भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अमित शाह यांची फेरनिवड केली जाणे यात जसे काही आश्चर्य नाही त्याचप्रमाणे त्यांची निवड करण्यासाठी झालेल्या बैठकीवर लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि यशवंत सिन्हा या तीन ज्येष्ठ ‘मार्गदर्शकांनी’ बहिष्कार टाकणे यातदेखील आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. या तिघांचे आणि पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांचे टिपण जमत नाही ही बाब याहीपूर्वी अनेकदा दिसून आली आहे. मे २०१४मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीआधी पक्षाने आपल्या नावाची भावी पंतप्रधान म्हणून घोषणा करावी अशी अडवाणी यांची इच्छा आणि आग्रहदेखील होता. परंतु पक्षाने आणि खरे तर संघ परिवाराने मोदी यांना मनोमन वरल्यानंतर तिथेच अडवाणी वरमले व ज्या बैठकीत मोदींच्या नावाची घोषणा केली गेली त्या गोव्यातील बैठकीवरदेखील त्यांनी बहिष्कारास्त्र उगारले होते. वास्तविक पाहाता आता आपण पक्षात निर्माल्यगत होत चाललो आहोत हे ओळखून अडवाणी यांनी त्याचवेळी पक्षसंन्यास जाहीर केला असता तर आज पक्षाने जसे वाजपेयी यांना देव्हाऱ्यात बसवून ठेवले आहे तसेच अडवाणी यांनाही ठेवले असते. पण तसे झाले नाही. मोदी आणि अमित शाह यांनी पक्षाचे मार्गदर्शक मंडळ नावाचे जे शोभेचे मखर तयार केले त्यात अडवाणी, जोशी आणि सिन्हा यांना बसवून ठेवले. मार्गदर्शक म्हणजे मार्गदर्शनाची अपेक्षा ठेवली तरच त्याने ते द्यायचे पण मार्गदर्शनाची अपेक्षा मात्र ठेवायची नाही अशी ही एकूण रचना. कठोर शब्द वापरायचे तर मोदी-शाह यांनी या कथित धुरंधरांना चक्क अडगळीतच टाकले. खरे तर याची या तिघांनाही खंत का वाटावी हा एक प्रश्नच आहे. त्यांना जे देय होते तितके किंवा काकणभर अधिकच त्यांना पक्षाने आणि लोकानीही अगोदरच देऊन टाकले आहे. पण लोभ सुटत नाही, हेच खरे. परिणामी आज भाजपा म्हणजे मोदी आणि शाह हेच समीकरण दृढ झाले आहे. त्या दोहोंचे गुजरात ‘कनेक्शन’ लक्षात घेता ते स्वाभाविकही आहे. पण लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी आणि त्यानंतरही काही काळ अमित शाह म्हणजे निवडणूक तंत्रातील अत्यंत कुशल तज्ज्ञ आणि घवघवीत यशाचा हुकमी मार्ग ्शीू जी काही प्रतिमा तयार झाली होती, ती आता राहिलेली नाही. आधी दिल्ली आणि त्यानंतर बिहार विधानसभेच्या निवडणूक निकालांनी शाह यांची झळाळी पार उतरुन गेली. परंतु केवळ तितकेच नव्हे तर खुद्द गुजरात राज्यातील ग्रामीण मतदारही भाजपापासून दूर गेल्याचे अलीकडेच पार पडलेल्या त्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक निकालांनी दाखवून दिले. माध्यमांमधील चर्चेनुसार गुजरात राज्याच्या विधानसभा निवडणुकीपर्यंत शाह पक्षाच्या अध्यक्षपदी राहतील आणि त्यानंतर त्यांना गुजरातचे भावी मुख्यमंत्री म्हणून मतदारांसमोर सादर केले जाईल. याचा अर्थ तोपर्यंत तरी अमित शाह भाजपाच्या दृष्टीने ‘अमीट’ शाहच बनून राहतील.