मालपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड लस उपलब्ध नसल्याने येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसीकरण मागील तीन दिवसांपासून बंद झाले होते. यासंदर्भात २६ एप्रिल रोजी लोकमतमधून ‘मालपूर आरोग्य केंद्रात लसीकरण ठप्प’ या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रसारित झाले. याची आरोग्य विभागाने दखल घेत येथ दोनशे डोस उपलब्ध करून दिले. यामुळे लसीकरणाला पुन्हा सुरुवात झाल्याचे येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत १२ गावे येत असून सुमारे २८ हजार लोकांना टप्प्याटप्प्याने लसीकरण करण्यात येणार आहे. आतापर्यंत एक हजार १८७ लोकांचे लसीकरण झाल्याचे समजते. यात काहींनी दुसरा डोस घेतला आहे. मात्र पुरेशा डोसअभावी तीन दिवसांपासून लसीकरणाच्या कामात व्यत्यय आला होता. यामुळे लसीकरणाचे काम ठप्प झाले होते.
आता १ मे पासून १८ वर्षे वयोगटापुढील सर्वांचे लसीकरण होणार असल्यामुळे येथे लसींचा पुरेसा साठा असणे गरजेचे आहे.
तऱ्हाडी येथेही लसीकरण सुरू
तऱ्हाडी आरोग्य उपकेंद्रात कोरोना संसर्ग प्रतिबंध लसीकरण मोहीम सुरू
तऱ्हाडी : येथील आरोग्य उपकेंद्रात तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसन्न कुलकर्णी व डॉ प्रतापराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना संसर्ग प्रतिबंध लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. त्याचे उद्घाटन सरपंच जयश्री धनगर, माजी सरपंच सुदाम भलकार, सुनील धनगर, माजी उपसरपंच अशोक सोनवणे, आरोग्य सेवक प्रकाश वाघ, महेंद्र खोंडे, रावसाहेब चव्हाण यांच्या उपस्थितीत झाले. या कोविशिल्ड लसीकरण मोहिमेमुळे येथील ज्येष्ठ नागरिक व पंचेचाळीस वर्षांवरील नागरिकांना या कोविशिल्ड लसीकरण मोहिमेचा फायदा घेता येणार आहे. लसीकरणाविषयी कोणतेही गैरसमज करून घेऊ नये असे आवाहन माजी सरपंच सुदाम भलकार यांनी केले. लसीकरणासाठी परिचारिका दीपाली बडगुजर, आरोग्य सेवक रवींद्र शिरसाठ, योगिता बडगुजर, आशा सुपरव्हायझर प्रतिभा पाटील, एस. जी. मंडळे व कर्मचारी वर्ग यांचे सहकार्य लाभले.
नेर आरोग्य केंद्रात लसीचा दुसरा डोस उपलब्ध
नेर : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविशिल्ड उपलब्ध होते. मात्र कोव्हॅक्सिन लसीच्या दुसऱ्या डोसचा तुटवडा भासत असल्याचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केले होते. याची दखल घेऊन आरोग्य यंत्रणेने २०० लसींचा दुसरा डोस उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे बुधवारपासून लसीकरण सुरू होणार आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनातर्फे कोरोना प्रतिबंधासाठी लसीकरण करण्यात येत आहे. यात फ्रंटलाईनवर काम करणाऱ्यांसह ६० वर्षावरील वृद्धांना आणि ४५ वर्षावरील दुर्धर आजाराच्या नागरिकांना प्राधान्याने लसीकरण करण्यात येत आहे. त्यानुसार नेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ६० वर्षावरील स्त्रिया व वृद्धांना लसीकरणाचा पहिला डोस देण्यात आला होता. त्यात प्राथमिक आरोग्य केंद्रात ७०० डोस उपलब्ध होते. त्यापैकी ७०० ज्येष्ठ नागरिकांनी लसीकरण करून घेतले होते. त्यानंतर २८ दिवसांनी पुन्हा दुसरा डोस देण्यात येणार होता. मात्र नागरिक भर उन्हात माघारी परतले. लस उपलब्ध होईल तेव्हा आम्ही कळवू, असे प्राथमिक आरोग्य केंद्राकडून सांगण्यात येत आहे. याबाबत लोकमतमध्ये वृत्त प्रसिद्ध केले. याची दखल घेऊन दुसऱा डोस उपलब्ध करून देण्यात आला आहे.