केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार लसीकरणासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून येथील उपजिल्हा रुग्णालयात शनिवारपासून लस देण्याच्या कामाला सुरुवात झाली. जिल्हा आरोग्य विभागाकडून ३२६ व्हायरल प्राप्त झाले असून प्रत्येक व्हायरलमध्ये १० डोसेस असे एकूण ३ हजार २६० डोसेस उपलब्ध झाले आहेत. प्रत्येक सेशनला १०० डोस दिले जाणार आहेत. पुणे येथील सीरम इन्स्टिट्यूट कंपनीची लस मिळाली आहे. पहिला डोस रुग्णालयातील परिसेवक कर्मचारी वाल्मीक गढरे यांना देण्यात आला़
१६ रोजी येथील उपजिल्हा रुग्णालयात कोरोनाचा पहिला डोस आ. काशीराम पावरा व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. तुषार रंधे यांच्या उपस्थितीत देण्यात आला. यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. डी.एन. वाघ, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसन्न कुलकर्णी, डॉ. अमोल जैन, डॉ. नितीन निकम, डॉ. योगेश अहिरे, डॉ. प्रसन्नाजीत धवले, डॉ. हिरेन पवार, डॉ. जे.सी. धनगव्हाण, डॉ. महेंद्र साळुंखे, डॉ. शालिग्राम नेरकर, के. झेड. पगार, धीरज चौधरी, अनिता वैद्य, सारिका जाधव, विनोद निकम, आर.पी. पाटील, सावता माळी, मसुदअली सय्यद आदी उपस्थित होते.
सुरुवातीला आरोग्य अधिकारी, कर्मचारी, पोलीस, होमगार्ड, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर तसेच कोरोना उपाय योजनांमध्ये पहिल्या फळीतील काम करणारे विभाग, सामान्य नागरिकांना कोरोनाची लस दिली जाणार आहे. दररोज १०० जणांना लस टोचली जाणार आहे़
याप्रसंगी आ. काशीराम पावरा व डॉ. तुषार रंधे यांनी कोरोना लससंदर्भात माहिती जाणून घेतली़
रुग्णालयातील परिसेविका मंगला धमके यांनी कोरोना लस घेणाऱ्या लोकांना यासंदर्भात सविस्तर माहिती देत घाबरू नका, लस दिलेल्या हात थोडा दुखवू शकेल, किचिंत ताप येईल, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, नियमित हात धुवा, सुरक्षित अंतर पाळण्याच्या सूचना दिल्यात. अधिक त्रास जाणवल्यास नजीकच्या आरोग्य कर्मचाऱ्यांशी तातडीने संपर्क साधा. लस दिल्यानंतर रुग्णालयात काही वेळ बसू देतात. त्रास न झाल्यास त्यानंतर त्यांना घरी सोडण्यात येते.
इन्फो
लसीकरण प्रवेश व निरीक्षण टप्पे
लाभार्थ्यांना नोंदणी वेळी दिलेले ओळखपत्र व आधार कार्ड लसीकरणाच्या दिवशी सोबत आणावे लागणार आहे. लसीकरण कक्षात प्रवेश करण्यापूर्वी व्हॅक्सिनेशन ऑफिसर हात सॅनिटाइज करून तापमान व अॅक्सिमीटरद्वारे ऑक्सिजनची पातळी तपासून तसेच लाभार्थ्यांचे नाव यादीमध्ये तपासून नंतरच त्याला प्रतीक्षालय कक्षात प्रवेश देणार आहे़
व्हॅक्सिनेशन ऑफिसर २ हा आलेल्या लाभार्थ्यांचे ओळखपत्र तपासेल व त्याची कोविन अॅपमध्ये पडताळणी करून त्यानंतर लाभार्थीला लसीकरण कक्षात पाठवेल़
लसीकरण कक्षात व्हॅक्सिनेटरमार्फत लाभार्थ्यांच्या दंडात लस दिली जाईल़
लाभार्थ्याला लस दिल्यानंतर त्याला अर्धा ते एक तास निरीक्षणात ठेवले जाणार आहे़