राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर फलोत्पादन अंतर्गत ट्रॅक्टर, प्लास्टिक मल्चिंग, कांदा चाळ, शेडनेट हाऊस, पॉलीहाऊस या घटकांतर्गत अर्ज केले त्यांची प्रवर्गनिहाय व बाबनिहाय ऑनलाइन सोडत काढण्यात आली आहे. तसा संदेश शेतकऱ्यांच्या नोंदणी केलेल्या मोबाइलवर पाठविण्यात आला आहे. निवड प्रक्रियेत ज्या शेतकऱ्यांची निवड झालेली आहे, त्या शेतकऱ्यांनी संकेतस्थळावर शेतकरी योजना या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर वापरकर्ता आयडी या पर्यायावर क्लिक करावे. वापरकर्ता आयडीवर क्लिक केल्यानंतर वापरकर्ता आयडी व पासवर्ड टाकून लॉगिन करावे. प्रोफाइल स्थित पृष्ठावर मुख्य मेन्यूमधील मी अर्ज केलेल्या बाबी या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर अप्लाइड घटकामध्ये छाननी अंतर्गत अर्ज या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपण केलेल्या सर्व अर्जांची स्थिती दिसेल. स्थितीमध्ये अपलोड डाॅक्युमेंट्स असा शेरा ज्या घटकासमोर असेल त्या घटकासाठी लॉटरीद्वारे आपली निवड झाली आहे, असे समजावे. अप्लाइड घटक याच पृष्ठावरील मुख्य मेन्यूमधील कागदपत्रे अपलोड करा या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर वैयक्तिक कागदपत्रे या पर्यायावर क्लिक केल्यानंतर दर्शविलेल्या स्क्रीनवरील कागदपत्रे अपलोड करा या पर्यायावर क्लिक करावे. कागदपत्र अपलोड स्क्रीन दिसेल. त्यात नमूद केलेली विहित कागदपत्रे १५ केबी ते ५०० केबी या आकारमानातच अपलोड करून जतन करा या पर्यायावर क्लिक करावे.
लॉटरी निघून दोन महिन्यांचा कालावधी झालेला असूनदेखील काही लाभधारकांनी कागदपत्रे अपलोड केलेली नाहीत. असे अर्ज रद्द करण्याबाबत सूचना निर्गमित केल्या आहेत. या सूचनांच्या अधीन राहून अर्ज रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.
वरील कागदपत्रांच्या छाननीनंतर पुढे करावयाच्या कार्यवाहीबाबत लाभार्थींना वेळोवेळी सूचना प्राप्त होतील. सदर कामासाठी आपण जवळच्या ई-सेवा केंद्राची मदत घेऊ शकता. तसेच यामध्ये कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
बाबनिहाय लाभार्थी असे
आतापर्यंत ट्रॅक्टर या घटकांतर्गत ३० लाभार्थींची निवड झालेली असून, त्यापैकी १२, प्लास्टिक मल्चिंग घटकांतर्गत २१ लाभार्थींची निवड झाली असून त्यापैकी ४, हरितगृह/शेडनेट हाऊस घटकांतर्गत २३ लाभार्थींची निवड झाली असून, त्यापैकी ५ व कांदाचाळ घटकासाठी ५८ लाभार्थींची निवड झाली असून, त्यापैकी १६ लाभार्थींनी कागदपत्रे अपलोड केलेली आहेत.