अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेच्या कामाला लाॅकडाऊननंतर गती आली आहे. पाइपलाइन टाकण्याच्या कामाबरोबरच धरणक्षेत्रात जॅकवेल करण्याचेही काम सुरू आहे. कामाला सुरुवात झाल्यानंतर खडक लागल्याने काम थांबले आहे. त्यामुळे आता तो खडक फोडण्यासाठी सुरुंग लावून काम करावे लागणार आहे. त्याकरिता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने पाटबंधारे विभागाला परवानगीसाठी पत्र दिले आहे. दरम्यान, अक्कलपाडा धरणापासून सुमारे ३५ किलोमीटर पाइपलाइन टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे.
धुळेकरांना नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा व्हावा याकरिता अक्कलपाडा योजना मंजूर करण्यात आली आहे. दीड वर्षांपासून या योजनेचे काम सुरू आहे. या कामामध्ये धरण क्षेत्रात जलशुद्धीकरण केंद्राचे बांधकाम करण्यात येत आहे. तसेच धरणापासून पाइपलाइन टाकण्याच्या कामाला सुरुवात झालेली आहे, तर जलशुद्धीकरण केंद्रात पाणी आणण्यासाठी धरण क्षेत्रात जॅकवेल बांधण्यात येत आहे. त्याकरिता अगोदर धरणात बांध बांधण्यात येऊन जॅकवेलचे काम करण्यात येत आहे.
धरण क्षेत्र असल्याने सुरुंग लावण्यास परवानगी मिळणे सोपे नसल्याचे सांगण्यात आले. मात्र सौम्य स्वरूपाचे सुरुंग लावण्याची परवानगी मिळू शकते असे जाणकारांनी सांगितले. शिवाय पावसाळ्यात धरणात पाण्याची पातळी वाढली, तर जॅकवेलचे काम सुरू असलेली जागा पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. तसे झाले तर पाणी पातळी कमी होण्याची वाट पालिकेला पाहावी लागणार आहे.