- ले. कर्नल सुनील देशपांडे (निवृत्त)आॅल्विन टॉफलर या लेखकाने आपल्या वॉर अॅॅॅॅॅॅॅन्ड वॉर या पुस्तकात भविष्यातील युद्धे ही ब्रूट वॉरऐवजी ब्रेन वॉर राहतील असे नमूद केले आहे. याचाच अर्थ पूर्वीसारखी क्रौर्याने भरलेली युद्धे संपून तेथे वैचारिक लढाया व त्यातून होणारा हिंसाचार घडेल असा होतो. अणुयुद्ध हे या ब्रेन वॉर प्रकारात मोडते. मात्र अणुयुद्ध हा जागतिक शांततेवरचा तोडगा कधीच ठरू शकणार नाही. कारण त्यातून जे नुकसान होईल ते कुणा एका देशाचे वा प्रांताचे नसून अवघ्या मानवजातीचेच नुकसान असेल. म्हणून विचार कुठलेही राष्ट्र करणार नाही असे वाटते. अणुबॉम्बची निर्मिती ही प्रत्येक राष्ट्राला त्याचा वापर करण्यापेक्षा त्याचा धाक बसविण्यासाठी गरजेचेही वाटते. राष्ट्रांजवळ त्यांची अत्याधुनिक शस्त्रे व आयुधे असावीत. तसे होणे हे त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गरजेचेही आहे. मात्र ती अण्वस्त्रे चुकीच्या हाती पडू नयेत याची खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे. जेव्हा रशियाचे विकेंद्रीकरण झाले व त्याचे १७ देशात तुकडे झाले तेव्हा त्यातील काही प्रांतांकडे प्रगत अण्वस्त्रे होती. मात्र त्या अण्वस्त्रांचे रक्षण करणाऱ्या सुरक्षा जवानांना पगार देण्याइतपतही आर्थिक बळ त्या देशांत उरले नव्हते.परिणामी ही अण्वस्त्रे त्या काळात चोरीला गेली व ती आजतायागत बेपत्ता आहेत. ती कुणाजवळ आहेत याचा कधीच छडा लागला नाही. ती जर अतिरेक्यांच्या हाती असतील तर त्याचा धोका सर्व जगालाच राहणार आहे. आधीच्या युद्धांमध्ये देशात ब्लॅकआऊट केला जात असे. शत्रूला गाव कोणते व जंगल कोणते हे ओळखता येऊ नये यासाठी ही शक्कल लढविली जात असे. मात्र आता तंत्रज्ञान इतके प्रगत झाले आहे की, एखाद्या विशिष्ट जागी अणुबॉम्ब टाकायचा झाल्यास ती जागा नेमकी हेरून तेथे तो पडेल अशी व्यवस्था केली जाऊ शकते. त्यामुळे उद्या जर पाकिस्तानने भारतावर बॉम्ब टाकायचा ठरवला आणि तो मुंबईवर टाकला तर उध्वस्त मुंबई पुन्हा स्थापन व्हायला किमान १०० वर्षे जाऊ द्यावी लागतील. मात्र पाकिस्तानवर भारताने तो प्रयोग केला तर अवघे पाकिस्तानच बेचिराख होऊ शकते. त्यामुळे असा अविचार उभयपक्षी होणार नाही असे वाटते. अण्वस्त्रांच्या शक्तीसोबत भारतात आंतरिक शक्तींनाही मजबूत केले गेले पाहिजे. यात देशाचे लष्कर, अर्थकारण, औद्योगिक क्षेत्र व सामाजिक क्षेत्र यांचा समावेश होतो. देशाची मानसिकता ही जर सैनिकाची, एका लढवय्याची मानसिकता असेल तर कुठलाही देश वाकडी नजर करून आपल्याकडे पाहू शकणार नाही. जागतिक शांततेसाठी अण्वस्त्रे हा उपाय नाही मात्र ती खबरदारी निश्चितच आहे.
अण्वस्रे हा उपाय नाही!
By admin | Updated: August 2, 2015 04:36 IST