जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून दररोज चोरी, धूमस्टाईलने सोनपोत लांबविणे, भरदिवसा रस्तालूट, पेट्रोल पंपमालकाची रेकी करून लाखोंची लूट अशा घटनांची मालिकाच सुरू आहे. १८ ऑगस्टपासून दहा दिवसात दररोज चोरी,लूट अशा घटना घडल्या आहेत. पुन्हा-पुन्हा अशा घटना घडणे म्हणजे लुटारु आणि गुन्हेगारांमध्ये पोलिसांविषयीचा धाकच संपला आहे, असेच म्हणावे लागेल. अन्य जिल्ह्यात विकासाचा आलेख वाढताना दिसतो. याउलट खून, लूट, मोटारसायकल चोरी, घरफोडी सारख्या वाढत्या घटनांमुळे धुळ्याच्या गुन्हेगारीचा आलेख हा वाढताना दिसत आहे. शहरातून विविध गुन्ह्यातील गुंड तडीपार करण्याचा धडाका मध्यंतरी पोलिसांकडून लावण्यात आला होता. यामुळे नक्कीच शहरातील गुंडगिरी व गुन्हेगारीवर आळा बसेल, असा विश्वास नागरिकांना होता. पोलिसांच्या कामगिरीवर नागरिक खुश होते. परंतु झाले उलटच तडीपार झालेले गुंड सर्रासपणे शहरात फिरताना दिसू लागले. मग तडीपार झालेल्या गुंडांना पकडण्यासाठी मग विशेष मोहीम राबविण्यात आली; मात्र तडीपार केलेल्या गुंडांची शहरात येण्याची हिंमतच कशी होते, असा सवाल सर्वसामान्यांना पडला आहे. शहरासह जिल्ह्यात घरफोडीचे सत्र तर थांबता थांबत नाही, अशी परिस्थिती आहे. दोंडाईचात बँकेसमोरुन एक लाख लंपास, धुळ्यात जे.बी.रोडवरुन सव्वालाख लंपास, खंबाळे गावात सव्वालाखाची घरफोडी, उंटावदला १३ लाखांची लूट, मोराणेला चालत्या वाहनातून ६ लाखांची चोरी, धुळ्यात अभयनगरात साडेतीन लाखांची चोरी, हट्टी शिवारात ६ लाखांची लूट, धुळे शहरात संतोषी माता मंदिरात नवस फेडण्यासाठी आलेल्या महिलेची सोनपोत लंपास, नगाव शिवारात अज्ञात दोन लुटारुंनी एकाला दमदाटी करुन लूट केल्याची घटना अशा पद्धतीने चोरीची मालिका सुरु आहे. आधी झालेल्या चोरीचा शोध लागत नसताना दररोज चोरी आणि लुटीच्या घटना घडत आहेत. भरदुपारी घरात चोरीची घटना होते. धुळे शहरासह अन्य ठिकाणीही तिची परिस्थिती आहे. मोटारसायकल चोरीची घटना तर आता सायकल चोरीसारखीच झाली आहे. मोटारसायकल चोरी झाल्यानंतर लगेच त्याची फिर्याद घेण्यास पोलीस टाळाटाळ करतात. आधी नातेवाईकांकडे व आजूबाजूच्या परिसरात शोध घ्या, असा सल्ला दिला जातो, अशी नागरिकांची तक्रार आहे. तरीही नाही सापडली तर मग आठ - दहा दिवसांनी मोटारसायकल चोरीचे गुन्हे दाखल होतात. या सर्वांमागे एक कारण मुख्य आहे की, जिल्ह्यात खाकीची आधी असलेली जरब आता दिसत नाही. आधी पोलीस चौकात असल्याचे पाहून ट्रिपल सीट मोटारसायकल घेऊन जाण्याची हिंमत कोणी करत नसे. परंतु आतातर महाविद्यालयीन तरुण - तरुणी चौकात पोलीस उभे असताना सुसाट वेगाने ट्रिपल सीट निघून जातात. पोलीस सुद्धा बघून न बघितल्यासारखे करतात. जर महाविद्यालयीन तरुण - तरुणीच जर पोलिसांना घाबरत नसतील, तर मग अट्टल चोरटे, तडीपार गुंड हे तर फार लांबची गोष्ट आहे. खाकीची गमावलेली ती जरब पुन्हा निर्माण करण्यासाठी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कुठल्याही राजकीय दबावाखाली न येता जे दोषी आहे, मग ते कोणीही असोत, त्यांच्यावर कडक कारवाई केलीच पाहिजे. शहरात कानठळ्या फोडणारे सायलन्सरचे फटाके फोडत बुलेटवर सुसाट वेगाने फिरणाऱ्यांवर पोलिसांनी ज्या पद्धतीने त्यांची जागा दाखवून दिली. त्याचपद्धतीने पोलिसांनी कर्तव्य बजाविताना कोणावर गय करता कामा नये, तसे केले तरच पोलिसांची जरब निर्माण होऊन जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था पुन्हा चांगली होईल. तसेच चोरी, रस्तालुटीच्या घटनांना ‘ब्रेक’ बसेल.
‘खाकी’ची जरब गेली कुठे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:34 IST