नेहमीप्रमाणे मृग नक्षत्रात वरूण राजा बरसणार या आशेने शेतकरी वर्गाने मशागतीची तयारी केली होती. तर काही शेतकऱ्यांनी मका या पिकाची लागवड केली. परंतु पाऊस नसल्यामुळे शेतकरी आता हवालदिल झालेला आहे. दररोज ढग गोळा होतात. पाऊस येईल या आशेने शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसतात. मात्र पाऊस येत नाही. पावसाच्या या हुलकावणीमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये निराशा निर्माण झालेली आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी पावसाच्या आशेवर पेरणी केली होती. त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट येण्याचे चिन्ह दिसू लागले आहे. त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये अधिकच निराशेचे वातावरण पसरलेले आहे. या भागातील काही बागायतदार शेतकऱ्यांनी एप्रिल-मे महिन्यात कापसाची लागवड केली. मात्र वीज मंडळाच्या अनागोंदीमुळे पुरवठा अनेकदा खंडित होत असल्याने त्यांना देखील पिकांना जीवदान देण्यासाठी धडपड करावी लागत आहे. त्यामुळे काटवान भागातील ककाणी, भडगाव(मा), राजबाई शेवाळी, म्हसदी, चिंचखेडा वसमार, काळगाव येथील शेतकरी वर्ग आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत. गेल्यावर्षी म्हसदी येथील काळगाव रस्त्यावरील कायनकडा धरणात व ककाणी येथील धरणात जून महिन्यात पाणी आले होते. या दोन्ही धरणात अद्याप पाणी नसल्याने दोन्ही धरणे हळूहळू कोरडी होऊ लागली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला देखील पावसाची चिंता वाटू लागली आहे.
काटवान परिसरात पावसाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:44 IST