सर्व शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. दरवर्षी १५ अथवा १६ जूनलाच जिल्ह्यातील शाळा सुरू होत असतात. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना मोफत पुस्तकांचे वाटप केले जाते. नवीन पाठ्यपुस्तके मिळाल्याने, विद्यार्थी आनंदित होत असतात. पहिल्या दिवसांपासूनच शिक्षणाला सुरुवात होते. मात्र, या वर्षी शाळा सुरू होऊन २८ दिवस झाले, तरी अद्याप विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके मिळाली नाहीत. शाळा सुरू नसल्या, तरी ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. मात्र, पुस्तकेच नसल्याने ऑनलाइन शिक्षण घेण्यात विद्यार्थ्यांना अडचण येत आहे.
जिल्ह्यात पहिली ते आठवीपर्यंतचे सुमारे अडीच लाख विद्यार्थी असून, त्यांच्यासाठी १२ लाखांपेक्षा अधिक पुस्तकांची गरज आहे. त्यामुळे लवकर पुस्तके मिळावीत, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.
दरवर्षी शाळा सुरू होण्याच्या दिवशीच विद्यार्थ्यांना पुस्तके मिळत होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होत होता.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या वर्षीही ऑनलाइन शिक्षण सुरू झालेले आहे. मात्र, अद्यापपर्यंत विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकेच मिळालेली नाही.
शिक्षण विभागाने जुनी पुस्तके परत करण्याचे आवाहन केले होते. त्याला विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
शाळा सुरू होऊन महिना होत आला. मात्र, अद्याप पुस्तके हाती मिळालेले नाही. त्यामुळे अभ्यास कसा करायचा, असा प्रश्न निर्माण झालेला आहे.
- भूषण पाटील, विद्यार्थी.
मोबाइल असला, तरच ऑनलाइन अभ्यास करता येतो. मात्र, मोबाइल नसला की, पुस्तकांशिवाय पर्याय नाही. पुस्तके मिळणे गरजेचे आहे.
-भाग्यश्री देव, विद्यार्थिनी