धुळे : आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांवरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन व सुट्ट्या नियमित कराव्यात, अशी मागणी महाराष्ट्र टिचर्स असोसिएशनतर्फे करण्यात आली आहे.
याविषयी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांवरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन नियमित होत नाही. विशेषत: नंदुरबार आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येणाऱ्या धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील आश्रमशाळांचे वेतन प्रत्येकवेळी उशिराने होत असल्याने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आर्थिक विवंचनेला सामोरे जावे लागते. विभागातील प्रकल्प अधिकारी व कर्मचाऱ्यांचा दिरंगाईमुळे वेतनाला विलंब होतो व कर्मचाऱ्यांचे पगार दोन-दोन महिने होत नाहीत. याबाबत संघटनेकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तसेच या विभागांतर्गत येणाऱ्या आश्रमशाळांवरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या शासकीय सुट्ट्यांबाबतदेखील स्थानिक प्रकल्प कार्यालयांकडून वेळीच व मुदतीत निर्णय घेतला जात नाही. त्यामुळे सुट्ट्यांबाबत संदिग्धता निर्माण होते. ज्याप्रमाणे शिक्षण विभागाकडून स्थानिक सुट्ट्यांबाबत शिक्षणाधिकारी स्पष्ट निर्देश देतात, त्याचप्रमाणे प्रकल्प अधिकारी यांनादेखील स्पष्ट निर्देश देण्यात यावेत, अशी मागणी महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन संघटनेतर्फे राज्याध्यक्ष शुभांगी पाटील यांनी आदिवासी विकास विभागाचे उपसचिव सुबराव शिंदे यांच्याकडे केली आहे.