मागील आठवड्यात शिंदखेडा तालुक्यातील मालपूर जिल्हा परिषद गटातील काॅंग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांशी प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी मालपूर येथील माजी सरपंच हेमराज पाटील यांच्या शेतात संवाद साधला. मालपूर गटात हेमराज पाटील यांचे नाव महाविकास आघाडीत चर्चेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीतही याच्यावर चर्चा झाली आहे, तर भाजपचा उमेदवार अजून गुलदस्त्यात असले तरी भाजपचे जिल्हाध्यक्ष नारायण पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. याशिवाय माजी जिल्हाध्यक्ष सयाजीराव बागल यांच्या कन्या मृणालिनी बागल दहीहंडे याच्या नावाचीही चर्चा आहे. मालपूर गटात १९ जुलै रोजी मतदान होणार आहे. प्रशासनाच्या वतीने मतदानाची तयारी सुरू झाली आहे.
मालपूर जिल्हा परिषद गटातून गेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या चंद्रकला हेमराज पाटील विजयी झाल्या होत्या. मालपूर जिल्हा परिषद गटात निमगूळ व मालपूर असे दोन गण असून, निमगूळ गणात निमगूळसह रामी, धावडे, पथारे, झिरवे तर मालपूर गणात मालपूरसह सुराय, चुडाणे, अक्कलकोस, कलवाडे आदी गावांचा समावेश असून, ही गावे मालपूर जिल्हा परिषद गटात समाविष्ट आहेत.