बुधवारी दुपारी दोन वेळा मुसळधार पाऊस झाला. सायंकाळनंतर रात्री उशिरापर्यंत पावसाची संततधार सुरू होती. गुरुवारी दुपारीदेखील किमान अर्धा तास मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. शहरात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पाऊस होत आहे. मंगळवारीही दिवसा साधारणपणे तासभर पाऊस झाला हाेता. बुधवारीही दोन टप्यात तीन तासांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. अचानक पावसाला सुरुवात झाल्याने चाकरमान्यांची धावपळ उडाली. पावसामुळे रस्त्यावरील खड्डे व खोलगट भागात पाणी साचल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच नवीन वसाहतींमध्ये कच्चे रस्ते असल्याने वाहन चालविणे आणि पायी चालणेदेखील जिकिरीचे होत आहे.
शहरात पाऊस झाल्यानंतर नागरिकांना खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागतो. त्यात रस्त्यावर अनेक ठिकाणी पथदिवे बंद असल्याने रात्री खड्ड्यांचा अंदाज लवकर येत नाही. त्यामुळे पाणी साचलेल्या खड्ड्यात वाहने आदळतात. त्यामुळे एखादा गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे. शहरातील इतर मुख्य रस्त्यांवर पथदिवे बसविले. परंतु साक्री रोडचे काम पूर्ण होवून दोन वर्षे झाली तरी या रस्त्यावर पथदिवे लावायला मुहूर्त मिळालेला नाही. त्यामुळे साक्री रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य आहे.