धुळे : कोराेनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेली एस.टी. महामंडळाची ग्रामीण भागाची बससेवा सोमवारपासून पूर्ववत सुरू होणार असल्याची माहिती धुळे आगारातून देण्यात आली. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना काहीसा दिलासा मिळालेला आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढल्याने, राज्य शासनाने १४ एप्रिलपासून कडक निर्बंधांसह जिल्हाबंदी केली होती. मात्र, एस.टी. महामंडळाच्या बसफेऱ्या १२ एप्रिलपासूनच बंद करण्यात आलेल्या होत्या. कडक निर्बंधाच्या कालावधीत फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच बससेवा सुरू होती. मात्र, त्याला प्रतिसादही अत्यल्प होता. धुळे आगारातून फक्त जळगाव व नाशिकसाठीच अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी बससेवा सुरू होती.
दरम्यान, दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्याने, जिल्हा प्रशासनाने ७ जूनपासून अनलॉक जाहीर केले. त्यामुळे बससेवा सुरू हाेण्याचा मार्ग मोकळा झाला होता.
मात्र, गेल्या १५ दिवसांपासून धुळे आगारातर्फे फक्त लांब पल्ल्याच्या बसगाड्याच सुरू होत्या. ग्रामीण भागातील एकही फेरी सुरू नसल्याने, प्रवाशांची कुचंबणा होत होती.
अखेर २१ जूनपासून धुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील बससेवाही पूर्ववत सुरू करण्यात येत आहे. कडक निर्बंध लागण्यापूर्वी ज्या गावांना बससेवा सुरू होती, त्यापैकी काही गावांची सेवा सोमवारपासून सुरू होत असल्याने, प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
आंतरराज्य सेवेबाबत
अद्याप आदेश प्राप्त नाही
दरम्यान एस.टी. महामंडळाची गुजरात व मध्यप्रदेशमध्ये जाणारी आंतरराज्य बससेवा २१ जूनपासून सुरू करण्यात येणार असल्याचे यापूर्वी जाहीर करण्यात आले हाेते. त्यानुसार धुळे आगारानेही गुजरात, मध्यप्रदेशातील काही शहरांसाठी बस सोडण्याचे नियोजन केले होते. मात्र, रविवारपर्यंत आंतरराज्य बससेवा सुरू करण्याचा आदेश प्राप्त न झाल्याने, तूर्त ही सेवा अजून काही दिवस लांबणीवर पडली असल्याचे सांगण्यात आले.