‘मेक इन इंडिया’सारख्या उपक्रमांच्या माध्यमातून औद्योगिक निर्यातीमध्ये भरारी घेऊ पाहणाऱ्या भारतासाठी, क्वीन एलिझाबेथ प्राईझ फॉर इंजिनिअरिंग या आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त संस्थेद्वारा जारी अहवाल, शुभ वर्तमान ठरू शकतो. या अहवालानुसार, भारत हा जगात सर्वाधिक अभियंते तयार करणारा देश ठरणार आहे. भारतातील तब्बल ८० टक्के विद्यार्थ्यांचा ओढा अभियांत्रिकीकडे असून, त्यामध्ये मुलींचाही मोठा वाटा आहे. याउलट ब्रिटनमधील केवळ २० टक्के तर अमेरिकेतील केवळ ३० टक्के विद्यार्थ्यांचा कल अभियांत्रिकीकडे आहे. चीनमध्येही ६२ टक्के विद्यार्थ्यांनीच अभियांत्रिकीप्रती आवड दर्शविली असल्याचे हा अहवाल म्हणतो. सदर आकडेवारी महत्त्वाची आहे आणि ही बातमी भारतासाठी शुभ वर्तमान ठरू शकते ती यासाठी, की मानवी जीवन सुखकर करण्याची कामगिरी, जेवढी उपयोजित विज्ञान म्हणजेच अभियांत्रिकीने बजावली आहे तेवढी ती इतर कोणत्याही घटकाने बजावलेली नाही. त्यामुळे भारत जर अभियंते निर्माण करण्यात जगात आघाडी घेणार असेल, तर ती आपल्यासाठी आनंदाची बातमी आहेच; पण एखाद्या देशाचे अभियांत्रिकीमधील कौशल्य अभियंत्यांच्या केवळ संख्येवर नव्हे, तर दर्जावर अवलंबून असते, हे विसरता येणार नाही व नेमके तिथेच घोडे पेंड खाते! शिक्षणाचा बाजार मांडून ठेवल्यामुळे, काही सन्माननीय अपवाद वगळता देशातील बहुतांश अभियांत्रिकी महाविद्यालये केवळ पदवीची भेंडोळी घेऊन बाहेर पडणारे अभियंते तयार करणारे कारखाने झाले आहेत. त्याचवेळी दर्जेदार अभियांत्रिकी शिक्षण मिळालेले बहुतांश युवक, देशात उत्तम संधी उपलब्ध नसल्याने पाश्चात्य राष्ट्रांची वाट धरतात. त्यामुळे त्यांच्या कौशल्याचा देशाला काही उपयोग होऊ शकत नाही. भारताला एक आधुनिक, शक्तिशाली, समर्थ देश बनवायचे असेल तर देशात मोठ्या संख्येत दर्जेदार अभियंते तयार करावे लागतील आणि ते देशातच राहून त्यांच्या कौशल्याचा देशाच्या उभारणीसाठी वापर करतील, अशी स्थिती निर्माण करावी लागेल. अशी स्थिती निर्माण होईल, तेव्हाच क्वीन एलिझाबेथ प्राईझ फॉर इंजिनिअरिंगचा अहवाल भारतासाठी शुभ वर्तमान ठरेल!
शुभ वर्तमान
By admin | Updated: October 27, 2015 23:02 IST