धुळे : रक्षाबंधनाचा सण अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपला आहे. या सणानिमित्त भावाकडे जाणाऱ्या महिलांची संख्याही वाढलेली आहे. त्यामुळे महामंडळानेही प्रमुख मार्गांवर बसगाड्यांची संख्या वाढवली आहे. याला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे एप्रिलपासून बससेवा बंद करण्यात आली होती. मात्र, लाट ओसरताच महामंडळाने बससेवा पूर्ववत सुरू केलेली आहे. आता राज्य शासनानेही निर्बंध शिथिल केलेले आहेत. निर्बंध शिथिल केल्यानंतर रक्षाबंधन हा मोठा सण आलेला आहे. या सणाला अनेक बहिणी आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी माहेरी अथवा भावाच्या गावी जात असतात. यावर्षी जोडून सुटी आलेली असल्याने, गतवर्षापेक्षा प्रवाशांची संख्याही वाढली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाच्या धुळे आगारातर्फे जादा बसगाड्यांचे नियोजन केले आहे. या जादा बसगाड्या २५ ते २६ ॲागस्टपर्यंत सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले.
रेल्वे अद्यापही बंदच
धुळे येथून फक्त चाळीसगाव पॅसेंजरची सुविधा आहे, तर या पॅसेंजरला मुंबई, पुण्यासाठी विशेष बोगी लावण्यात येत असतात. मात्र, गेल्या वर्षाच्या मार्चपासून पॅसेंजरच बंद असल्याने, रेल्वेने मुंबई, पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यांना खाजगी बस अथवा महामंडळाच्या बसने प्रवास करावा लागतो.
या मार्गावर वाढल्या फेऱ्या
धुळे-अहमदाबाद
धुळे-सुरत
धुळे-बडोदा
धुळे-वापी
धुळे-नाशिक
धुळे-औरंगाबाद
धुळे-जळगाव
प्रवाशांची गर्दी
यावर्षी राखी पौर्णिमेचा सण रविवारी आलेला आहे. जोडून सुटी असल्याने, सणानिमित्त बाहेरगावी जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
त्यामुळे धुळे बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी दिसून येत आहे. मात्र, प्रवास करताना कोरोनाच्या नियमांकडे दुर्लक्ष केले जात आहे.
नियमांचे पालन होण्याकडे लक्ष दिले पाहिजे
रक्षाबंधनानिमित्त बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी धुळे आगारातर्फे जादा बसगाड्यांचे नियोजन करण्यात आलेले आहे. आंतरराज्य बससेवाही सुरू करण्यात आलेली आहे. ही सेवा एक आठवडा सुरू राहणार आहे. प्रवाशांनी जादा बसगाड्यांच्या सेवेचा लाभ घ्यावा.
-स्वाती पाटील,
आगारप्रमुख, धुळे