महापालिकेच्या सभागृहात घेण्यात आलेली ऑनलाईन स्थायी समितीची सभा संजय जाधव यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस, नगरसचिव मनोज वाघ उपस्थित होते. स्थायी समितीच्या सभेत चर्चेसाठी ठेवण्यात आलेले विषय मोजून दहा मिनिटांत गुंडाळण्यात आले. स्थायी सभेत नियमितपणे मांडण्यात येणारी स्वच्छता आणि कचऱ्याची समस्या अद्याप सुटलेली नाही. डेंग्यूच्या रुग्णांचे प्रमाण वाढत चालले आहे. शहर कचरामुक्त कधी होईल? असा प्रश्न समाजवादी पार्टीचे नगरसेवक अमिन पटेल यांनी विचारताच, सत्ताधारी प्रशासन हतबल बनल्याचे चित्र दिसून आले. डेंग्यू, मलेरिया रुग्णांच्या रक्त तपासणीसाठी शहरात किती यंत्रे कार्यरत आहेत? यावर उत्तर देताना आरोग्याधिकारी डॉ. महेश मोरे यांनी सांगितले की, शहरात मनपाची एकूण १५ रुग्णालये आहेत. लॅब टेक्निशियन ८, तर क्षयरोग तपासणी करणारे तंत्रज्ञ ५ असे एकूण १३ कर्मचारी रक्त तपासणीचे कार्य करत असल्याचे सांगितले. २.५ लाखाचे रक्त तपासणीचे मशीन मनपाच्या सर्वच रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही नगरसेवक पटेल यांनी केली.
माजी स्थायी समिती सभापती सुनील बैसाणे सभेत म्हणाले की, नागरिकांना नियमित पाणी पुरवठा केला जात नसल्यामुळे डासांच्या संख्येत वाढ होऊन डेंग्यू आणि मलेरियाची लागण वाढत चालली आहे. साक्री रोड परिसरातील मुख्य जलवाहिनीला गळती लागून शुध्द पाण्याची प्रचंड प्रमाणावर नासाडी होत आहे. जलवाहिनीची गळती का रोखली जात नाही? मनपातील कर्मचारी दीपक खोंडे यांच्याकडे सोपविण्यात आलेली नस्ती गहाळ कशी झाली? गहाळ झालेली नस्ती जमा करण्याचे मनपा अधिकाऱ्यांनी सांगितले असताना, कार्यमुक्तीचे आदेश नसताना बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील नगरपालिकेत बदली का करण्यात आली? स्थायी समितीच्या मागील पाच सभांपासून ‘त्या’ फाईलचा विषय चर्चिला जातो आहे, तरी देखील प्रशासन दखल का घेत नाही? यावर उत्तर देताना अति. आयुक्त नितीन कापडणीस यांनी, आपल्यापर्यंत अशी कोणतीही नस्ती आली नसल्याचे सांगितले. यामुळे बैसाणे यांचा आणखीनच संताप अनावर झाला. यावेळी विरोधी पक्षनेता कमलेश देवरे यांनी, शहरात एलईडी बसविण्याचे काम किती पूर्ण झाले? असे विचारले. यावर मनपाच्या वीज विभागाचे बागुल यांनी देवपूर परिसरातील प्रभाग १ मध्ये ऐंशी टक्के काम झाल्याचे सांंगितले. एलईडीबाबतच्या समस्या सोडविण्यासाठी नवरंग पाण्याची टाकी व जुनी महापालिका या ठिकाणी कार्यालये उघडली जाणार असल्याचेही बागुल यांनी सांगितले.
प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळेच शहरातील नागरिकांना डेंग्यू, मलेरियाला सामोरे जावे लागते आहे, असा आरोप नगरसेवक शीतल नवले यांनी स्थायी सभेप्रसंगी केला. डेंग्यू, मलेरियावर नियंत्रण मिळविण्यासाठी फवारणी करिता ठेकेदाराची नेमणूक करण्यात आली आहे. ठेकेदाराचे ७७ कर्मचारी आणि मनपाचे २२ असे एकूण ९९ कर्मचाऱ्यांनी एकही मच्छर मारला नाही. ठेकेदाराला मनपाकडून ४० लाख रुपये दर महिन्याला दिले जातात. ठेकेदाराकडून काम करून घेण्याची जबाबदारी कोणाची? या प्रश्नावर उत्तर देताना उपायुक्त गणेश गिरी यांनी, पुढच्या स्थायी समितीपर्यंत मुदत द्यावी, कामात सुधारणा होईल, असे आश्वासन दिले.