पश्चिम रेल्वे मार्गावरील सुरत-भुसावळदरम्यान अनेक गाड्या सुरू आहेत. ज्या गाड्या आहेत, त्या दुसऱ्या राज्यातून येतात. कोरोनाच्या काळात या गाड्या बंद पडल्या होत्या. परंतु त्या आता पुन्हा सुरू झालेल्या आहेत. मात्र महाराष्ट्रातूनच गुजरात, मुंबईला जाणाऱ्या एक्स्प्रेस गाड्या अद्यापही सुरू झालेल्या नाहीत.
खान्देशातून मुंबईला जाण्यासाठी भुसावळ-बांद्रा ही गेल्या दोन वर्षांपूर्वी सुरू झालेली गाडी सर्वांसाठी सोयीस्कर आहे. कमी पैशात व आरामदायी प्रवासासाठी अनेक जण या गाडीने प्रवास करण्यास प्राधान्य देत असतात. मात्र ही गाडी अद्यापही सुरू झालेली नाही.
सर्व गाड्या मिळून किमान २००-३०० प्रवासी या स्थानकावर चढतात व उतरतात. खान्देशातून मुंबईला व मुंबईहून खान्देशात येण्यासाठी भुसावळ-बांद्रा महत्त्वपूर्ण गाडी आहे. दोंडाईचा येथून फक्त १८० रुपयात मुंबई जाता येते. आरक्षणला ३८० रुपये लागतात. या गाडीला चांगला प्रतिसाद असूनही ही गाडी बंदच आहे. सुरू होणे गरजेचे आहे. अमरावती-सुरत गाडी बंद असून ती सुरू होण्याची प्रतीक्षा आहे. या गाडीने अल्प भाड्यात सुरत, जळगाव, शेगाव जाणे सोईचे होते. प्रवाशांचा सोयीसाठी ही गाडी सुरू करावी अशी मागणी आहे.
सध्या सुरू असलेल्या रेल्वे गाड्या
सुरत-भुसावळ पॅसेंजर,
चेन्नई-अहमदाबाद नवजीवन एक्स्प्रेस
अहमदाबाद हावडा एक्स्प्रेस
अजमेर पुरी एक्स्प्रेस
वाराणसी-सुरत ताप्तीगंगा एक्स्प्रेस
हिसार एक्स्प्रेस,
नंदुरबार -भुसावल फास्ट, अहमदाबाद-बरोनी एक्स्प्रेस
गरिबांचा रथ म्हणून ओळखली जाणारी पहाटेची ४.५० वाजेची सुरत-भुसावळ व रात्री १०.३० वाजता असणारी भुसावळ सुरत या दोन पॅसेंजर बंद आहेत.
पॅसेंजर बंद असल्याने प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. या गाड्या सुरू करण्याची मागणी आहे.
कमी भाड्यात दोंडाईचाहून मुंबईला जाण्यासाठी बांद्रा एक्स्प्रेस सोयीस्कर आहे. मात्र ही गाडी बंद असल्याने, रेल्वे प्रशासनाने ती लवकर सुरू करावी. तसेच भुसावळ सुरत व सुरत भुसावळ या दोन गाड्या दीर्घ कालावधीपासून बंद असून, त्या सुरू होणे गरजेचे आहे.
- प्रवीण महाजन,
दोंडाईचा
मुंबईला खासगी गाडी अथवा वाहनाने जायाचे ठरविल्यास त्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतात. मात्र भुसावळ-बांद्रा एक्स्प्रेसचे आरक्षण काढल्यास कमी पैशात व सुरक्षित प्रवास करता येऊ शकतो. त्यामुळे ही गाडी प्रशासनाने लवकर सुरू करण्याची गरज आहे.
- राजेश पाटील,
दोंडाईचा