येथील अनेक तरुण पोलीस, सैन्य भरतीसाठी तयारी करीत असतात. काहीजण क्रीडा प्रकारातच कौशल्य प्राप्त करीत असतात. मात्र सराव करण्यासाठी, व्यायामासाठी हक्काचे मैदान नसल्याने तरुणांची मोठ्या प्रमाणात कुचंबणा सुरू होती. गावात आपल्या हक्काचे सर्व सुखसोयीयुक्त क्रीडा मैदान असले पाहिजे यासाठी गेल्या सात वर्षांपासून येथील तरुणांतर्फे क्रीडांगणाच्या जागेबाबत संघर्ष सुरू होता. मात्र क्रीडाप्रेमी व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांमध्ये एकमत होत नसल्याने सार्वजनिक मैदानाचा विषय प्रलंबितच. मात्र गेल्या आठ दिवसांपूर्वी क्रीडाप्रेमींनी पुन्हा ग्रामपंचायतीकडे निवेदनाच्या माध्यमातून मैदानाचा प्रश्न सोडविण्याची मागणी केली होती. यावर ग्रामपंचायतीच्या बैठकीत मैदानासाठी जागेबाबत चर्चा करण्यात आली. सरपंच रुखमाबाई ठाकरे, उपसरपंच विजुबाई बडगुजर, ग्रामविकास अधिकारी आर. एन. कुवर, माजी जिल्हा परिषद सदस्य शामलाल मोरे, भाजपचे तालुका उपाध्यक्ष आर. के. माळी, ग्रामपंचायत सदस्य केदारेश्वर मोरे, राजेंद्र जाधव, विशाल कासार, आरिफ पठाण, शफीयोद्दिन पठाण, श्याम माळी, समाधान पाटील, अल्ताफ हाजी, लखन ठेलारी, राहुल देशमुख, यांचेसह क्रीडाप्रेमी किशोर लोहार, यशवंत धनगर, सूरज परदेशी, शैलेश माळी, संदीप माळी, मोहन पाटील, काशीनाथ सूर्यवंशी, अक्षय चौधरी, निखिल माळी, केदार महाजनी आदींनी सोमेश्वर मंदिराजवळील गट क्रमांक ८५ मधील जागेची पाहणी करून सुमारे तीन एकरच्या जवळपास जागा मैदानासाठी निश्चित केली.
८५ हजारांचा निधी पडून
गेल्या सात वर्षांपासून क्रीडा विभागातील पंचायत युवा क्रीडा व खेळ अभियाना अंतर्गत (पायका) योजनेचा क्रीडा मैदानासाठीचा सुमारे ८५ हजारांचा निधी ग्रामपंचायतीच्या खात्यावर पडून आहे. या निधीमधून मैदानाचे सपाटीकरण व अन्य कामाची सुरुवात केली जाणार आहे.
ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व क्रीडाप्रेमी मिळून सार्वजनिक मैदानाचा प्रश्न सोडविला आहे. या ठिकाणी सुसज्ज मैदान उभारण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी लोकप्रतिनिधींकडे निधीची मागणी करू.
- रूखमाबाई ठाकरे,
सरपंच, सोनगीर