरोमणी अकाली दलाला मिळाली व ती पूर्वीही त्याच पक्षाकडे राहिली आहे. तात्पर्य, उत्तराखंडानंतर बिहार, कर्नाटक व पंजाब या राज्यांतील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या व पर्यायाने भाजपाच्या लोकप्रियतेला उतरती कळा लागली आहे. लोकसभेत २८३ जागा मिळविलेल्या भाजपाच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीला झालेल्या मतदानापैकी केवळ ३१ टक्के मते मिळाली आहेत. मात्र, तेवढ्या मतप्राप्तीच्या जोरावर आपण देश जिंकला असल्याची बढाई तो पक्ष व त्याचे नेते मिरविताना गेल्या तीन महिन्यांत देशाला दिसले आहेत. त्याच बळावर संघाच्या परिवारातील अनेक संघटनांचे पुढारी तोंडाला येईल ती बेछूट विधाने करतानाही देशाने पाहिले आहेत. आता ३७०वे कलम रद्द करू, अशी धमकी देऊन संघाच्या राममाधवांनी काश्मीरच्या जनतेला धास्ती घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर विश्व हिंदू परिषदेच्या प्रवीण तोगडिया यांनी उत्तर प्रदेशातील सहारनपूरच्या जनतेला ‘जरा मुजफ्फरनगर आठवा,’ अशी भीतियुक्त तंबी दिली. पुढे जाऊन प्रत्यक्ष सरसंघचालक मोहन भागवत यांनी भारत हे हिंदू राष्ट्र असल्याची घोषणाच करून टाकली. गोव्याचे भाजपाचे एक ख्रिश्चन मंत्री यांनी या साऱ्यांच्या पुढे जाऊन भारतातले ख्रिश्चन हे हिंदू ख्रिश्चन असल्याचे विनोदी विधान केले. हा सारा मोदीविजयाने आणलेल्या उन्मादाचा उच्छादी परिणाम आहे. मुळात भारत व भारतीय माणूस हा वृत्तीने मध्यममार्गी आहे. त्याला कोणतेही एकांगी, एकारलेले व टोकाचे राजकारण फार काळ मानवणारे नाही. एखाद्या वेळी रागाच्या भरात तो ते राजकारण पसंत करील. मात्र, तो भर ओसरताच तो त्याच्या मूळ व मध्यम पदावर येईल. नेमकी हीच गोष्ट नितीशकुमारांनी आता साऱ्यांच्या नजरेला आणून दिली आहे. भारतीय माणूस व त्यातही बिहारचा माणूस हा देशाचे ऐक्य व देशातील माणसांत समरसता असावी, असे मानणारा आहे व त्याला एकांगी राजकारण मान्य नाही, ही गोष्टच पोटनिवडणुकांच्या या निकालांनी अधोरेखित केली आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. आपल्या पराभवाचे समर्थन भाजपाचे पुढारी व प्रवक्ते व्यवस्थित करतील, यात शंका नाही. मात्र, परिस्थिती फार झपाट्याने बदलू लागली असल्याचे त्यांनीही लक्षात घेणे त्यांच्या पुढील राजकारणासाठी आवश्यक आहे. येत्या तीन महिन्यांत आणखी चार राज्यांत निवडणुका व्हायच्या आहेत. त्यासाठी असा धडा घेणे, ही भाजपाच्या पुढाऱ्यांची गरज आहे.
भाजपाचा ज्वर ओसरला?
By admin | Updated: August 27, 2014 02:08 IST