शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

अमेरिकी माध्यमांनी ट्रम्प यांना केले चक्क नापास!

By admin | Updated: September 28, 2016 05:11 IST

अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणूक प्रचारातील एक महत्वाचा टप्पा मानल्या जाणाऱ्या दोन्ही प्रमुख उमेदवारांमधील जाहीर वाद-चर्चेच्या एकूण तीन फेऱ्यांमधली पहिली फेरी सोमवारी पार पडली.

- प्रा.दिलीप फडके(ज्येष्ठ विश्लेषक)अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणूक प्रचारातील एक महत्वाचा टप्पा मानल्या जाणाऱ्या दोन्ही प्रमुख उमेदवारांमधील जाहीर वाद-चर्चेच्या एकूण तीन फेऱ्यांमधली पहिली फेरी सोमवारी पार पडली. न्यूयॉर्कच्या हेंपस्टेड येथील विद्यापीठाच्या आवारात झालेली चर्चा तिथे तिकीट काढून आलेल्यांशिवाय जगभरातील लाखोंनी दूरचित्रवाणीच्या पडद्यावर पाहिली. अमेरिकेच्या भावी अध्यक्षाचे विचार काय आहेत व त्याचा वकूब कितपत आहे, याचा अंदाज घेण्यासाठी व त्याची धोरणे कशा प्रकारची राहतील याचा अंदाज बांधण्यासाठी या चर्चा जगभर अभ्यासल्या जातात. त्यादृष्टीने अमेरिकन प्रसार माध्यमांमध्ये या पहिल्या चर्चेचे पडसाद कसे उमटत आहेत ते पाहाणे उदबोधक ठरेल. ‘न्यूयॉर्कटाईम्स’ने आपल्या अग्रलेखाला ‘एका चर्चेत एकवटलेला गलिच्छ प्रचार’ असे शीर्षकच दिले आहे. त्यात म्हटले आहे की, एक उमेदवार या चर्चेत गांभीर्यपूर्वक सहभागी झाला होता तर दुसरा चर्चेत सतत विक्षेप आणत चर्चेचे गांभीर्य कमी करीत होता. या शतकातली सर्वात महत्वाची चर्चा म्हणून माध्यमांनी वर्णन केलेल्या या चर्चेत एका उमेदवाराकडे पुरेशा गांभीर्याच्या अभाव असल्याने मुळातच असमानता आली होती. रिपब्लिकन उमेदवार ट्रम्प बोलले खूप, पण त्यांच्या तुलनेत अधिक संतुलित व तयारीनिशी आलेल्या डेमोक्रॅट हिलरी क्लिन्टन यांच्यासमोर उभे राहणे त्यांना कठीण जात होते. इसीसचा उदय, अमेरिकेतील बेकारी, जागतिकीकरणाचे व्यवसायांवर व रोजगाराच्या संधींवर झालेले परिणाम, निर्वासितांची बेकायदा घुसखोरी, अमेरिकन समाजात बोकाळलेले शस्त्राप्रेम व त्यातून होणारा हिंसाचार या साऱ्यासाठी ट्रम्प यांनी क्लिंटन आणि त्यांच्या पक्षाला जबाबदार धरले. याउलट क्लिंटन यांनी संतुलित पद्धतीने आणि आत्मविश्वासाने हल्ला परतवत ट्रम्प यांच्या बोलण्यातली विसंगती वफोलपण नेमकेपणाने उघड केले. आपल्यापाशी अध्यक्षपदासाठी आवश्यक ‘स्टॅमिना’ नाही ही टीकासुद्धा त्यांनी छान टोलवली व ट्रम्प यांना बचावाचा पवित्र घेणे भाग पाडले. आजच्या काळात दहशतवाद, युद्धाचे सावट, निर्वासित आणि वंशवादाची समस्या, पर्यावरणाचे प्रश्न, शिक्षण, सार्वजनिक सुरक्षा यासारख्या सामान्यांना भेडसावणाऱ्या समस्यांची अधिक गांभीर्याने चर्चा करण्याची क्षमता असणारे उमेदवार दोन्ही पक्षांनी दिले असते. पण रिपब्लिकनांनी वाईटात वाईट उमेदवार दिल्याने चर्चेला राजकीयदृष्ट्या एक विचित्र व दुर्दैवी परिमाण मिळाले असून एका मोठ्या देशाच्या भविष्याबाबत असे घडावे हे विचित्र आहे, असे आपल्या विश्लेषणाच्या अखेरीस न्यूयॉर्कटाईम्सने म्हटले आहे. चर्चेच्या प्रारंभी चाचरणाऱ्या हिलरी क्लिंटन अखेरच्या टप्यात कशा आक्रमक झाल्या याचे विस्तृत वर्णन व तपशीलवार विश्लेषण ‘न्यूयॉर्कटाईम्समध्ये’च मायकेल बार्बारो आणि मॅट फ्लेजेंनहैमर यांनी केले आहे. त्यात क्लिंटन यांनी सुरुवातीच्या अनिश्चिततेनंतर ट्रम्प यांची कशी कोंडी केली याचे सुरेख वर्णन आहे. ओबामांचा जन्म कुठे झाला याबद्दल किंवा आफ्रिकन-अमेरिकनांबद्दल आजवर ट्रम्प यांनी केलेल्या बेछूट वक्तव्यांच्या संदर्भात हिलरी यांनी ट्रम्प यांना अडचणीत आणले. महिलांबद्दल ट्रम्प यांनी काढलेल्या अनुचित आणि अनुदार उद्गारांच्या संदर्भातसुद्धा त्यांनी ट्रम्प यांना अडचणीत टाकणारे प्रश्न उपस्थित करुन आपले वर्चस्व प्रस्थापित केले. यासाठी त्यांना चर्चेचे सूत्रधार लेस्टर होल्ट यांनी छुप्या रितीने कशी मदत केली याची माहितीही या विश्लेषणातून समजू शकते. क्लिंटन यांनी ट्रम्प यांचा धुव्वा उडवला असे सांगणारे थॉमस एड्सॉल यांनी केलेले एक विश्लेषणही याच अंकात प्रकाशित झाले आहे. चर्चेत क्लिंटन यांच्याकडे वस्तुस्थितीची अचूक माहिती होती आणि त्या त्यांचे म्हणणे अधिक तर्कशुद्धपणे व लोकांना समजेल अशा पद्धतीने मांडण्यात यशस्वी झाल्या असे मत एड्सॉल यांनी नोंदवले आहे. ‘वॉशिंग्टन पोस्ट’मध्येसुद्धा या चर्चेबद्दलचे व्यापक विश्लेषण प्रकाशित झाले असून त्याचा सूरही साधारण असाच आहे. चर्चेच्या प्रारंभी ट्रम्प बरेचसे संयमित होते पण काही काळानंतर त्यांचा संयम सुटायला लागला. याउलट हिलरी सुरुवातीला काहीशा अनिश्चित वाटल्या तरी नंतर त्यांच्या बोलण्यातून त्यांचा आत्मविश्वास आणि त्यांची चर्चेवरची पकड अधिकाधिक घट्ट होत गेली असे या विश्लेषणातून दिसते. हिलरींनी ट्रम्प यांना बचावाच्या पवित्र्यात आणले अशा आशयाचा मथळा पोस्टने दिला आहे. रिपब्लिकन प्रायमरीज अयशस्वी ठरल्या आहेत आणि नकारात्मकता व चुकीची मते असणारा व सर्व दृष्टीनी अपात्र असणारा उमेदवार त्यांनी पुरस्कृत केला आहे, तर डेमोक्रॅट्सनी बऱ्याच मर्यादा असणारा पण पुरेशी माहिती, समजदारी, आत्मविश्वास आणि योग्य मानसिकता असणारा उमेदवार दिल्याचे चर्चेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाल्याचे पोस्टचे संपादकीय म्हणते.एड रॉजर्स पोस्टमधल्या आपल्या विश्लेषणात म्हणतात की हिलरी मुद्यांना धरून बोलत होत्या व त्यातून त्यांचे कौशल्य आणि क्षमता दिसत होती. विशेष म्हणजे त्यांना फारशा गंभीर आव्हानाला सामोरे जावे लागले नाही. त्या अखेरपर्यंत शांत व संयमित होत्या तर ट्रम्प अस्वस्थ आणि काहीसे नर्व्हस होते व त्यांना चर्चेवर पकड बसवता आली नाही.६२ टक्के लोकांना क्लिंटन यांचे पारडे जड वाटले तर ट्रम्प यांच्या बाजूने केवळ २७ टक्के लोक आहेत असल्याचे चर्चेनंतरच्या सीएनएनच्या जनमत चाचणीत आढळून आले. ओबामा प्रशासनात परराष्ट्र मंत्री असतानाच्या काळात हिलरी यांनी आपल्या खाजगी ईमेल अकौंटचा वापर केल्याबद्दल त्यांच्यावर खूप टीका झाली. पण त्या मुद्यावरून त्यांना ट्रम्प फारसे अडचणीत आणू शकले नाहीत. याउलट ट्रम्प यांचा व्यावसायिक कारभार, त्यात दिसलेली वंशवादी दृष्टी, त्यांनी अनेक वेळा घोषित केलेली दिवाळखोरी, त्यांची कर विवरणपत्रे, प्रचाराच्या काळात ओबामांबद्दलची त्यांनी केलेली अनावश्यक शेरेबाजी, इसीसच्या संदर्भातले त्यांचे संदिग्ध विचार या साऱ्यावरून त्यांना हिलरींनी अडचणीत आणले असे मत ‘इंडिपेंडंट’ने मांडले आहे. अशाच प्रकारचे विश्लेषण इतरही अमेरिकन प्रसार माध्यमांनी केलेले वाचायला मिळते. एकूणात अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या या पहिल्या अंकाच्या अखेरीला हिलरी क्लिंटन यांच्या बाजूला तागडे झुकलेले दिसते. अर्थात चर्चेच्या अजून दोन फेऱ्या व्हायच्या आहेत. त्यात काय घडते ते महत्वाचे ठरणार आहे.