जहाज बुडू लागले, की त्यावरचे उंदीर सर्वांत आधी पळू लागतात, अशा आशयाचे एक इंग्रजी वचन आहे. काँग्रेसचे जहाज पाण्याखाली जात असलेले दिसताच त्यावरच्या उंदरांनीही पळ काढायला सुरुवात केली आहे. काँग्रेस आणि शरद पवार यांची ‘मरेपर्यंत निष्ठेने’ सेवा करण्याची प्रतिज्ञा केलेले माजी मंत्री, खासदार व आमदार दत्ता मेघे हे त्यांच्या दोन मुलांसकट भाजपामध्ये सामील झाले आहेत. काँग्रेसचे एक माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख त्यांच्या एका मुलाला भाजपात पाठवून व दुसर्याला काँग्रेसमध्ये ठेवून थांबले आहेत. त्यांनी बसपाचाही दरवाजा एकदा ठोठावल्याची चर्चा आहे. वणीचे आमदार वामनराव कासावार यांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला असून, ते पलीकडून येणार्या निमंत्रणाची वाट पाहत आहेत. वध्र्याचे सुरेश देशमुखही तशा पवित्र्यात आहेत आणि प्रफुल्ल पटेलांना दोन वर्षांची खासदारकी देऊन पवारांनी थोपवून ठेवले आहे. पक्षनिष्ठा, विचारांवरील श्रद्धा आणि जुन्या काळी घेतलेल्या आणाभाका या गोष्टी राजकारणात केवढय़ा निर्थक ठरल्या आहेत, याचा प्रत्यय आणून देणार्या या हालचाली आहेत. परक्या घरी जाणारी ही वरात इथवरच थांबणारी नाही. काँग्रेस पक्षही असा सुस्त, की तो यांना थांबवत नाही आणि त्यातली काही कर्मठ व कठोर माणसे म्हणताहेत, जाणार्यांना जाऊ द्या पक्ष स्वच्छ होईल आणि जे उरतील, ते खरे निष्ठावंत असतील. अशा वेळी आपल्याला पडणारे प्रश्न, या पक्षाला आपले निष्ठावंत ओळखायला एवढे दिवस का लागावेत, हा आणि दुसरा, एवढय़ा काळात या तथाकथित निष्ठावंतांनी केलेल्या मिळकतीचे काय, हा. माणसे राजकारणात सेवेसाठी जात नाहीत, सोयीसाठी जातात. आताची पक्षांतरे पाहिली, की त्यांच्यासमोर फक्त त्यांचीच नव्हे तर पुढल्या अनेक पिढय़ांची सोय असते, हेही जाणवते. ही माणसे गरीब नाहीत, लाचार नाहीत आणि रस्त्यावर आली नाहीत, त्यांच्या इस्टेटी देशात व विदेशांत आहेत, कमाई मोठी आहे आणि स्वबळावर निवडणुका लढविण्याएवढी श्रीमंतीही त्यांच्यात आहे. लहान माणसे पक्षाला चिकटून आहेत अन् ही मोठी म्हणविणारी प्रवासी बॅगा भरण्याच्या कामी लागली आहेत. हे दृश्य जगात एकमेवाद्वितीय असे आहे आणि ते सार्या समाजाला लाज वाटायला लावणारे आहे. ही माणसे निर्ढावली आहेत. पूर्वी काँग्रेसमध्ये असणारी माणसे ‘माहेरी’ चालल्याचे लोकांना ऐकवत. आताच्या पक्षांतरकर्त्यांचे इकडेही माहेर आणि तिकडेही माहेर आणि दोन्हीकडे कधीही जाता येईल, असा मार्गही मोकळा. गंमत म्हणजे त्यांचे स्वागतकर्ते दोन्हीकडे हारतुरे घेऊन. यांना लाज नाही आणि त्यांनाही लाज नाही. एके काळी अशा माणसांना ‘आयाराम-गयाराम’ म्हणत; पण त्यामुळे रामाचे नाव बदनाम होते म्हणून मग वेगळी नावे आली. पण, नाव कोणतेही दिले तरी प्रकृतीत बदल थोडाच होतो? मेघे इकडे आदरणीय आणि तिकडेही आदरणीय. याला आम्ही लोकशाही म्हणणार आणि तीत राजकीय विचारांची व त्यावरच्या पुढार्यांच्या श्रद्धेची चर्चा करणार. ही चर्चा करणारेच मग बावळे वाटू लागणार. जाणारे जातात, खाणारे खातात आणि चर्चा करणारे उपाशी पोटाने नुसतीच त्यांची मीमांसा करतात. पक्षांतरावर बंदी घालणारा कायदाही लंगडा आहे. तो कार्यकर्त्यांवरच बंधने घालत असतो. नेत्यांवर त्याची मात्रा चालत नाही. ती चालत असती, तर निम्म्या विदर्भातील काँग्रेस अशी रिकामी झाली नसती. त्या पक्षातली माणसेही अशा सोडून जाणार्यांविषयी बोलत नाहीत. त्यांच्या निरोपाचे समारंभ घडवीत नाहीत. उद्या आपणही त्या वाटेवर असू, याची धास्ती त्यांच्याही मनात कदाचित असावी. एकट्या विदर्भाला नावे ठेवून येथे चालणार नाही. पक्षांतराची ही लागण तिकडे कोकणातही आहे आणि ती काही फार बड्या माणसांनाही झाली असल्याची चर्चा आहे. अशा पळापळीची सवय असलेल्या एका माजी मुख्यमंत्र्याचे नाव त्यांच्या वेगवान बछड्यांसोबत या संदर्भात घेतले जात आहे. त्यांच्या भाजपाप्रवेशाला सेनेचा विरोध असल्याने ते थांबल्याची चर्चा आहे. पण सेनेचा विरोध आता शक्तिहीन झाला असून, मोदी तिला हवे तसे नाचवीत आहेत. या स्थितीत विधानसभेची निवडणूकही त्या पक्षाला लढवावी लागायची नाही. निवडणुकीचा बिगुल वाजला, की आयुधेच नव्हे तर वस्त्रेही घेऊन आपापली बिळे शोधण्याचेच काम मग यांनी करायचे. सोनिया गांधींच्या नशिबात यापुढे काय पाहणे राहिले असेल, याची कल्पना यावी, अशी ही पळापळ आहे आणि ती लाजिरवाणी आणि राजकारणाची बदनामी करणारी आहे.
मोठय़ा उंदरांची पळापळ
By admin | Updated: July 8, 2014 09:50 IST