धुळे - कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी व्हावी यासाठी प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. निर्बंध कडक करण्यात आले आहेत. बससेवेवरही बंधने आली आहेत. ग्रामीण भागातील बससेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. लांब पल्ल्याच्या निवडक फेऱ्या सुरू आहेत. एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी असे विविध प्रयत्न सुरू आहेत मात्र दुसरीकडे खासगी ट्रॅव्हल्समध्ये कोरोनाला मोकळे रान मिळत असल्याचे चित्र आहे. कोरोनाच्या प्रतिबंधात्मक नियमांचा अक्षरशः फज्जा उडत आहे. मास्क तसेच सॅनिटायझरची कोणतीही व्यवस्था खासगी ट्रॅव्हल्समध्ये उपलब्ध नाही. त्यामुळे कोरोनाचा सांसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांना कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्या पार्शवभूमीवर कोरोना नियमांना हरताळ फासणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सवर काय कारवाई होते ते त्याकडे नागरिकांचे लक्ष आहे.
जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मागील काही दिवसांपासून कमी झाली आहे. त्यासाठी नागरिकांनी लॉकडाऊनला दिलेला प्रतिसाद महत्त्वपूर्ण ठरला आहे. अनेक नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करत घरातच थांबणे पसंत केले आहे. शासनाने देखील कडक उपाययोजनांचा अवलंब केल्याने बाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने घसरण होत आहे. असे असताना खासगी ट्रॅव्हल्समध्ये मात्र कोरोना प्रतिबंधात्मक नियमांना हरताळ फसला जात आहे. त्याठिकाणी कोणतीही काळजी घेतली जात नसल्याचे चित्र आहे. यामुळे कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढण्याची शक्यता आहे. थर्मल स्कॅनिंग किंवा ऑक्सिजन पातळीची तपासणी तर सोडाच पण साधे मास्क व सॅनिटायझरची व्यवस्थाही नाही.
ना मास्क, ना सॅनिटायझर -
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एसटी महामंडळाच्या बस फेऱ्या कमी करण्यात आल्या आहेत. खासगी ट्रॅव्हल्स सुरू आहेत, मात्र त्यांच्याकडून कोरोनाच्या प्रतिबंधात्मक नियमांचे पालन केले जात नाही. थर्मल स्कॅनिंग व ऑक्सिजनची पातळी तपासणारे तर दूरची गोष्ट साधे मास्क व सॅनिटायझरची देखील व्यवस्था करण्यात आलेली नाही.
कारवाई शून्य -
खासगी ट्रॅव्हल्समध्ये कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे सर्रासपणे उल्लंघन होत आहे. मात्र त्याकडे प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचे दिसते. खासगी ट्रॅव्हल्समध्ये मास्क न लावणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीय आहे. पण कोरोनाला आमंत्रण देणाऱ्या एकाही खासगी ट्रॅव्हल्सवर कारवाई झाल्याची नोंद नाही.
ई-पास कोणाकडेही नाही -
जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या प्रवाशांना तसेच बाहेरून येणाऱ्या प्रवाशांना ई -पासची सक्ती करण्यात आले आहे. मात्र त्याच्या अंमलबजावणीकडे प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. खासगी ट्रॅव्हल्समधून प्रवास करणाऱ्या एकाही प्रवाशाकडे ई-पास उपलब्ध नसल्याचे आढळले.