धुळे - जिल्ह्यात कोरोनाचा कहर तीव्र होत असतानाच आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. कुणी रेमेडेसिवीर देतं का रेमेडेसिवीर? असं विचारण्याची वेळ रुग्णांच्या नातेवाईकांवर आली आहे. मात्र मोजकेच इंजेक्शन सध्या जिल्ह्यात उपलब्ध आहेत. तसेच कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या खासगी रुग्णालयातही इंजेक्शन उपलब्ध नाही. इंजेक्शन मिळावे म्हणून नातेवाइकांची भटकंती सुरू आहे. तसेच पुरेशा डोसअभावी कोरोना लसीकरणालाही खोड बसला आहे. सध्या मोजकेच डोस शिल्लक आहेत. त्यामुळे आज जिल्ह्यातील अनेक केंद्रांवर लसीकरण होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ४५ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण सध्या सुरू आहे. जिल्हा आरोग्य विभागाने राज्य शासनाकडे ८ लाख डोसची मागणी केली होती. मात्र केवळ ३३ हजार ५०० डोस प्राप्त झाले होते. आठवडाभरातच ते डोस संपल्याने लसीकरण केंद्र बंद करण्याची वेळ आरोग्य विभागावर आली आहे. ज्यांनी पहिला डोस घेतला आहे अशा नागरिकांसाठी को-वॅक्सिन लसीचे ८ हजार डोस प्राप्त झाले आहेत. त्यांचे लसीकरण सुरू राहणार आहे. मात्र पहिला डोस घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांचा हिरमोड होणार आहे.
कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक असणारे रेमेडेसिवीर इंजेक्शन व कोरोना होऊ नये यासाठी दिली जाणारी लस या दोन्हीही गोष्टी जिल्ह्यात उपलब्ध नाहीत. यातून प्रशासन करीत असलेल्या दाव्यातील फोलपणा उघड झाला आहे.
प्रतिक्रिया -
रेमेडेसिवीर इंजेक्शनसाठी कंपनीकडे सातत्याने पाठपुरावा करतो आहे. मात्र कंपनीकडून पुरेसा पुरवठा होत नाहीये. इंजेक्शन उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
- नरेश भगत, अध्यक्ष केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन
शासनाकडे ८ लाख डोसची मागणी केली आहे. त्यापैकी केवळ ३३ हजार डोस मिळाले होते. लसीकरण करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सक्षम आहे. मात्र पुरेसे डोस उपलब्ध नसल्याने काही केंद्रांवरील लसीकरण थांबवावे लागणार आहे.
- डॉ. संतोष नवले, जिल्हा आरोग्य अधिकारी