एक्झिट पोलचे अंदाज हा दूरचित्रवाहिन्यांच्या अंदाजांएवढाच अविश्वसनीय प्रकार असला, तरी काल जाहीर झालेले बहुतेक अंदाज भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा उल्हास वाढविणारे आहेत. ‘टाइम्स नाऊ’ या वृत्तवाहिनीने या आघाडीला २४९, तर चाणक्य वाहिनीने ३४० जागा मिळतील, असा अंदाज वर्तविला आहे. त्यात आजतक (२९८), इंडिया न्यूज (३१५), झी न्यूज (२९९), एबीपी (२८१), एनडीटीव्ही (२८३), पीआरजी (२७२), गोल्ड वन (३०२), इंडिया टीव्ही (३१७), सीएनएन आयबीएन (२८२) आणि हेडलाइन्स (२७२) यांचा समावेश आहे. सट्टेवाल्यांंना विश्वसनीय वाटणार्या समूहानेही त्या आघाडीला २५४ जागा मिळतील, असे म्हटले आहे. काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडीला टाइम्स नाऊने १४८ जागा देऊ केल्या असल्या, तरी इतर सर्व वाहिन्यांचे अंदाज त्या आघाडीला ९७ ते ११५ जागा देणारे आहेत. रालोआची विजयाची आशा यामुळे एवढी बळावली, की तिने आपल्या सरकाराचा नवा मुख्य सचिवही आताच निवडून टाकला आहे. हे अंदाज खरे ठरले, तर २०१४च्या निवडणुकांनी रालोआला सरकार बनविण्याची संधी दिली, हे स्पष्ट होणार आहे. या अंदाजांबाबतचा सार्यांच्या काळजीचा व विचारांचा विषय त्यातील ‘इतर’ पक्षांच्या जागा हा आहे. पीआरजी या वाहिनीने या इतरांना २१५ जागा मिळतील, असे म्हटले, तर इतर वाहिन्यांनी त्यांना कमीत कमी १३३ व जास्तीत जास्त १६५ जागा मिळतील, असा अंदाज वर्तविला आहे. या इतरांत मुलायमसिंह, मायावती, जयललिता, ममता, नितीशकुमार व नवीन पटनायक यांच्या सामर्थ्यवान प्रादेशिक पक्षांचा समावेश आहे आणि त्या सार्यांचा मोदी, भाजपा व रालोआवरील राग टोकाचा आहे. त्यामुळे या अंदाजात जरा फरक पडला आणि रालोआला स्पष्ट बहुमत मिळाले नाही, तर हे ‘इतर’ संघटित होण्याची व त्यांना काँग्रेसप्रणीत आघाडीचा पाठिंबा मिळण्याची शक्यता मोठी आहे. त्यामुळे या अंदाजांच्या जाणकार अभ्यासकांचे खरे लक्ष त्या ‘इतरां’कडे जरा जास्तीचे लागले आहे. मोदींच्या स्नेह्यांनी या इतरांपैकी जयललितांकडे थोडे फार पाणी भरले असले, तरी त्या महत्त्वाकांक्षी महिलेने त्यांना फार लांब ठेवले आहे. ममता, मायावती आणि मुलायम यांचा मोदीद्वेष टोकाचा आहे. ‘मी त्यांच्या मुसक्या आवळल्या असत्या,’ ही ममतांची मोदींविषयीची भाषा, तर ‘त्यांच्यामुळे देश रसातळाला जाईल,’ हे मायावतींचे भाकीत. नितीशकुमारांनी मोदी आणि भाजपा यांना आपल्या राजकारणातून कधीचेच वजा केले आहे. नवीन पटनायकांनी आपली पाने अद्याप उघडली नसली, तरी त्यांचे मोदी व भाजपाशी जुळणार नाही, हे उघड आहे. त्यामुळे मोदी व रालोआ यांना स्वबळावर बहुमत मिळविणे एवढाच एक पर्याय उरणार आहे. पी. ए. संगमा, चंद्राबाबू नायडू किंवा तेलंगण राष्ट्र समितीचे चंद्रशेखर राव यांच्या संपर्कात रालोआचे लोक आहेत. मात्र, त्यांच्यासारखे छोटे खेळाडू रालोआच्या फारशा कामी येणार नाहीत. मात्र, हे राजकारणाचे क्षेत्र आहे. त्यात तत्त्वज्ञान वा तत्त्वनिष्ठा यांसारख्या गोष्टींना फारसे स्थान नाही. डाव्या कम्युनिस्टांपासून जुन्या जनसंघापर्यंतचे (आताचा भाजपा) पक्ष एकत्र आल्याचा इतिहास आहे. सत्ता हे राजकारणातले सार्यांना बांधून ठेवणारे सूत्र आहे आणि लहानसहान पक्ष व पुढारी आपले ‘मतभेद’ गुंडाळून रालोआच्या रांगेत उद्या उभे झालेले दिसले, तर त्याचे आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. आघाड्या तयार होणे आणि तुटणे यांचे एकमेव कारणही सत्तेची खुर्ची हेच आहे. मुलायमसिंह, मायावती आणि ममता हे सारे पुढारी केवळ काँग्रेसचे वैर म्हणून याआधी भाजपासोबत राहिले आहेत, हेही त्याचमुळे विसरता येत नाही. १६ मे रोजी सगळे निकाल जाहीर होऊन भावी राजकारणाचे किमान काही काळाचे चित्र स्पष्ट होईल. ते या उपरोक्त वाहिन्यांच्या अंदाजानुसार निघाले, तर या वाहिन्यांनी २००९च्या निवडणुकीत घालविलेली प्रतिष्ठा त्यांना पुन्हा प्राप्त होणार आहे. त्यामुळे येणारे तीन दिवस आपले अंदाज, भाकिते, ज्योतिष्यांची भविष्ये आणि स्वत:चे शहाणे निर्णय यांवर थांबणे, समाधान मानणे आणि येऊ घातलेले देशाचे व समाजाचे भवितव्य चांगले असावे, अशी प्रार्थना करणे एवढेच आपल्या हाती आहे. समाधानाची गोष्ट एवढीच, की या निवडणुकांनी भारतातील लोकशाही स्थिर असल्याचे देशाला व जगाला दिसले आहे. ती तशीच टिकवणे येणार्या सत्ताधार्यांच्या व उद्याच्या राजकारणाच्या हाती आहे.
लक्ष ‘इतरां’कडेच!
By admin | Updated: May 14, 2014 03:05 IST