शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
3
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
4
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
5
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
6
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
7
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
8
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
9
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
10
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
11
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
12
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
13
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
14
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
15
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
16
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
17
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
18
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
19
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा

गतवैभवासह डौलात उभं आहे हिरोशिमा

By admin | Updated: August 2, 2015 04:28 IST

जपान-दक्षिण आशिया मैत्री कार्यक्रमाअंतर्गत भारताच्या २३ सदस्यीय प्रतिनिधीमंडळात निवड झाली तेव्हापासूनच मनाला एक हुरहुर लागली होती. कारण जपान म्हटलं की हिरोशिमा आणि नागासाकी

- सविता देव हरकरे जपान-दक्षिण आशिया मैत्री कार्यक्रमाअंतर्गत भारताच्या २३ सदस्यीय प्रतिनिधीमंडळात निवड झाली तेव्हापासूनच मनाला एक हुरहुर लागली होती. कारण जपान म्हटलं की हिरोशिमा आणि नागासाकी आपसुकच आठवतात. ही दोन शहरं बघायला मिळतील का? याबद्दल प्रचंड उत्सुकता होती. प्रत्यक्षात हिरोशिमाचा प्रवास सुरू झाला तेव्हा अंगावर रोमांच उभे राहिले होते. साक्षात हिरोशिमामध्ये पाऊल ठेवल्यावर आश्चर्याचा सुखद धक्का बसला. अणुबाम्बनं उद्ध्वस्त झालेलं हेच ते हिरोशिमा यावर क्षणभर विश्वासच बसेना. अतिशय वेगानं डौलात उभं झालेलं हे शहर बघितल्यानंतर आम्ही जपानी लोकांच्या जिद्दीला सलाम ठोकला. ६ आॅगस्ट १९४५ची सकाळ हिरोशिमावासीयांसाठी अंधकारच घेऊन आली. नेहमीप्रमाणे पहाटेपासून सर्व व्यवहार सुरू झाले होते. रविवार शाळांमधील मुलांचा समाजसेवेचा दिवस होता. शाळकरी मुलांची रस्त्यांवर वर्दळ होती. त्याचवेळी काळ त्यांच्या डोक्यावरून घिरट्या घालत होता. एका क्षणात सर्वत्र हाहाकार माजला. काही कळण्यापूर्वीच आगीचे लोळ पसरले. इमारती जमीनदोस्त झाल्या. हजारावर लोक क्षणात मृत्युमुखी पडले. साऱ्या मानवजातीला कलंक फासणारा पहिला अणुबॉम्ब हिरोशिमावर टाकण्यात आला होता. ‘लिटील बॉय’ नावाच्या या बॉम्बच्या भीषण स्फोटात ९९ टक्के शहर उद्ध्वस्त झालं होतं. या जबर धक्क्यानंतरही युद्धोत्तर काळात हे शहर एक आधुनिक आणि प्रगतशील शहर म्हणून ओळखलं जात आहे. येथील शांती स्मृती पार्कमधील पांढरी कबुतरे आकाशात उडत असल्याचं आणि चिमुकली बालकं निरागसपणे हसतखेळत असल्याचं दृश्य बघितल्यानंतर कोणे एकेकाळी या शहरावर बॉम्ब टाकण्यात आला होता यावर विश्वासच बसत नव्हता. पाण्यावर वसलेले शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहरात नद्या आणि पुलांची भरमार आहे. औद्योगिक कारखान्यांशिवाय येथे स्वयंचलित वाहने, पोलाद, जहाज बांधणी, फर्निचरशिवाय इतरही अनेक उद्योग सुरू आहेत. हिरोशिमात पोहोचल्यानंतर दुसऱ्या दिवशी शांती उद्यानात गेलो. ओटा नदीच्या किनारी उभारलेल्या या उद्यानात सर्वत्र हिरवळच हिरवळ आहे. याच ओटा नदीच्या दोन शाखांवरचा पूल ‘एनोला गे’चं मुख्य लक्ष होता, असं सांगण्यात आलं. ज्या विमानातून हिरोशिमावर अणुबॉम्ब फेकण्यात आला त्या विमानाचं नाव ‘एनोला गे’ होतं. स्मारकात लहान मुलांसोबतच तरुण आणि वृद्ध लोकांचेही येणे-जाणे सुरू होते. विश्वशांतीची प्रार्थना करण्याकरिता दररोज असंख्य लोक येथे येत असतात. बॉम्बस्फोटात अपंगत्व आलेले एक-दोन जण व्हीलचेअरवर येथे आलेले दिसले. या पार्कच्या अगदी बाजूला असलेल्या हिरोशिमा इंडस्ट्रीयल प्रोमोशन हॉलचे अवशेष हिरोशिमातील बॉम्बस्फोटांची जणू साक्षच देत होते. एकेकाळी याच इमारतीत चहेलपहेल राहात होती. बॉम्बस्फोटानंतर शिल्लक राहिलेल्या या इमारतीचे अवशेष काळजीपूर्वक जतन करण्यात आले आहेत. या इमारतीवरील फे्रेमच्या छत्रीसारख्या आकारामुळे येथील जनतेने त्याला ‘आॅटोमिक बॉम्ब डोम’ असं नाव दिलं. बॉम्बस्फोटानंतर झालेली जखम भरून काढताना लोकांना या जखमेचा संपूर्ण विसर पडू नये म्हणून कदाचित हे अवशेष कायम ठेवण्यात आले आहेत.याच उद्यानामध्ये एक शांती ज्योत आहे. ही ज्योत वर्षभर जळत असते. पृथ्वीवरील अण्वस्त्रे नष्ट होत नाहीत तोपर्यंत ही ज्योत अशीच तेवत ठेवण्याचा निर्धार जपानी लोकांनी केला आहे. येथील एका शाळकरी मुलीच्या स्मृतीत बांधण्यात आलेल्या स्मारकाचा इतिहास तर मन हेलावून टाकणारा आहे. विस्फोटात ठार झालेल्या या मुलीला रंगीबेरंगी कागदांच्या पट्ट्या जमविण्याचा छंद होता. हजारो पट्ट्या जमविण्याची तिची इच्छा होती. तिची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी लहान मुलं तिला श्रद्धांजली वाहण्यासाठी सोबत रंगीत कागदाच्या पट्ट्या घेऊन येतात. विश्व शांतीची प्रार्थना करतात. येथील ओटा नदी या विध्वंसाची साक्षीदार आहे. बॉम्बस्फोटानंतर अग्निज्वाळा आणि वादळापासून बचावाकरिता हजारो अगतिक नागरिकांनी स्वत:ला या नदीत झोकून दिलं होतं. परंतु समुद्राला मिळणाऱ्या या नदीत आणि समुद्रातही प्रचंड लाटा निर्माण झाल्यानं या सर्वांचा अंत झाला. ओटा नदीच्या किनारी आमच्या सोबत असलेल्या जपानी मैत्रिणीनं स्फोटानंतरचं विदारक चित्र वर्णन केलं तेव्हा सर्वांचे डोळे पाणावले. ओटा नदीचा प्रवाह मात्र संथपणे वाहत होता.बॉम्ब नेमका कुठे पडला, त्याचा केंद्रबिंदू कुठे होता हे बघण्याची उत्सुकता लागली होती. कारण ते स्थळ या स्मृती उद्यानात नव्हतं. दीड-दोन तास भटकल्यानंतर एका गल्लीत एक छोटासा स्तंभ दिसला. त्या स्तंभावर लिहिलेलं लिखाण वाचलं. ६ आॅगस्ट १९४५ रोजी सकाळी ८ वाजून १५ मिनिटांनी हिरोशिमावर टाकण्यात आलेला अणुबॉम्ब नेमका याच ठिकाणी पडला होता. भरवस्तीतील ही जागा. बाजूलाच मोठा बाजार. बॉम्बस्फोटानंतर पडलेला मोठा खड्डा बुजविण्यात आला. तिथं हिरवं गवत उगवलं. आठवणींच्या रूपात ते गवत अजूनही नव्या उमेदीची प्रेरणा देत राहतं. देशभक्तीने ओतप्रोत जपानी माणूसअणुबॉम्ब स्फोटानंतर जपानी माणसांनी दाखविलेल्या धाडसाच्या अनेक कथा ऐकायला मिळाल्या. आग शहरभर पसरू नये म्हणून हिरोशिमात ७० हजारांवर घरे पाडून तीन लांबलचक अग्निरोधक पट्टे तयार करण्यात आले होते. लाखावर लोकांना शहर सोडून बाहेर जावं लागलं. जपानी सरकारनं देशवासीयांना त्यांच्या घरात असलेलं निरुपयोगी लोखंड (भंगार ) सरकारजमा करण्याचं आवाहन केलं. या आवाहनाला लगेच प्रतिसाद मिळाला. बघता बघता केवळ चार-पाच दिवसांत चौकाचौकांत भंगाराचे ढिगारे जमा झाले. सरकारने ते सर्व लोखंड जमा करून कारखान्यात नेलं व त्या भंगारापासून रेल्वेची सात इंजिने तयार केली.

(लेखिका ‘लोकमत’च्या नागपूर आवृत्तीमध्ये उपवृत्तसंपादक आहेत.)