शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
4
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
5
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
6
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
7
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
8
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
9
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
10
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
11
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
12
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
13
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
14
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
15
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
16
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
17
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
18
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
19
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं

‘पारा’ चढतो, तसा ‘आवाज’ही वाढतो बरं का..!

By shrimant mane | Updated: December 23, 2023 09:11 IST

उष्ण कटिबंधातील भाषा अधिक नादमधुर, उच्चार ‘चढे’ असतात, तर शीत कटिबंधातले लोक ‘हलक्या’ स्वरात बोलतात, असे का?- नवा अभ्यास!

- श्रीमंत माने, संपादक, लोकमत, नागपूर

पृथ्वीवरील विविध भागातील हवामान, कमी किंवा अधिक तापमान आणि त्या भागात राहणाऱ्या लोकांची भाषा, तिच्या उच्चारातील चढ-उतार, ध्वनीची तीव्रता, मोठा अथवा लहान आवाज, भाषेची नादमयता यांचा काही परस्परसंबंध असू शकतो का? वरवर या प्रश्नाचे उत्तर ‘छे, कसे शक्य आहे?’- असे प्रश्नार्थकच असेल; पण थांबा. एक नवा, ताजा अभ्यास सांगतो, की तापमान व भाषा या दोहोंमध्ये परस्परसंगती आहे. एखाद्या भाषेचा उगम व विस्तार उष्णकटिबंधीय क्षेत्रात झाला की शीतकटिबंधीय, यावर तिचा साज अवलंबून असतो. उष्ण कटिबंधातील भाषा म्हणजेच तिच्यातील शब्द अधिक नादमधुर असतात. त्या नादमयतेमुळेच त्यांचा उच्चारही थोडा चढ्या आवाजात हाेतो. बोलीभाषा दर बारा कोसांवर बदलते असे आपण म्हणत आलो, आता  विज्ञानाच्या कसोटीवर काढलेले उच्चारशास्त्राचे पापुद्रेही समोर आले आहेत. 

जपानमधील नानकाई विद्यापीठातील तियानहेंग वँग व त्यांच्या सहकाऱ्यांनी जगभर बोलल्या जाणाऱ्या लहान-मोठ्या ५ हजार २९३ मुख्य व पोटभाषा, बोलींमधील तब्बल ३ लाख ४५ हजार ६८१ शब्दांच्या उच्चारातील आवाज, ताल, व्याकरणशास्त्र वगैरे बाबींचा तापमानाच्या संदर्भाने अभ्यास केला. त्यासाठी अमेरिकेची अंतराळसंस्था नासाकडून मिळविलेले १९८२ ते २०२२ या चाळीस वर्षांतील मासिक सरासरी तापमानाचे आकडे संदर्भ म्हणून वापरले. एकेका भाषासमूहातील शब्दांमध्ये वापरली जाणारी स्वर व व्यंजने, त्यांचे उच्चार, त्या उच्चारांचे ध्वनी-प्रतिध्वनी, शब्दांची लांबी आणि मुख्य म्हणजे शब्दांची नादमयता असा तपशीलवार अभ्यास केला. अमेरिकेच्या नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेसच्या ‘पीएनएएस नेक्सस’ विज्ञान पत्रिकेत याच आठवड्यात या अभ्यासाचे निष्कर्ष जाहीर झाले आहेत.

तोंडातील पोकळीचा कमीअधिक वापर करून उच्चारले जाणारे स्वर आणि जीभ, कंठ, टाळू, मुर्धा, दात व ओठ इत्यादी अवयवांशी स्पर्शातून उच्चारली जाणारी ‘स्पर्श व्यंजने’ किंवा स्वर आणि व्यंजनांच्या मिश्रणातून तयार होणारी अक्षरे, शब्द हा सगळा भाषाव्यवहार आपल्या सर्वांनाच माहिती आहे. त्याच आधारे भारतीय उच्चारशास्त्राच्या परिभाषेत कण्ठ्य, तालव्य, मूर्धन्य, दंत्य, ओष्ठ्य, अनुनासिक, कंठ तालव्य, कंठ ओष्ठ, दान्तोष्ठ आदी संज्ञा प्रचलित झाल्या. तशी अक्षरांची वर्गवारी आपण करतो. जगभरातील भाषांचा एक्सरे काढणारा हा नवा वैज्ञानिक अभ्यास हे या मालिकेतले पुढचे पाऊल म्हणावे लागेल. 

तियानहेंग वँग व सोरेन विचमन, क्वानशेंग शिया, क्विबिन रॅन या मंडळींनी असा निष्कर्ष काढला आहे, की उष्ण प्रदेशात जन्मलेल्या, विकसित झालेल्या भाषा अधिक नादमय असतात. त्यांचा उच्चारही ‘वरचढ’ असतो. याचा अर्थ असा नाही की लोक मुद्दाम चढ्या आवाजात बोलतात. त्या भाषांमधील शब्दच असे आहेत की ते सहजपणे मोठ्या आवाजात बोलले जाऊ शकतात. भाषा एक हेल धरते. यामागे  वैज्ञानिक कारण हे, की थंड हवा  उष्ण हवेपेक्षा कोरडी असते. त्या कोरडेपणाचा परिणाम व्होकल कॉर्ड म्हणजे ध्वनियंत्रणेवर होतो. 

स्वरांचा उच्चार थोडा हळू होतो. शिवाय थंडीमुळे तोंड तुलनेने अधिकवेळ बंद राहते. त्यामुळे उच्चार हळू आवाजात होतात. याच्या नेमकी उलटी स्थिती उष्ण कटिबंधात असते. त्यामुळे शब्द, भाषा अधिक नादमधुर असते. बोलण्याचा स्वर थोडा वरचा लागतो. हा तसा प्राथमिक व अगदीच वेगळा अभ्यास आहे. म्हणूनच विस्काॅन्सिन अँड मॅडिसन विद्यापीठातील संज्ञानात्मक अभ्यासाचे तज्ज्ञ गॅरी लुपियान म्हणतात, की शब्दांची नादमयता आणि तापमान यांचा थेट संबंध जोडण्यासाठी आणखी पुरावे हवेत. त्यांनी या अभ्यासातील काही उणिवाही दाखवल्या आहेत. 

या अभ्यासासाठी प्रचंड प्रमाणात आकडेवारी जमा केली असली तरी जगात काही भाषा अशाही आहेत की त्यात केवळ ४०-५० शब्द आहेत. इतक्या कमी शब्दांच्या भाषेत नादमाधुर्य आहे की नाही, शब्दांमध्ये प्रतिध्वनींची ताकद किती आहे, असले निष्कर्ष काढता येत नाहीत. शब्दांची वारंवारिताही पुरेशी तपासली गेलेली नाही. एखाद्या शब्दात स्वर अधिक असतील तर त्याची तुलना कमी स्वर व अधिक व्यंजने असलेल्या शब्दांशी कशी करता येईल? तापमानाप्रमाणेच हवेतील आर्द्रता हादेखील महत्त्वाचा घटक आहे. दोन्हींच्या परिणामांमधील तफावत कशी शोधणार, असे प्रश्न लुपियान यांनी उपस्थित केले आहेत.

या अभ्यासाच्या निमित्ताने भाषांच्या विकासातील आणखी काही पैलूंवर चर्चा सुरू आहे. समुद्रसपाटीपासूनची उंची ही हवामानाशी संबंधित महत्त्वाची भौगोलिक बाब, तिचा विचार व्हायला हवा. पर्यावरण व मानवी समूह या दोहोंच्या हजारो वर्षांच्या परस्परसंबंधातून भाषा विकसित होतात. भाषेच्या प्रसारात, त्यांच्या बदलत्या स्वरूपात मानवी स्थलांतर, सांस्कृतिक संघर्ष, युद्धे, जेता व जितांचे संबंध, आर्थिक संबंध अशा अनेक गोष्टी महत्त्वाच्या असतात. केवळ तापमान कमी की अधिक किंवा शब्द उच्चारताना तोंड कमी उघडते की अधिक यावर विसंबून निष्कर्ष काढता येणार नाहीत, असादेखील एक सूर आहे. काहीही असो, किमान या अभ्यासाचा आधार घेऊन अधिक तापमानाच्या, झालेच तर विषम हवामानाच्या प्रदेशात राहणारे थंड हवामानाच्या प्रदेशात राहणाऱ्यांपुढे अभिमानाने छातीठोकपणे दावा करू शकतील, की आमची भाषा तुमच्यापेक्षा अधिक नादमधुर आहे!shrimant.mane@lokmat.com