धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यालगत सांगवी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील चारणा मोहल्ला, पळासनेर या ठिकाणी अनेक दिवसांपासून तीन पत्ती जुगार, झन्नामन्ना, सट्टापिढ्यांसारखे मोठे अवैध व्यवसाय सर्रासपणे सुरू असल्याच्या तक्रारी आमदार फारूक शाह यांच्याकडे काही नागरिकांनी केल्या होत्या. तरी प्रश्न तातडीने सोडविण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन पोलीस महानिरीक्षक डॉ.प्रताप दिघावकर यांच्याकडे आमदार डाॅ.फारूख शाह यांच्याकडे केली.
या ठिकाणी गुजरात, मध्य प्रदेश, नंदुरबार भागातील मोठ-मोठे व्यापारी व अवैध धंदे करणारे व्यावसायिक या ठिकाणी जुगार खेळण्यासाठी येत असतात. तेथे दिवसाला लाखो रुपयांची उलाढाल सुरू आहे. मागच्या २ वर्षांपूर्वी या ठिकाणी धाड टाकण्यात आली होती. त्यावेळी जुगाराचे लाखो रुपये हस्तगत करण्यात आले होते. लगतच्या जंगल परिसरात मागे मोठ्या प्रमाणात गांजा शेती आढळून आली होती, तसेच मध्य प्रदेश व महाराष्ट्राच्या सीमेवर मोठ्या प्रमाणावर केमिकल व स्पिरिटचा करोडो रुपयाचा अवैध व्यवहार चालतो. येथील महामार्गावर केमिकल व दारू बनविण्यासाठी वापरात येणारे स्पिरिट घेण्याचे लहान-मोठे अड्डे आहेत. भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तातडीने दखल घेत, अवैध व्यवसाय बंद करावे, अशी मागणी आमदार फारूक शाह यांनी नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक डॉ.प्रताप दिघावकर यांच्याकडे केली.