शहरासह जिल्ह्यातील नागरीकांच्या समस्या, अडीअडचणी सोडविण्यासाठी पोलिसांची भूमिका महत्वाची आहे. त्यात ते कमी पडत नाही. असे असलेतरी समस्या घेऊन पोलीस ठाण्याची पायरी चढणाऱ्या नागरीकांना सर्वात अगोदर आपण राहतात कुठे, हा परिसर आमच्या पोलीस ठाण्यात येत नाही. आपण आपली तक्रार त्या पोलीस ठाण्यात नोंदविण्यासाठी जावे असा सल्ला देऊन अनेकवेळा झटकण्याचा प्रयत्न केला जात असतो.
ही घ्या उदाहरणे
- शहरातील आग्रा रोड असा भाग आहे ही यातील काही भाग हा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो तर काही भाग आझादनगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत येतो. बऱ्याचवेळा आग्रा रोडवर काही घडल्यास नेमके शहर पोलीस ठाण्यात जावे की आझादनगर पोलीस ठाण्यात जावे असा प्रश्न पडतो.
- तापी नदीचा सुध्दा मुद्दा काहीसा तसाच आहे. काही भाग हा नरडाणा पोलीस ठाण्यात येतो. पुढे तोच भाग शिंदखेडा पोलीस ठाण्यात येताे. तर काही भाग शिरपूर पोलीस ठाण्यात येत असल्याने काही घटना घडल्यास हद्दीचा विषय समोर येतो. त्यानंतर तक्रार नोंदवून घेतली जाते.
- शहरात देखील सहा पोलीस स्टेशन आहेत. हाणामारी, चोरी अथवा काही अनुचित प्रकार घडल्यास सामान्य जनता जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन आपली कैफियत मांडण्याचा प्रयत्न करते. पण, नंतर काही वेळेस हद्दीचा मुद्दा पुढे करुन त्यांना दुसऱ्या पोलीस ठाण्यात पाठविले जाते.
तक्रार दाखल करुन न घेतल्यास कारवाई
- सर्व सामान्य नागरीक आपली समस्या घेऊन पोलीस ठाण्यात आल्यास त्यांचे म्हणणे ऐकून घेत तक्रार नोंदवून घेणे आवश्यक आहे.
- तक्रार कोणती, तिचे स्वरुप काय हे समजून घेऊन काय निर्णय घेता येईल याचा पडताळणी करुन घेऊन निर्णय घेणे अपेक्षित आहे.
- काहीवेळेस काही प्रकरण ही न्यायालयात थेट जात असल्याने नंतर त्याची नोंद संबंधित पोलीस ठाण्यात करण्यात येत असते.
- येणारी तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवून घेत असताना येणाऱ्यांचे समाधान देखील करण्याची जबाबदारी ही पोलिसांवरच असते.
सर्वसामान्य नागरीकांच्या समस्या त्या त्या पोलीस ठाण्यात समजून घेतल्या जातात. आपण राहत असलेले ठिकाण कोणत्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे, हे नागरीकांना माहिती असते. यदा कदाचित कोणाला हद्दबाबत माहिती नसल्यास त्यांची काही तक्रार समजून घेऊन त्याचे निराकरण करण्याचा प्रयत्न असतो.
- चिन्मय पंडित, पोलीस अधीक्षक धुळे