धुळे : जिल्ह्यात लघुसिंचन विभागांतर्गत असलेल्या गाव तलाव, पाझर तलाव, यांची संख्या बऱ्यापैकी आहे. मात्र यातील बहुतांश प्रकल्प हे गाळाने भरलेले आहेत. त्यामुळे चांगले पर्जन्यमान होऊनही प्रकल्पाच्या क्षमतेप्रमाणे पाणीसाठा होत नाही. ही बाब निदर्शनास आल्यानंतर ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ ही योजना राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यातील १५३ तलावांमधील गाळ पावसाळ्यापूर्वी काढण्यास प्रशासकीय मान्यता दिल्याची माहिती जिल्हा परिषदेतील लघुसिंचन विभागातून देण्यात आली.तलावांमधील साचलेला गाळ काढल्यास त्यांची पाण्याची क्षमता वाढणार आहे.जिल्ह्यातील गाव तलाव, पाझर तलाव हे जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागांतर्गत येत असतात. त्यांची देखरेखीची जबाबदारी याच विभागाची आहे. जिल्ह्यात असलेल्या पाझर तलाव, गाव तलावांमध्ये गाळ साचून राहिल्याने त्यांची पाणी साठवण क्षमता कमी झाले. त्यामुळे तलावात जमा झालेला गाळ काढून तलावाचे खोलीकरण करणे गरजेचे आहे.या अनुषंगाने गाळ मुक्त तलाव, गाळयुक्त शिवार हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यात तलावातील गाळ काढून तो गाव शिवारातील शेतात टाकण्यात येणार आहे. जिल्ह्यातील १५३ तलावातील गाळ काढण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. यात धुळे तालुक्यातील ६०, शिरपूर तालुक्यातील १९, शिंदखेडा तालुक्यातील ४२ व साक्री तालुक्यातील ३२ गाव तलाव, पाझर तलावातील गाळ काढण्यात येणार आहे.तलावातील गाळ काढण्याची जबाबदारी अनुलोम संस्थेकडे आहे. त्यांचा शासनाशी करार झालेला आहे असे सांगण्यात आले.अनुलोम संस्थेने जिल्ह्यातील तलावाचे सर्वेक्षण केले. त्यातून संस्थेला जिल्ह्यातील तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला आढळून आला.त्यामुळे अनुलोम संस्थेने गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवारया अभियानांतर्गत तलावातील साचलेला गाळ बाहेर काढण्यास सुरूवात केलेली आहे.गाळ काढण्यासाठी संस्थेचे जेसीबी यंत्र उपलब्ध करून दिलेली आहेत. तलावातून काढलेला गाळ शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिला जाणार आहे. शेतकºयांनी हा गाळ शेतात टाकल्यास जमीनीची सुपिकता वाढण्यास मदत होणार आहे.या संस्थेला गाळ काढण्यासाठी ११रूपये ९२ पैसे प्रति घनमीटरप्रमाणे काम देण्यात आले आहे असेही सांगण्यात आले. पावसळ्यापूर्वी हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील १५३ तलाव होणार गाळमुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 22:47 IST