येथील महिला या दिवसभर शेतीची कामे करायला जातात. सायंकाळनंतर अंधार पडल्यावर महिला या पांझरा नदीकाठी आणि अन्य ठिकाणी शौचालयाला जातात. या ठिकाणी काही दिवसांपासून एक टवाळखोर महिलांच्या मागे मागे येऊन अंधारात अश्लील हावभाव करीत लांबूनच महिलांची छेड काढत आहे. तर अनेकदा बेसावध असताना जोरात किंचाळत महिलांना घाबरवत आहे. त्यामुळे महिला या शौचालयातून घाबरून घरी येत आहेत. यामुळे महिलांना मानसिक त्रासाचा सामना करावा लागत आहे.
अंधारात या टवाळखोराचा चेहरा स्पष्ट दिसत नसल्याने त्याला पकडणे कठीण झाले आहे. तर या त्रासामुळे महिला शौचालयाला जाण्यास घाबरत आहेत.
टवाळखोराला पकडण्याचा प्रयत्न....
गावातील काही तरुण आणि नागरिकांनी या टवाळखोराला पकडण्यासाठी रविवारी रात्री महिलांची वेषभूषा करून सापळा रचला होता. परंतु टवाळखोराला याची भनक लागल्याने तो आलाच नाही. त्यामुळे टवाळखोर हा गावातील का अन्य ठिकाणाहून येत असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. ग्रामपंचायत आणि पोलिसांनी या टवाळखोराचा बंदोबस्त करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नारायण बोढरे व महिलांकडून केली जात आहे.