सुराय ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत सुराय, कलवाड़े, चुडाणे आणि अक्कलकोस अशा चार गावांचा समावेश आहे. या ग्रुप ग्रामपंचायतीची लोकसंख्या सुमारे पाच हजारांपेक्षा अधिक आहे. चुडाणे येथे भर पावसाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. येथे ग्रामपंचायतीच्या मालकीची विहिरीने तळ गाठल्यामुळे अन्य विहीर अधिग्रहण करावी लागली असून, त्यावर गावाची तहान सध्या भागत असल्याचे दिसून येत आहे.
विद्युत वितरण कंपनीने थकबाकी वसुलीसाठी धडक कारवाईला सुरुवात केली आहे. वारंवार सूचना, विनंती, करूनही बिले भरत नसल्यामुळे या कार्यवाहीला सामोरे जावे लागत असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार तालुक्यातील, सुराय ग्रामपंचायत पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याचे येथील कनिष्ठ अभियंता निखिल क्षीरसागर यांनी सांगितले.
सुराय ग्रुप ग्रामपंचायतीचे तीन कनेक्शन असून सरपंच ग्रामपंचायत सुराय, अक्कलकोस सात लाख ४५ हजार ८४१ रूपये, अध्यक्ष पाणीपुरवठा समिती सुरायकडे ६ लाख ३८९ रुपये तसेच चुडाणे येथील तीन नंबर जोडणीवर सात लाख ८३६ रुपये असे एकूण २० लाख ४७ हजार ६६ रुपये थकबाकी असल्याचे सांगण्यात आले. या थकबाकीतून किमान चालू देयक सुमारे एक लाख आठ हजार भरणे गरजेचे आहे.
चौकट...
मालपूर पाणीपुरवठ्याचे देखील २४ लाख ४० हजार ३९४ रुपये थकबाकी झाली असून, थकबाकी भरून कंपनीला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. मालपूरसह परिसरातील गावातील थकबाकीदार घरगुती ग्राहकांनी देखील त्वरित आपली वीजबिले भरुन कंपनीला सहकार्य करावे, अन्यथा धडक कारवाई करुन वीजपुरवठा खंडित केला जाईल. कंपनी वाचवायची असेल तर वसुली आवश्यक असून, यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन विद्युत वितरण कंपनीचे मालपूर येथील कनिष्ठ अभियंता निखिल क्षीरसागर यांनी केले आहे.
प्रतिक्रिया.....
गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या एका विहिरीवरील विद्युतपुरवठा खंडित झाला आहे. घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीतून आलेल्या रकमेतून वीजबिल भरणा केला जातो. मात्र कोरोनाकाळ व सध्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. गावकऱी आर्थिक अडचणीत आहेत. अशात वसुली कशी करावी. विद्युत वितरण कंपनीने दिवाळीपर्यंत वेळ द्यावा. असा आततायीपणा करून जनतेला वेठीस धरू नये.
उज्जनकोर पांडुरंग जाधव.
सरपंचा सुराय ग्रुप ग्रामपंचायत ता. शिंदखेडा
विद्युत वितरण कंपनीची येथील थकबाकी प्रचंड वाढलेली आहे. कंपनी वाचवण्यासाठी सर्वच अधिकारी कर्मचाऱी वसुलीसाठी दारोदारी फिरत आहेत. अनेकदा पूर्वसूचना करुन काही ना काही तरी भरा म्हणून विनंती केली. मात्र प्रतिसाद मिळत नसल्यामुळे वरिष्ठांच्या सुचनेनुसार कार्यवाही करावीच लागत आहे. घरगुती ग्राहकांनी देखील वीज बिल भरुन कार्यवाहीपासून वाचावे. याला पर्याय उपाय राहिलेला नाही.
निखिल क्षीरसागर
कनिष्ठ अभियंता विद्युत वितरण कंपनी मालपूर एक व दोन