गावाचे क्षेत्रफळ व लोकसंख्या जास्त असल्यामुळे संपूर्ण गावात नेहमीप्रमाणे चार दिवसांआड नळांना पाणी सोडले जाते. मात्र ग्रामपंचायतीच्या मालकीच्या पाणीपुरवठा करणाऱ्या वीजपंपांचे थकीत बिल असल्यामुळे अखेर महावितरणने येथील पाच विहिरी मुख्य जलस्रोतांचे व गावातील सर्व सार्वजनिक विहिरी, सर्व गुरांचे पाणी पिण्याचे हाळ या वीजपंपांचे वीज प्रवाह महावितरणने खंडित केले. यामुळे ग्रामपंचायतीची चांगलीच तारांबळ उडाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कापडणे ग्रामपंचायत पाणीपुरवठा करणाऱ्या जलस्रोतांच्या वीजपंपांची जवळ जवळ एक कोटीपेक्षाही जास्त रक्कम थकीत आहे.
सरपंच सोनीबाई गंगाराम भिल उपसरपंच प्रा. अंकिता पाटील, सामाजिक कार्यकर्ते अंजन पाटील व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी थकीत वीज बिल भरण्यासाठी प्रयत्न केल्याने अखेर मंगळवारी महावितरणकडे तीस हजार रुपयांच्या भरणा केला आहे. त्यानंतर महावितरणने पाच विहिरीजवळील मुख्य वीजपंपाचा खंडित वीज प्रवाह पूर्ववत वीज जोडणी केली. त्यानंतर ग्रामपंचायतीद्वारे नळांना पाणी सोडण्यात आले. २३ रोजी दुपारी उशिरापर्यंतही सार्वजनिक हाळची वीजपंपाची जोडणी महावितरणने केलेली नव्हती, अशी माहिती ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी दिली आहे.