या वेबिनारसाठी वक्ते म्हणून प्रा. डॉ. हेलन जोसेफ, निवृत्त प्राध्यापक, निर्मला निकेतन समाजकार्य महाविद्यालय, मुंबई आणि प्रा. डॉ. अंबादास मोहिते, संस्थापक अध्यक्ष "मास्वे" संघटना, आदी मान्यवर सहभागी झाले होते, तर प्राचार्य डॉ. जालिंदर अडसुळे वेबिनारच्या अध्यक्षस्थानी होते. या वेबिनारसाठी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ कार्यक्षेत्रातील पाच समाजकार्य महाविद्यालय व विद्यापीठातील समाजकार्य विभागाचे प्राचार्य, प्राध्यापक सहभागी झाले होते.
वेबिनारच्या सुरुवातीला वेबिनार समन्वयक डॉ. रघुनाथ महाजन यांनी वेबिनार आयोजित करण्यामागील पार्श्वभूमी स्पष्ट केली. हे विधेयक संसदेमध्ये मांडले जाण्यासाठी व ते पारित होण्यासाठी आपण सर्व मिळून विविध पातळीवर प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्याबाबत चर्चा व्हावी आणि पुढील दिशा ठरावी या उद्देशाने या वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे, असे डॉ. महाजन यांनी सांगितले. यावेळी प्रा. डॉ. अंबादास मोहिते यांनी राष्ट्रीय समाजकार्य शिक्षण परिषद स्थापन झाल्यास समाजकार्य शिक्षणाला एक व्यावसायिक दर्जा मिळण्यास मदत होईल. समाजकार्य शिक्षणाला राष्ट्रीय ओळख प्राप्त होईल. तसेच समाजकार्य शिक्षण व सराव यांचे राष्ट्रीय स्तरावर नियमन झाल्यामुळे देशभर समाजकार्य शिक्षणात एकसारखेपणा, एकवाक्यता येण्यास मदत होईल. त्यामुळे समाजकार्य शिक्षणाची गुणवत्ता वाढीस मदत होईल. त्याचप्रमाणे समाजकार्याचे शिक्षण देणाऱ्या शैक्षणिक संस्थांचे मूल्यांकन व प्रमाणीकरण वेळोवेळी होणार असल्यामुळे समाजकार्य शिक्षणासाठी दर्जेदार शैक्षणिक संस्था निर्माण होतील. समाजकार्याचे शिक्षण देणाऱ्या शैक्षणिक संस्थांची गुणवत्ता व दर्जा उंचावेल, असे त्यांनी प्रतिपादन केले. प्रा. डॉ. हेलन जोसेफ यांनी मार्गदर्शन केले. समारोप वेबिनारचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जालिंदर अडसुळे यांनी केला.