शिंदखेडा पंचायत समितीच्या माजी सभापती सुनंदा गिरासे व मेथी येथील उपसरपंच नरेंद्रकुमार गिरासे यांचा मुलगा विरपाल गिरासे यांचा नुकताच विवाह पार पडला़ विवाह झाल्यानंतर ते सपत्निक मालदीव येथे फिरण्यासाठी गेले़ जाताना भारतात दोघांचे कोरोना चाचणी घेतली, त्यात दोघांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले़ त्यानंतर, दोन्ही जण मालदीवला पोहोचले़ एक दिवस फिरल्यानंतर तेथे परत त्यांची चाचणी करण्यात आली. त्यात विरपाल यांच्या पत्नी यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले़ त्यानंतर, दोघांना वेगवेगळ्या खोल्यांमध्ये ठेवण्यात आले. हॅाटेल व्यवस्थापनाने त्यांना कुठलीही सुविधा दिलेली नाही. त्यामुळे त्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यांना खाण्यापिण्याची सुविधा, वैद्यकीय सुविधा काहीही उपलब्ध करून दिली जात नसल्याचे सांगण्यात आले़ हॉस्पिटललाही दाखल होऊ देत नाहीत, एकमेकांनाही भेटू देत नाहीत. त्यामुळे त्यांना मोठा मनस्ताप होत असून, येथून आमची लवकर सुटका व्हावी, यासाठी त्यांनी भारत सरकार, महाराष्ट्र सरकार यांच्याकडे याचना केलेली आहे.
मेथी येथील तरुण दाम्पत्याची भारतात परत येण्यासाठी याचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:32 IST