अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी गेल्या १५ दिवसांत भारताला दोन वेळा धार्मिक असहिष्णुतेविरुद्ध उभे राहण्याचा व देशाची राष्ट्रीय एकात्मता जपण्याचा जाहीर सल्ला दिला आहे. ओबामा आणि भारत यांचे संबंध दृढ आणि विश्वासाचे असल्यामुळे आणि अनेकांच्या मते ते पूर्वी कधी नव्हते एवढे वरच्या दर्जाचे झाल्यामुळे त्यांच्या या सल्ल्याकडे या देशाला दुर्लक्ष करता येणार नाही. देशाने राजकीय स्थैर्य मिळविले आहे. आर्थिक विकासाचा आपला दर उंचावला आहे. त्याचे राष्ट्रीय व दरडोई उत्पन्न बऱ्यापैकी वाढले आहे. बेकारी कमी झाली आहे आणि देश अन्नधान्याच्या संदर्भात स्वयंपूर्ण झाला आहे. अशा देशाची पुढची वाटचाल त्यातील लोकशाहीच्या स्थैर्याची व लोकजीवनाच्या सुस्थितीची असली पाहिजे. कोणत्याही महानगरातील नागरी जीवनाकडे पाहिले तर ते लक्ष्य आता फारसे दूर नाही हे जाणवणारेही आहे. २६ जानेवारीची राजपथावरील लष्करी कवायत पाहणाऱ्यांना देशाच्या संरक्षणविषयक भक्कमपणाचीही आता खात्री पटली आहे. मात्र या देशाला व समाजाला असलेला खरा धोका बाहेरचा नाही, तो आतला आहे. वर्षानुवर्षे लोकांनी मनात जपलेल्या धार्मिक व जातीय तेढीचा तो आहे. ही तेढ साधी व आजची नाही. ती कमालीची धारदार व ऐतिहासिक आहे. तिने आजवर अक्षरश: लक्षावधी लोकांचा बळी घेतला आहे. या देशातील बहुसंख्यकांपैकी अनेकांच्या मनात देशातील अल्पसंख्यकांचे वर्ग या नकोशा जमाती आहेत आणि अल्पसंख्यकांपैकी अनेकांच्या मनात आपण कधीकाळी या देशाचे राज्यकर्ते होतो ही भावना अजून शिल्लक आहे. ही दुतर्फा दिसणारी तेढ नुसती जागी नसून सक्रिय आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागात होत असलेल्या धार्मिक दंगली आणि त्यात अक्षरश: हजारोंच्या संख्येने मृत्यू पावणारे लोक ही या देशाच्या ६० वर्षांच्या लोकशाहीची डागाळलेली बाजू आहे. १९८४ मध्ये दिल्लीत झालेल्या शीखविरोधी दंगलीत चार हजारांवर लोक ठार झाले. २००२ मध्ये गुजरातेत झालेल्या दंगलीत दोन हजारांहून जास्तीच्या मुसलमानांची कत्तल झाली. उत्तर प्रदेश, पंजाब, राजस्थान, महाराष्ट्र, कर्नाटक, ओडिशा, बिहार व बंगाल ही राज्येही अशा दंगलींपासून मुक्त नाहीत. साध्याही कारणावरून दोन जमातींत दंगल उभी व्हावी आणि तीत दोन्ही बाजूंचे धार्मिक व राजकीय नेते उभे झालेले पहावे लागावे हे आपल्या समाजाचे मोठे दुर्दैव आहे. या दंगली घडवून आणण्यामागे अर्थातच राजकारण आहे. दंगली झाल्या की त्यातून वाढणाऱ्या तेढीमुळे काही पक्षांचे राजकीय बळ वाढते व धारदार होते. मग हिंदूंच्या कर्मठ संघटना पुढे होतात, मुसलमानांची संघटने सज्ज होतात, शिखांचे जत्थे तयार असतात आणि अतिशय लहान म्हणविणारे मानवी समूहही त्यापासून दूर राहत नाहीत. देश समृद्ध असला, त्याचे लष्कर मोठे असले आणि त्याची अन्नविषयक समस्या सुटली असली तरच तो स्थिर होतो असे नाही. त्यासाठी देशाच्या जनतेत एक मानसिक स्थैर्य, समाधान व सौहार्द असणेही गरजेचे असते. ते नसेल तर या समृद्धीलाही फारसा अर्थ उरत नाही. देशात सर्व धर्मांच्या राजकीय तोंडवळे असलेल्या संघटना आहेत आणि त्यांचे पुढारी बेलगाम बोलण्यात व विशेषत: इतर धर्माच्या लोकांना डिवचण्यात एकमेकांना हार जाणारे नाहीत. दिल्लीत नरेंद्र मोदींचे भाजपा सरकार सत्तारूढ झाल्यापासून संघाच्या म्हणविणाऱ्या संघटना ज्या तऱ्हेने बोलू व वागू लागल्या आहेत तो प्रकार या साऱ्या दुश्चिन्हांचे पुरावे ठरणारा आहे. इतरांचे धर्म पूर्णपणे संपविण्याची आणि त्यातली सारी माणसे आपल्या धर्मात आणण्याची भाषा जशी येथे आहे, तशी स्वधर्माच्या वाढीसाठी जिहाद पुकारण्याची भाषाही येथे आहे. सध्या दिल्लीत निवडणुकीचे वारे जोरात वाहत आहेत. मात्र त्यातही ख्रिश्चनांची प्रार्थनास्थळे जाळण्याचा प्रकार चालू असलेला पाहावा लागणे याएवढे मोठे दुर्दैव दुसरे नाही. अशा प्रश्नांवर राजकीय तोडगे काढता येत नाहीत. त्यासाठी साऱ्या समाजालाच अंतर्मुख होऊन विचार करावा लागतो व आपली माणसे आणि सोबतचे समाजही सुरक्षित करून घ्यावे लागत असतात. सर्व पक्ष व धर्मांच्या संघटनांच्या नेत्यांनी यासाठी एकत्र येणे व समाजातील जाणकार आणि विवेकी माणसांना याकामी सोबत घेणे गरजेचे आहे. गणराज्य दिनाच्या सोहळ्याला उपस्थित राहिल्यानंतर दिल्लीतील सिरीफोर्टवर विद्यार्थ्यांना उद्देशून केलेल्या भाषणात ओबामांनी धार्मिक सहिष्णुतेचा आपला पहिला निर्देश दिला. या देशात जोवर धार्मिक सलोखा आहे तोवरच हा देश टिकेल आणि अमेरिकाही टिकेल असे ते त्यावेळी म्हणाले. हा निर्देश म्हणजे भाजपाला ओबामांनी मारलेला टोमणा आहे असा त्याचा अर्थ अनेकांनी काढला. पुढे अमेरिकेच्या संबंधित मंत्रालयाने तो अभिप्राय साऱ्या जगाला उद्देशून होता असे सांगून तो समज मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र आताचा ओबामांचा दुसरा अभिप्राय स्पष्ट व स्वच्छ आहे आणि तो भारताला उद्देशून आहे. या देशातील धार्मिक तेढ म. गांधींना दुखावणारी ठरणारी आहे असे ते म्हणाले आहेत. त्यांच्या या निर्देशातून ज्यांना जो बोध घ्यायचा त्यांनी तो घ्यावा. ज्यांनी कशातूनही काही शिकायचे नाही अशीच शपथ घेतली आहे त्यांची गोष्ट अर्थातच वेगळी आहे आणि त्यांना काही शिकविण्याचे सामर्थ्य ओबामांतही नाही.
ओबामांचा दुसरा सल्ला
By admin | Updated: February 9, 2015 01:20 IST