धुळे जिल्ह्यात २१८ गामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. आतापर्यंत ३५ ग्रामपंचायती बिनविरोध झालेल्या असून, आता फक्त १८२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. यात १४७६ सदस्यांची निवड करायची आहे. निवडणुकीच्या रिंगणात तब्बल तीन हजार ३१९ उमेदवार असून, यात युवकांची संख्या साडेबाराशेच्यावर आहेत. म्हणजे एक तृतीयांशपेक्षा जास्त उमेदवार हे ३० वयोगटाच्या आतीलच असल्याचे चित्र आहे. मतदारांनी तरुणांच्या पारड्यात मते टाकून त्यांना विजयी केल्यास, आगामी पाच वर्षे गावाचे नेतृत्व युवकांच्या हाती येईल.
मार्च महिन्यात देशात लाॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, आदी मोठ्या शहरांमध्ये कामानिमित्त गेलेले तरुण आपल्या गावी परतले होते. आता ते गावातच वास्तव्यास आहे. त्यातच ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्याने, त्यांना गावाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली.
तरुणांमध्ये निर्णय घेण्याची तसेच एखादी गोष्ट करून दाखविण्याची धमक असते. आजचा तरुण हा टेक्नोसेवी असल्याने तो तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर करतो. याचा फायदा लहान गावालाही होऊ शकतो. यामुळेच अनेक मातब्बरांनी तरुणांना निवडणुकीत पुढे केल्याचे चित्र आहे.
तरुणांनीही प्रचारात आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा आपण काय करू शकतो याचाच प्रचार अधिक जोरोने सुरू केलेला आहे. यासाठी बॅनर, प्रसिद्धिपत्रक वाटण्याऐवजी सोशल मीडियाचा वापर केला जात आहे. मतदारांनाही ते ‘अपील’ होत आहे. त्यामुळे गावाचे चित्र बदलू शकते, असा आशावाद आहे.
लहान निवडणुकांमधून आलेल्या अनुभवातूनच मोठे नेतृत्व घडू शकते. आज ग्रामपंचायत निवडणुकीत यश मिळविणाऱ्या युवकाला भविष्यात मोठ्या निवडणुकांमध्ये नेतृत्व करण्याची संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अनेक तरुणांनी यात हिरिरीने भाग घेतला आहे. विशेष म्हणजे गेल्या काही वर्षांत तरुणांचा राजकारणाकडे कल मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. जगात भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. त्यामुळे ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देण्याची संधीसुद्धा युवकांच्या माध्यमातून मिळू शकते.