भूषण चिंचोरे
धुळे - लहान मुलांना सांभाळणे कठीण काम आहे. ते कधी काय करतील ते सांगणे कठीण आहे. कोणी सेफ्टी पिन गिळतो, कोणाच्या नाकात शेंगदाणा, तर कोणाच्या कानात गहू गेल्याच्या अनेक घटना जिल्ह्यात झाल्या आहेत. हिरे वैद्यकीय महाविद्यालयात त्याबाबत शस्त्रक्रिया नेहमीच सुरू असतात, अशी माहिती मिळाली.
लहान मुलांची अधिक काळजी घेणे आवश्यक असते. त्यांच्यावर नेहमीच लक्ष ठेवले पाहिजे. त्यांना कोणत्या वस्तूपासून काय धोका आहे ते कळत नसल्याने त्यांना सांभाळणे गरजेचे असते. अनेकदा घरातील सदस्यांचे लक्ष नसताना मुले काहीतरी वस्तू गिळून घेतात. त्यानंतर शस्त्रक्रिया करून ती वस्तू काढावी लागते. यामुळे बालकांना त्रासही सोसावा लागतो. त्यामुळे विशिष्ट गोष्टींपासून त्यांना लांब ठेवणे आवश्यक आहे.
१५ शस्त्रक्रिया होतात महिनाभरात
लहान मुले कोणत्या ना कोणत्या वस्तू गिळून घेतात. त्या वस्तू काढण्यासाठी प्रसंगी शस्त्रक्रिया कराव्या लागतात. शहरातील शासकीय व खासगी रुग्णालयात एक महिन्यात अशा किमान १५ शस्त्रक्रिया होतात, अशी माहिती मिळाली.
मुले काय करतील याचा नेम नाही
- मुलांनी नाणे गिळून घेतल्याचे प्रकार अनेकदा होत असतात.
- एका मुलाने चक्क काच गिळली होती. अखेर शस्त्रक्रिया करून ती काच काढावी लागली. त्यासाठी गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करावी लागल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
-एका मुलाने हाताच्या घड्याळातील गोल आकाराचा लहान सेल गिळला होता. हा सेल पोटात जाणे खूप धोकादायक असते. त्यामुळे अन्ननलिकेला धोका निर्माण होतो.
अशी घ्या मुलांची काळजी
- सेफ्टी पिन, नाणे, गिळता येतील अशा वस्तूंपासून लहान मुलांना लांब ठेवले पाहिजे.
- आगीपासून लहान मुलांना लांब ठेवावे. हिटर, गॅस किंवा चुल्याजवळ बालकांना खेळू देऊ नये.
- पाण्याचा हौद, टब, पाण्याने भरलेली टाकी यापासून त्यांना दूर ठेवावे. त्यामुळे त्यांना धोका निर्माण होऊ शकतो.
मुलांची काळजी घ्या -
आपण काय करतो ते लहान मुलांना समजत नाही. मुलांना सांभाळण्याची महत्त्वाची जबाबदारी पालकांची आहे. अशा वस्तू गिळल्यामुळे अन्ननलिकेला धोका निर्माण होतो, तसेच पाणी, आग यासारख्या बाबींपासूनही लहान मुलांना लांब ठेवले पाहिजे.
- डॉ. अमित पाटील, कान, नाक, घसा तज्ज्ञ
हिरे वैद्यकीय महाविद्यालय धुळे