शहर पोलिसांनी शेळ्याचोरीच्या गुन्ह्यात दोन दिवसांपासून मुबारक शाह याची चौकशी सुरू केली होती. सकाळी पोलीस ठाण्यात आल्यानंतर काही वेळाने तो बाहेर गेला. त्याने सोबत आणलेले विषारी द्रव्य प्राशन केल्याने त्याला त्रास होऊ लागला. हा प्रकार लक्षात येताच उपस्थित नागरिकांनी त्याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्रथमोपचार करून त्याला धुळ्याला रवाना केले.
मुबारक शाह ड्रायव्हर आहे. १७ सप्टेंबरला निमझरी रस्त्यावरील एका फार्ममधून १२ शेळ्या चोरीस गेल्या. त्या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. उर्वरित संशयितांनी या गुन्ह्यात मुबारकचा सहभाग असल्याची माहिती दिली. त्यामुळे पोलिसांनी त्याला चौकशीसाठी बोलावले होते. गुन्ह्यात आपले नाव येत असल्याने त्याने भीतीपोटी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे कळते. घटनास्थळी उंदीर मारण्याचे औषध बांधून आणलेली पुडी तसेच रॅटोक्स नावाचे विषारी क्रीम आढळले.