राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती व सामाजिक न्याय दिवसानिमित्त विवेकानंद केंद्र कन्याकुमारी शाखा धुळेतर्फे प्रा. डॉ. प्रवीणसिंग गिरासे यांचे ‘लोकराजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज’ या विषयावर ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विवेकानंद केंद्र कन्याकुमारी नाशिक विभाग प्रमुख मधुकर देशपांडे होते.
डॉ. गिरासे पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार व कार्याचा वारसा समर्थपणे जपत राजर्षी शाहू महाराजांनी त्याकाळी राजेशाही असतानासुद्धा स्वातंत्र्यापूर्वी सामाजिक समता, बंधुभाव, धर्मनिरपेक्षता, सर्व घटकांना विकासाची समान संधी ही तत्त्वे आपल्या संस्थानात अमलात आणली. आपल्या २८ वर्षांच्या शासन काळात कोल्हापूर संस्थानात बहुजन व मागासवर्गीयांच्या विकासास चालना, आपल्या संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मुफ्त केले. त्यांनी अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी राज्यातील सवर्ण व अस्पृश्य यांच्या वेगवेगळ्या शाळांची पद्धत बंद केली. जातिभेद निर्मूलनासाठी आंतरजातीय विवाहाचा कायदा केला, पुनर्विवाह आणि विधवांच्या विवाहास कायदेशीर मान्यता देऊन स्त्रियांना सन्मान दिला.
मधुकर देशपांडे म्हणाले की, राजर्षी शाहू महाराजांनी स्त्रिया व बहुजनांच्या विकासाच्या तळमळीतून आपली राजसता, साधन व संपत्तीचा उपयोग करून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शिक्षणाची गंगा तळागाळातील समाजापर्यंत नेली. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विवेकानंद केंद्र प्रमुख किशोर बोरसे यांनी केले.
व्याख्यानाला केंद्राचे व्यवस्थापक डॉ. ए. ए. पाटील, डॉ. शशिकला पवार, डॉ. सुरेंद्र मोरे, प्रा. ए. वाय बच्छाव, प्रा. एन. एन. पाटील, प्रा. पी. बी. गायकवाड, डॉ. प्रशांत कसबे, छोटूसिंग राजपूत, योगेंद्र राजपूत, डॉ. बी. डी. पगार, डॉ. ज्योती महाशब्दे, प्रा. मनीषा पाटील उपस्थित होते.